27 July 2020

दुःख !!😃

Edit Posted by with No comments
लॉकडाउन च्या काळात माझा फ्लॅट अन वरच्या मजल्यावर असणारा ताईचा फ्लॅट असं पर्णवीच अन भाच्याचं जग झालं आहे.त्यात पण खाणे अन शाळा वगैरे साठी माझ्या घरी तर खेळण्यासाठी वरच्या घरी.मध्यंतरी तर पर्णवी ने दोन्ही घरांना आम्ही जातो त्या नेहमीच्या हॉटेलची नाव देऊन टाकली होती.खालच घर रिलॅक्स तर वरचं घर खुशबू ....दोघे बोलताना पण चला खुशबूला जाऊ, चला रिलॅक्स ला जाऊ असलं दोघांच्या कोडवर्ड होते.

बहुतांश वेळा दुपारी खेळण्याची वेळ ठरलेली त्यामुळे आज दुपारी शाळा,जेवणं अस सगळं आवरून वगैरे दोन्ही वादळ ताईच्या घरी गेले.जरा वेळ दंगा मस्ती झाली ,गोष्टी अस झालं अन संध्याकाळी रिवाजाप्रमाणे भूक लागली तर लगेच पर्णवी म्हणे..

"आत्तु, भूक लागली आहे काही तरी खायला दे..."

तर ताई म्हणाली..."भूक लागली आहे काय...चला बरं खाली जाऊ ,आत्ता सगळं जेवण तयार आहे...लवकरच जेवणं करून घ्या..."

यावर पर्णवी मातेचं प्रत्युत्तर आलं...." सारखं सारखं काय ग लगेच खाली जायचं...आत्ताच तर आम्ही खेळायला आलोय...असंच करता तुम्ही... वर खेळायला आलो की लगेच आम्हाला खाली घेऊन जाता..."

असा राग दरबारी सुरू झाला तेच भाचेपंतांनी तोच सूर आळवला अन एक पाऊल पुढे जात म्हणाला..." दीदी, आपण ना एक दिवस काय करू या न यांना सगळ्यांना खाली ठेवू अन आपण दोघेचं वरती थांबू या...आपण बिलकुल पण खाली जायचं नाही.... दिवसभर इकडेच खेळू या...राहू दे या सर्वांना खाली..."

आता समोरून एवढी धुवांधार फटकेबाजी झाल्यावर आम्ही माघार कशी घेणार, पर्णवी मातेने लगेच टोलेजंग फटका टाकला... "हो रे अद्वय , त्याशिवाय यांना आपलं दुःख कळणार नाही..." 🤣🤣🤣😂😂😂😂

घ्या आपलं वय काय अन आपण केवढी टोलेजंग फटकेबाजी करावी 😂😂😂😂

25 July 2020

दोन मेंदू !!

Edit Posted by with No comments
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून घरातच पर्णवी ला सतत बिजी ठेवण्यासाठी काही ना काही करावं लागतं.पेंटिंग, गेम्स, बाकी वेगवेगळ्या activity अस काय काय चालू असत.सुरवातीला योगा चालू केला मग कधी मूड नाही नाही तरी मग काही तरी खुसपट कारण काढून मग कंटाळा करायचा.मग वेगळं काही तरी करायचं म्हणून मग हल्ली मेडिटेशन चा प्रयोग सुरू केला. त्यासाठी पण सुरुवातीला तयारी करताना मग कंटाळा प्रकरण किंवा मग वेगळं काही तरी करू या...चल नाटक करू या किंवा मेडीटेशन ला बसल की मस्ती सुरूच.म्हणून मग आता तिला व्यवस्थित समजावून सांगू या अन म्हणजे मग ती प्रॉपर करेल अस ठरवलं.

तिला समजावण्याचा प्रयत्न म्हणून मग आमची मस्ती सुरू होती तेव्हा तिला अचानक म्हणालो...

"चिकू , तुला भूक लागली की काय करते?"

"भूक लागली की काहीतरी खाते..."

"अच्छा...मग त्याने काय होतंय..."

"माझं पोट भरत...."

"हो की नाही...अन मग तुला शक्ती येते त्यामुळे तू मस्ती करते...आता सांग मला तू काढा का घेते?"

"आजारी पडू नये म्हणून..."

"बरोबर... तू आपल्या देशपांडे डॉक्टरांच्या गोळ्या का खाते?"

"मला सर्दी होऊ नये म्हणून..."

अस एक ना अनेक मी प्रश्न विचारत तिला हे काय ,ते काय विचारत राहिलो.थोडक्यात सगळी पूर्वतयारी झाली होती आता फक्त मूळ मुद्दा घ्यायचा...ही लढाई आपणच जिंकणार असा जरा वेळ का होईना विश्वास वाटला...आज काही आपला पोपट नाही होणार म्हणून मनात खुष झालो अन म्हणालो

"अगदी तसच ना आपला मेंदू आजारी पडू नये म्हणून मेडिटेशन करायचं असत.अन रोज जेवण करतो ना अगदी तसंच रोज करायला म्हणजे मग आपली बुध्दी पण वाढते अन मेंदू पण आजारी पडत नाही...समजलं..."

