27 July 2024

गप्पाष्टक 06

Edit Posted by with No comments

नेहमी प्रमाणे यावेळी आषाढी च्या आधी पंढरपूर ला गेलो होतो.पर्णवी ला न्यावं असं काही ठरलं नव्हतं पण ऐनवेळी ती स्वतःहुन यायला तयार झाली. विठुरायाची इच्छा अस म्हणून तिला पण सोबत घेऊन निघालो.प्रवासात अभंग अन गप्पा असं सुरू होतं. मग जरा टाइमपास म्हणून कोडी सुरू झाली. मग बोलता बोलता अचानक एक असं कोडं समोरून आलं की काही तिथे काही डोकं चालेना. कोडं अस होत..


पर्णवी : बाबा, तुला आता असं कोडं घालते की तुला त्याचं उत्तर शोधता येणारच नाही


मी : बरं... अगोदर कोडं तर सांग मग बघू या.


पर्णवी: भविष्यात सारं काही शक्य होऊ शकतं पण एक अशी गोष्ट आहे की जी कधी चं शक्य होऊ शकत नाही.

आता हे ऐकून मी पण जरा गोंधळून गेलो.ही नक्की काय संदर्भाने बोलते आहे याचा काही अंदाज लागत नव्हता. कारण आमचं डोकं इतकं तुफानी आहे कर्क कोणताही संदर्भ कुठे ही अन कसाही लागू शकतो.

मी :  म्हणजे तुला नक्की कशा बद्दल बोलायचं आहे.

पर्णवी : वारी बद्दल रे बाबा

मी: अच्छा...अस म्हणते आहे होय.

मी जरा वेळ विचार केल्याचं नाटक केलं अन मग हारलो असं सांगून दिलं. आता हिचा डोक्यातून काय येतंय याची मला उत्सुकता होती.

पर्णवी : अरे...वारी मध्ये सारं काही होऊ शकतं पण भाव नसेल तर काहीच होणार नाही.

मी : म्हणजे..

पर्णवी: हे बघ भविष्यात किनई असं होऊ शकतं की वारीला रोबोट पण येतील.भले वारी मध्ये येणारे रोबोट बनवतील पण ते एक गोष्ट नाही करू शकत ती म्हणजे भाव.

मी : असं होय

पर्णवी: वारी ला यायचं म्हणजे भाव हवाच. अन भाव असेल तर वारी होईल.कारण विठ्ठल बाप्पा फक्त भाव बघतो. त्यामुळे आपण वारीला जाणारे  रोबोट बनवले तरी आपण तो वारी मध्ये हवा असणारा भाव बनवू शकत नाही....बरोबर आहे की नाही.

अगदी बरोबर अस म्हणून नेहमी प्रमाणे मी बापुड्या ने हार मान्य केली.अन जे बोलली त्याचा विचार करू लागलो. ते अगदी योग्यच आहे. AI च्या दुनियेत बरंच काही शक्य होईल पण श्रद्धा अन विश्वास यातून निर्माण होणारा भाव याची निर्मिती कशी काय शक्य होईल?

0 Comments:

Post a Comment