22 February 2019

शुद्ध मराठी !!

Edit Posted by with No comments

मला 12-13 वर्ष पुण्यात राहून पण बोलण्यात असणारा गावाकडचा लहेजा काही बदललेला नाही.बोलण्यात तो पुणेरी पणा अजून काही आत्मसात झाला नाही.

तर त्याच झालं अस...दोन आठवड्यापूर्वी पर्णवी ला डान्स प्रॅक्टिस नंतर घरी घेऊन येत होतो.येताना डोसा खायचा हट्ट झाला म्हणून मग शाळेजवळ असलेल्या हॉटेल मध्ये आम्ही गेलो. ऑर्डर  यायला वेळ होता त्यामुळे आमची मस्ती चालू होती.पर्णवी ला चांगलीच भूक लागली होती त्यामुळे केव्हा येणार हे टूमक चालू होत.साधारण दहा पंधरा मिनिटात उत्तप्पा आला.ऑर्डर आल्या बरोबर अधाशा सारखं पर्णवी खाण्याची घाई करू लागली म्हणून मी तिला म्हणालो...."पर्णवी....जरा हळू....उत्तप्पा गरम आसन...जरा हळू".

यावर लेकीची प्रतिक्रिया...

"बाबा...आसन काय....कसा बोलतो आहेस...अस बोलायचं नाही...उत्तप्पा गरम असेन ...अस बोल"

आता यावर पामर काय बोलणार...अजून वयाची चार वर्ष पूर्ण व्हायची आहेत तोच शुद्ध मराठी चे धडे मिळत आहेत...कॉलेजमध्ये जाईल तोवर काय काय होईल ते देवाक ठाऊक.

13 February 2019

वैताग!!

Edit Posted by with No comments

आमच्या कडे प्रत्येक गोष्टीसाठी एक एकेचा टर्न ठरलेला असतो.अर्थात अंतिम निर्णय हा पर्णवीचाच असतो.जेवण,आंघोळ,ब्रश इ इ साठी तिचा मूड असेल त्याप्रमाणे मग कधी आजी,आजोबा,आत्तू असेल तर आत्तू ,सुजाता किंवा मग मी.कोणाचा टर्न ठरवून अस काही नाही.

बहुतांश वेळा शनिवार अन रविवार आंघोळीची जबाबदारी ही अस्मादिकांवर असते.आंघोळ कसली फक्त दंगा असतो..नक्की कोण कोणाला आंघोळ घालतय हे काही कळायला मार्ग नसतो...बाबू ..किती मळाला आहेस तू थांब घासू दे..तुझा साबण घे माझा नको वगैरे वगैरे डायलॉगबाजी असते. अन सर्वात महत्वाचं म्हणजे या निमित्ताने तिचं थोडं बौद्धिक पण घेता येत.मग चुकीच काय  वागलं किंवा काही त्रास दिला असेल तर हे करायला नको हे पटवून देणं किंवा मग परत अस वागणार नाही हे प्रॉमिस करून घेणं म्हणजे एक दिव्य असतं.

दोन आठवड्यापूर्वी सुजाता ने मला सांगितलं होत की आजोबांना खाली फिरायला म्हणून चला अस बोलून खाली घेऊन जाते अन तिकडे त्यांच्याकडून कॅडबरी घेते.इतक्या वर प्रकरण थांबत नाही तर तिथेच संपवून वर आजोबांना दम द्यायचा आऊ ला अन बाबाला सांगू नका.[आम्ही दोघे अगदी लिमिटेड अन केव्हा तरी कॅडबरी देतो म्हणून ही आयडिया ]

असच मग शनिवारी आंघोळ करताना पर्णवी ला समजावून सांगू या असा विचार केला होता त्याप्रमाणे दोन आठवड्यापूर्वी आंघोळ करतानाच हे बौद्धिक 😂

त्यादिवशी हिला कस समजावं या विचारातच आमची मस्ती सुरू झाली.मग अचानक लक्षात आलं शाम्पू करताना हिला सांगावं चांगले छान केस हवे असतील तर रोज रोज कॅडबरी खाऊ नकोस.

मी: बच्चा...किती रे केस गंदू झालेत तुझे...हे बघ

पर्णवी: अरे बबुडी...ते बालभवन ला आम्ही खेळतो ना त्यामुळे खराब झालेत [ बाबाची या गुगली वर विकेट गेलेली  असते ]

मी: पिल्या....हे बघ तुझे केस गळायला पण लागलेत ...सर्व केस जातील बर का.

मी पुढे काही बोलणार त्याआधीच पुढचा षटकार तयार असतो

पर्णवी: हे तुमच्या दोघांमुळेच झालंय

मी: काय झालंय?

पर्णवी: आऊ अन तू...तुमच्यामुळेच माझे केस गळायला लागलेत [खरा शब्द गळवायला असा होता 😂😂]

मी : अग...पण आम्ही काय केलंय?

पर्णवी : तुम्ही दोघांनी वैताग दिलाय मला अन त्यामुळे केस गळाले [अन हे पूर्ण expression सह असतं]

मी: [शक्य तितकं हसू दाबून] वैताग म्हणजे नक्की काय ग?

पर्णवी: वैताग म्हणजे तो असतो रे... [थोडा जरा विचार केल्या सारख] मी सारं तुमचं ऐकत पण तुम्ही माझं काहीच ऐकत नाही.सगळं मलाच ऐकायला लागतं.माझं कोणीच काही ऐकत नाही

आता बाबाचा एवढा मोठा बौद्धिक झाल्यावर बाबा काय बोलणार??? जास्त काही न बोलता परत गुपचूप नेहमी प्रमाणे मस्ती सुरू झालेली असते.