जिंकलो....पटलं वाटत...असा काही आनंदात होतो तोच समोरून सणसणीत उत्तर आलं...

"बाबू.....अस काही नसतं... आपल्याला किनई दोन मेंदू असतात एक आजारी पडला की मग दुसरा मेंदू काम करतो...अन तोवर आजरी पडलेला मेंदू आराम करून बरा होता....समजलं का?"

घ्या...आता काय बोलणार ....अजून एकदा पोपट करून घेतला बाकी काही नाही....🤣🤣🤣😂😂😂😂

24 July 2020

छोटी सी बडी बात !!

Edit Posted by with No comments
आंघोळ म्हणजे हा आमच्याकडे अगदी मोठ्ठा कार्यक्रम असतो.अन त्यात पण वार लागले असतात.आज बाबू चा टर्न ,आज आऊ चा टर्न, आज आजोबा चा टर्न. अन कधी कधी तर अचानक साक्षात्कार होतो अन मग समजतं आम्ही मोठं झालोय मग मी माझी आंघोळ करणार. अन जेव्हा आमच्यापैकी कोणाचा टर्न असतो तेव्हा गोष्ट ही हवीच, किंवा काही तरी खेळ हा हवाच त्याशिवाय आंघोळ पूर्ण होत नाही.

दोनेक आठवड्यापूर्वी पर्णवी मातेने कौल दिला की आज आऊ चा टर्न आहे तर आज आऊनेच आंघोळ घालायची.मग सुजाता अन पर्णवी असा आंघोळी चा साग्रसंगीत कार्यक्रम सुरू झाला.त्यादिवशी मात्र बौद्धिक दिवस असावा.सुजाताला म्हणे...

"आऊ ,तुला माहिती आहे का एक असतं Good अन एक असतं Bad...."

"हो का....बरं मग त्याच काय..."

"अन आपल्या ला दोन कान आहेत की नाही.....जेव्हा Bad काही येतं ना तेव्हा आपण काय करायचं...ह्या कानातून घ्यायचं अन अस सरळ एकदम दुसऱ्या कानातून बाहेर काढायच....कारण का तर ते Bad आहे.....अन जे Good आहे ना ते कानातून अस heart पर्यंत घेऊन जायचं....म्हणजे आपण सगळं Good जे आहे तेच घेतो..."

कधी कधी निरागसतेतून आलेले बोल आपल्याला खूप मोठा अर्थ सांगून जातात. 😍😇

16 July 2020

लॉकडाऊन स्टोरी - नुसकान

Edit Posted by with No comments
आई चा जेव्हा उपवास असतो तेव्हा नियमानुसार पर्णवीचा उपवास असतो अर्थात सार काही खाऊन.अन आजी आजोबा म्हणजे एकदम हक्काचे... कारण सगळ्यात जास्त लाड त्यांच्या कडून होतात.अन नेहमीच soft corner म्हणजे आजी अन आजोबा.

आज आई अन बाबा दोघांचा पण एकादशी चा उपवास होता त्यामुळे सकाळ पासुनच पर्णवीच आजी कडे लाडी गोडी प्रकरण सुरू होतं... आजी आज काय काय करणार ग? खिचडी करणार आहेस ना...मला पण देणार ना...नक्की ना...बरोबर आपली सेटिंग लावायचं काम सुरू होतं.

सकाळी फराळाला खिचडी झाली त्यामुळे रात्री उपवासाच तळण सुरू होत.तेव्हा पर्णवी आली अन त्यानंतर आजी सोबतच गप्पाष्टक..

"आजी...हे काय आहे ग?"

"हे ना...बटाट्याचा किस आहे..."

"तू स्वतः बनवला आहेस हा?"

"हो....मीच बनवला आहे..."

"कसा बनवलास ग आजी ?"

"अग अगदी सोपं आहे...बटाटे घ्यायचे स्वच्छ करायचे...उकडून घ्यायचे अन किस करायचा अन मग उन्हात वाळवायचा..."

अन हे सगळं ऐकल्यावर क्षणाचाही विलंब न लावता उत्स्फूर्त अशी टोन मध्ये प्रतिक्रिया आली...

"आजी अग तू आहे म्हणून माझं बर आहे, नाही तर माझं फार नुसकान [ आम्ही नुकसान ला नुसकान म्हणतो 🤣🤣🤣] झालं असतं.... मला कोणी अस छान खायला दिल असत..."

