24 January 2019

संवेदना!!

Edit Posted by with No comments

दोनेक महिन्यांपूर्वी शुक्रवारी ऑफिसवरून घरी आल्यावर पर्णवी नेहमीपेक्षा जरा जास्तच लाडात आली होती.तेव्हाच लक्षात आलं आज काही तरी गडबड झाली आहे त्यामुळेच ही लाडीगोडी आहे.तोच सुजाता ने सांगितलं...."बाबा...आज तुला तिच्यासोबत बेडरूममध्ये बोलायचं आहे...अन मी काही सांगणार नाही तू तिलाच विचारायचं आहे."हे ऐकल्यावर पर्णवी चा खरं तर चेहरा पडला होता पण उगाचंच आपला उसना आव आणून दंगा सुरू होता.

त्याआधी थोडं बेडरूम विषयी...पर्णवी चा अन माझा बेडरूममध्ये खिडकी जवळचा कोपरा म्हणजे आमचा कट्टा...आमच्या सिक्रेट चा ,कनफेशन्स चा, मस्ती चा एक मूक साक्षीदार...तिच काही चुकलं किंवा हट्ट करून बसली असेल तर समजावण्यासाठी ही एकमेव जागा....आमच्या दोघांच्या नात्यातील एक हळवा कोपरा.

माझं जेवण झाल अन मग पर्णवी सोबत बेडरूममध्ये जायला निघालो....बेडवर नेहमीप्रमाणे बसलो तोच पर्णवी काही बोलायच्या आत मांडीवर आली अन इवल्याश्या हातांनी घट्ट मिठी मारली...त्या मिठी मधील भावना व्यक्त करायला खर तर शब्दच नाही आहेत पण ही मिठी नेहमी सारखी नव्हती हे नक्की.

जरावेळ आम्ही दोघे पण निःशब्द होतो...आजूबाजूला एकदम निरव शांतता होती...अन हे करताना ती माझ्याकडे पाहत नव्हती..शेवटी मग मीच....चिकू काय झालं बच्चा...अस म्हणत माझ्या  दोन्ही हातात तिचा चेहरा पकडून मान वर केली तर....दोन टपोऱ्या इवल्याशा डोळ्यात खूप सारे ढग भरून आले होते...केव्हा बरसू शकतील अशी अवस्था होती...मग एक मोठा आवंढा घेत बोलू लागली...." बाबू....माझं चुकलं रे...आजीला माझ्या तोंडातून पडवून गेलं तस... [आजी ला मी चुकून बोलले यासाठी ते पडवून गेलं 😀😀] मी परत नाही वागणार अस...सॉरी "

"तुला वाटतय ना तुझं चुकलं...मग झालं तर...अन चूक झाल्यावर काय करतो आपण??"

"स्वामी आजोबांना बाप्पा करायचा अन सॉरी बोलायचं....आजी ला पण बाप्पा करायचं अन सॉरी बोलायचं"

अस म्हणली अन टुणकन उडी मारून देवघरात गेली...स्वामींना नमस्कार करून सॉरी म्हणाली अन मग आजीला बाप्पा करून ...सॉरी म्हणत...मस्ती सुरू " 😊😊

स्वामी कृपेने आयुष्यभर चिकूने जगण्यातील सहजता अशीच जपावी....आता मनाची पाटी कशी कोरी आहे त्यामुळे ज्या सहजतेने झालेली चूक कळाली पण व माफी सुद्धा मागितली.मोठ झाल्यावर पण हे असच राहावं अशी इच्छा आहे.कस आहे...जस आपण मोठे होत जातो तस या पाटीवर षडरिपू येतात अन साध सरळ जगणंच आपण विसरून जातो.मग राहतात ते फक्त वाद,विवाद,अहंकार.

काही वेळापूर्वी जमा झालेले ढग न बरसातच निघून गेले होते अन सार कस निरभ्र झालं होत...सगळ्याचा कसा निचरा झाला होता..राहिला होता तो फक्त निखळ आनंद अन माझ्यातला अंतर्मुख झालेला बाप.

22 January 2019

डिंगऱ्या माझा कामाचा!!