11 February 2019

गोष्ट

Edit Posted by with No comments

पर्णवी त्रास द्यायला लागली किंवा हट्ट करायला लागली की त्यापासून distract करायचं असेल तर सर्वात सोपा उपाय म्हणजे गोष्ट सांगणं. गोष्ट सांगतो म्हणालं की स्वारी एकदम खूष होऊन जाते. पण केव्हा केव्हा या गोष्टींचा संदर्भ जेव्हा रोजच्या आयुष्यात यायला लागला की मग त्यातून येणारे निरागस प्रश्न हे खूपदा निरुत्तर करतात.

खूप दिवसांपूर्वी सुजाता ने पर्णवीला बाप्पा ने सर्व प्राण्यांना कोण कोणते रंग कसे दिले याची गोष्ट सांगितली होती.त्या दिवशी तिला अचानक ती गोष्ट आठवली अन सुजाता ला म्हणे...

"आऊ....काऊ दादा ला बाप्पा ने जो काळा रंग दिलाय ना तो मला अजिबात आवडला नाहीये."

सुजाता : मग आता काय करूयात....एक काम कर स्वामी आजोबांकडे जा अन त्यांना सांग की काऊ दादा चा रंग बदलून टाका.

अस सांगितल्यावर देवघरात असलेल्या स्वामी समर्थांच्या फोटो समोर गेली अन डोळे बंद करून प्रार्थना करू लागली...
"स्वामी आजोबा....मला काऊ दादा चा काळा रंग आवडत नाहीये. तुम्ही काऊ दादा ला नवीन रंग द्यायचा आहे...ठीक आहे...Done".

प्रार्थना करून मग परत येऊन सुजाता ला म्हणे...."मी सांगितल आहे स्वामी आजोबांना....आता ते काऊ दादा चा रंग बदलून देतील"😊

सुजाता ने मला सांगितल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही गाडी वर चाललो होतो तेव्हा मी पर्णवी ला सहजच विचारलं..." चिकू, तू काल स्वामी आजोबांना काऊ दादा चा रंग बदलायला सांगितला होता ना.....आता कोणता रंग देणार आहेत?"

"हो....स्वामी आजोबांना मी सांगितल आहे"....अन स्वामी आजोबा म्हणाले.."पर्णवी....काऊ दादा ला आता orange color देतो".

मी : " मग झाला का काऊ दादा orange?

पर्णवी: नाही रे बाबा...स्वामी आजोबा अजून orange color बनवत आहेत...तो तयार झाला की मग काऊ दादा orange होणार."

थोडक्यात काय तर, बाबा ला येत्या काही दिवसात orange color चा कावळा शोधावा लागणार अस वाटत आहे.😂😂😂

10 February 2019

अस करतात का?

Edit Posted by with No comments

रात्री आम्ही सर्व जेवायला बसलो तेव्हा श्लोक म्हणून झाला अन जेवायला सुरुवात करायची तर पर्णवी अचानक उठली अन ठमी ला सोबत घेऊन तिच्याशी खेळायला लागली.[ठमी आमच्या बाहुलीच नाव आहे.]

हे पाहून मग तिला जरा रागावल्या सारखं बोललो अन म्हणालो...."शहाणा माझा बच्चा ...चल पटकन जेवण करून घे'

यावर अगदी शून्य मिनिटात आलेली प्रतिक्रिया..." बाबा मला तुझं हेच आवडत नाही....एकदा चांगला बोलतो अन जरा वेळात लगेच मला रागावतो....अस करतात का???"

"म्हणजे आम्ही येडे....." बाबाची मनातली प्रतिक्रिया 😂😂😂😂

08 February 2019

ओ टकलू !!

Edit Posted by with No comments

पर्णवी सोबत दंगा करताना खूपदा मी आवाज बदलून तिला चिडवतो.अन परत मग तिला विचारतो कोण त्रास देतंय रे? हे अस खूपदा चालू असत. गाडीवर असताना किंवा रस्त्याने चालताना आमचे हे असले उद्योग सुरू असतात.

एके शनिवारी सकाळी पर्णवी अन मी फिरायला निघालो होतो...सोसायटीच्या गेटवर आम्ही आलो तेव्हा आमच्या बाजूने एक काका मोबाईल वर बोलत चालले होते.अचानक तेव्हा पर्णवीला लहर आली माहित नाही. दोन्ही हात तोंडावर ठेवून आवाज बदलुन मोठ्याने ..." ओ...टकलू..." अस म्हणाली.

क्षणभरासाठी तर मला काही समजलं च नाही.नंतर सर्वात आधी मागे वळून पाहिलं तर ते काका मोबाईल वर गुंग होते त्यामुळे त्यांनी हे काही ऐकलं नव्हतं.नाही तर काही खरं नव्हतं 🙄🙄

इकडे पर्णवी कडे पाहिलं तर मिश्किलपणे हसत होती... बाबाची कशी मजा केली. मी जरा दरडावून तिला म्हणालो ...बच्चा अस करायचं असत का...मोठ्या माणसांना अस बोलायचं का? तुझा बाबा पण टकलू आहे ना मग त्याला अस कोणी बोललं तर चालेल का?

यावर उत्तर आलं....अरे माझ्या बाबा...मी गंमत केली रे....सॉरी...अन पुन्हा आवाज बदलून..." ए बाबू....." सह मोठं हसू.😂😂😂

[घरी आल्यावर लेकीचा प्रताप सांगितल्यावर सर्वानुमते असा निष्कर्ष निघाला की खोडकरपणा अनुवांशिक असून हा गुण बाबा कडूनच आला आहे.या निष्कर्षला मासाहेबांनी माझ्या बालपणीच्या खोड्या अन त्याचा आई ला झालेला त्रास याचा लेखाजोखा मांडला.यावर मी आपला गरीब बिचारा भोळासांब काय बोलणार]