अवघ्या पाच वर्षांत आम्हाला नुकसान वगैरे समजायला लागलं आहे... बोला 😂😂😂😂

10 July 2020

लॉकडाऊन स्टोरी- प्रॉमिस

Edit Posted by with 1 comment
वेळ रात्री -रात्री 11.30

स्थळ - बेडरूम

लॉकडाऊन मध्ये ग्राउंड तर दूर साधं फ्लॅट बाहेर पण जाणं बंद होत त्यामुळे पर्णवीच सार जग सकाळ ते रात्र फक्त हॉल,किचन,बेडरूम अन गॅलरी यामध्येच होतं. दुपारी मस्त झोप काढायची त्यामुळे मग रात्री उशिरापर्यंत जाग राहणं स्वाभाविक होतं. अन त्यात work from home सुरू होत त्यामुळे बाबा तू घरी आहेस तरी माझ्या सोबत मस्ती करणार नाही ना....अस करणार ना...हे अस दिवसभर चालू असायचं....त्यामुळे रात्री झोपायच्या अगोदर गाणं किंवा दंगा करणं असा अलिखित नियम झाला होता....यावरून सुजाता चा दोघांना ओरडा पण खावा लागायचा.😂😂

त्यादिवशी मला पण खुप कंटाळा आला होता, त्यामुळे ब्रश झाल्यावर मी जास्त काही मस्ती न करता झोपण्याच्या तयारी ला लागलो तोच पर्णवी मातेचा फुगा फुगला.रुसवा काढण्यासाठी मी आपलं बोलायला सुरुवात केली तर लगेच पलिकडून बॉम्ब पडला..

"मी तुझ्या सोबत कट्टी आहे...मी तुझ्या शी बोलणार नाही..."

"अग पण मी काय केलंय ते तर सांग....की असच केव्हा पण कट्टी घेते..."

"बाबू....हे बघ तू प्रॉमिस तोडलं आहेस....त्यामुळे मी कट्टी आहे..."

"ये चल...काही पण ...कसलं प्रॉमिस अन केव्हा तोडलं..."

"अरे बाबू...मी लहान म्हणजे किनई सात महिन्यांची होते ना तेव्हा तू मला प्रॉमिस केलं होतं की माझा जेव्हा drawing चा मूड असेल तेव्हा तू मला हवं ते drawing काढून देणार....रोज रात्री झोपताना मला तू खूप हसायची म्हणजे अगदी शेवटपर्यंत मी हसतच राहीन अशी गोष्ट सांगणार...अन आज तू यातील काही केलं नाही आहेस....तू प्रॉमिस तोडलं आहेस समजलं..." 

यावर मग मी म्हणालो...."तू सात महिन्याची असताना मी हे सार प्रॉमिस केलंय अन तुला इतक्या लहानपणीच सगळं आठवत आहे? "

तर लगेच उठून बसत...एक हात कमरेवर ठेवून... डोळे मोठे करत..." हो मग....मी रोज सकाळी भिजवलेले बदाम खाते ना...म्हणून मग मला सगळं लक्षात राहत...समजलं का..."

मी एकंदरीत तो अवतार बघून कल्लोळ हसायला लागलो तर लगेच म्हणे...

"हसतोस काय....तू पण बदाम खात जा म्हणजे तुझ्या सगळं लक्षात राहील..."😂😂😂🤣🤣🤣🤣

अखेरीस काय खूप हसायची गोष्ट ऐकत पिल्लू झोपी गेलं 😇




09 July 2020

लॉकडाऊन स्टोरी - सावली !!

Edit Posted by with 1 comment
सकाळी नेहमी प्रमाणे आंघोळ झाल्यावर सुजाता पर्णवीला टॉवेल गुंडाळून बेडरूममध्ये तयार करण्यासाठी घेऊन गेली.सोबत नेहमी सारखी अखंड वटवट सुरू होतीच.तेच सुजाताला किचन मध्ये काम आठवलं म्हणून पर्णवी ला कपडे घालून घे मी आलेच अस सांगून निघून गेली.जरा वेळाने सुजाता परत आली तर पर्णवी माता व्यवस्थित आवरून तिच आपलं खेळणं सुरू झाल होत.

थोडं आवराआवर केल्यावर सुजाताच्या लक्षात आलं की पर्णवीचा टॉवेल कुठे सापडत नाही. म्हणून मग सुजाता ने विचारलं ...." पर्णवी....अग टॉवेल कुठे टाकला आहेस ? सापडत नाहीये?"

तर म्हणे...." अग आऊ ते बघ तिकडे झाडांवर टाकलाय..."

सुजाताला वाटलं की ...झाडांवर सुकण्यास टाकला आहे...म्हणून सुजाता म्हणाली..."पर्णवी ती काय कपडे वाळवण्याची जागा आहे का? अस नाही टाकायचं."

तर लगेच पलीकडून सणसणीत उत्तर आलं....."आऊ...मी काही तो वाळवण्यासाठी नाही टाकला आहे....अग बाहेर बघ किती ऊन आहे...त्या आपल्या झाडांना ऊन लागेल अन मग त्रास होईल ना म्हणून झाडांना सावलीसाठी तो टॉवेल टाकलाय...😇🤗"