Edit Posted by with No comments

रोज रोज आमच्या गोष्टी ऐकून पर्णवी बोअर झाली म्हणून गोष्ट सांगण्याचं काम आजी वर सोपवलं. तेव्हा मग आजी ने सकू,मकू अन डिंगऱ्या ची गोष्ट सांगितली.त्या गोष्टी प्रमाणे सकू,मकू हे काम न करणारे तर डिंगऱ्या हा काम करणारा होता.त्यामुळे गोष्ट ऐकल्यावर डिंगऱ्या कोण सकू,मकू कोण हे पर्णवी च सुरू झालं होत. अगदी लहानशी काही गोष्ट केली तरी ...मी आता डिंगऱ्या...मी हे केलं....मी ते केलं...हे चालू झालं होत.

संध्याकाळी मी ,सुजाता अन पर्णवी अस आम्ही गाडीवर येत होतो तेव्हा अचानक पर्णवी च सुरू झालं....बाबू...तुला माहितये का....मी आणि आऊ डिंगऱ्या आहोत अन तू सकू मकू आहेस...मी अन आऊ सर्व काम करतो...तू तर काहीच करत नाहीस...

म्हणलं अस कस...उलट मीच जास्त काम करतो...मीच डिंगऱ्या आहे...तू काहीच करत नाहीस म्हणून तू सकू मकू...आऊ पण डिंगऱ्या आहे...

यानंतर मग आमचं डिंगऱ्या कोण यावर बराच वेळ तू तू मै मै सुरू होत. पण दोघांपैकी कोणीच माघार घेत नव्हतं.मग सुजाता ने मला साथ केली...तिने पण सांगितल...पर्णवी तूच सकू मकू अन आम्ही दोघे डिंगऱ्या...हुकुमाचा एक्का माझ्या बाजूने आल्यामुळे मी खूष होतो...पण माघार घेईल ती पर्णवी काय??...बाबाचा आनंद फार काळ टिकला नाही...कारण पर्णवी खूप वैतागली...अन म्हणाली....आपण तिघे डिंगऱ्या आहोत अन आजी आजोबा सकू मकू आहेत

यावर मी म्हणालो....अग पण आजी आजोबा पण काम करतात की ते कशे काय बर सकू मकू?

"अरे बाबा, तुला कस रे कळत नाही....आजी आजोबा म्हातारे आहेत...अन म्हातारे लोक कधीच काम करत नाहीत कारण ते म्हातारे असतात...म्हणून तर ते सकू मकू आहेत...समजलं का....अन आता done...आपणच डिंगऱ्या आहोत" 😂😂😂😂

अन पुन्हा एकदा लेकीने बाबा ला काही कळतच हे सिद्ध केलं. त्यामुळे बाबाला आता लवकरच लेकीकडे शिकवणी लावावी लागणार आहे.🤣🤣🤣🤣

टेन्शन!!

Edit Posted by with No comments

काही दिवसांपूर्वी आधार कार्ड काढण्यासाठी लेकीला घेऊन पौड रोड च्या महा इ सेवा केंद्रात गेलो होतो.घरातुन निघताना आम्ही दोघे दंगा करतच निघालो होतो.पौड रोड ला पोहचेपर्यंत लेकीने मस्त झोप काढून घेतली.मला वाटलं होतं झोप झाल्यावर पर्णवी अगदी फ्रेश होईल पण झालं उलट च ती एकदम शांत होती.नेहमी प्रमाणे तिला हसवण्याचा प्रयत्न केला पण उपयोग शून्य. अन मग त्यानंतर चा आमचा हा संवाद 😊

मी: पर्णा ....काय झालं बच्चा?

पर्णवी : .......

मी : तू बोलत का नाही आहेस ?

पर्णवी : .........

मी : तुला भूक लागली आहे का?

पर्णवी: नाही

मी : मग काय झालं बच्चा...तू बोलत का नाहीस

पर्णवी : अरे बाबा ...मला टेन्शन आलंय

मी : ( हे ऐकून आता मला टेन्शन आलं) ऑ... तुला टेंशन आलंय.... टेन्शन म्हणजे काय रे बच्चा ?

पर्णवी : काय रे बाबा तुला टेन्शन पण माहीत नाही....टेन्शन म्हणजे टेन्शन रे...ते असत...

मी : बर....तुला कसलं टेन्शन आलंय?

पर्णवी : नाही माहीत.... पण ते असंच येत असत रे....

आमचं हे बोलणं सुरू होतं तेवढ्यात शिवशाही गाडी समोरून गेली...तोच पर्णवी मोठ्याने ओरडत....बाबा....बाबा ....ती बघ घोड्यांची गाडी...अन त्यानंतर मग आमची गाडी ट्रॅक वर आली अन पुन्हा मस्ती सुरु 😊😊😊

आता या एवढ्याशा जिवाला कसलं टेन्शन अन कसलं काय ....पण ती निरागसता हे सारं बोलताना ते मोठ्या माणसांरखे भाव खूप सुखावून जात होते....बाजूच्या एवढ्या गजबजाट ही हे सुख अगदी भर भरून अनुभवत होतो...अस वाटलं हे क्षण अशेच घट्ट पकडून मुठीत बंद करून ठेवावे. 😊

21 January 2019

डबा

Edit Posted by with No comments

शुक्रवारी लेकीला शाळेत स्नॅक्स मिळतात त्यामुळे रिकामा डबा द्यावा लागतो.काल दुपारी शाळेतून आल्यावर नेहमीप्रमाणे लेकीचा कॉल झाला.काल शाळेत गोड पुरी मिळाली होती त्यामुळे स्वारी एकदम खुषीत होती.शाळेतील बाकी सर्व update अन बडबड झाली. आता आऊ सोबत मावशीला भेटायला जातोय त्यानंतर मग आत्तू कडे राहयला जाणार .त्यामुळे उद्या मला घ्यायला ये असा धमकीवजा आदेश मिळाला अन मग फोन बंद केला.मला वाटलं होतं हे प्रकरण इथं च संपलं पण अस काही नव्हतं. पिक्चर तो अभी बाकी था।

संध्याकाळी ऑफिस वरून घरी आलो तेव्हा नेहमी सारख स्वागत काही झालं नाही...पर्णवी नसल्याने घर एकदम शांत झालं होतं...खूपदा हवी हवीशी वाटणारी शांतता आज खूप त्रासदायक होती..आई पर्णवी च्या दिवस भरातील उचापती सांगत होती (अगदी तुझ्या सारखी च आहे,तू जश्या बारीक खोड्या करायचा अगदी तश्याच खोड्या काढते...हा डायलॉग पण ऐकवून झाला 😂😂😂) अन त्यानंतर मग आमचं रात्रीच जेवण सुरू झालं. अर्ध जेवण झालं अन मग आई ने सांगितलं अरे, पर्णवी ने तुझ्यासाठी डबा ठेवलाय तो घे अन बघ काय आहे ते. तसाच उठून गेलो अन डबा घेऊन आलो. डबा उघडून पाहिला तर त्यात एक पुरी तशीच तिने माझ्यासाठी ठेवली होती. अन जाताना आईला सांगितलं होतं..."आजी, बाबा आला की त्याला ही पुरी दे.अन ही पुरी फक्त बाबा साठी आहे तुम्ही कोणी खायची नाही असं आजी अन आजोबा दोघांना बजावून गेली होती."

ती गोड पुरी खाल्ली अन पोट अन मन दोन्ही कस एकदम फुल्ल झालं होत.शाळेत मिळालेल्या खाऊ मधील अर्धा खाऊ माझ्यासाठी ठेवणारी पर्णू काही केल्या डोळ्यासमोरून जात नव्हती.तिच्या विचारात केव्हा झोप लागली ते समजलं च नाही.

अस म्हणतात लेकीचा सर्वात जास्त जीव बापावर असतो ते काही चुकीचं नाही.

20 January 2019

पर्णवीची डायरी!!

Edit Posted by with No comments

2015 ला एका परीने आयुष्यात प्रवेश केला अन नव्या जबाबदारीच्या सोबत एका धमाल नात्याची सुरुवात झाली.

मागील चार वर्षांत पर्णवी ने खूप सारा आनंद ,खूप अशा धमाल आठवणी दिल्या आहेत. तिच्या सोबतचा प्रत्येक क्षण म्हणजे सुखाचा वर्षाव असतो. बोबड्या बोला पासून झालेली सुरवात आता अखंड बडबडत राहण्या पर्यंत पोहचला आहे.

तिचे निरागस बोल कधी कधी चकित करणारे असतात तर कधी खळखळून हसवणारे असतात.

त्याच निरागस बोलांना शब्दबद्ध करण्याचा हा लहानसा प्रयत्न..... बाप लेकीच्या नात्याचा अनोखा प्रवास अन या प्रवासात असणारी धमाल ,मस्ती अन मजा!!!