21 September 2020

गप्पाष्टक - 01

Edit Posted by with No comments
पर्णवी अन मी अस आम्ही दोघे असतो तेव्हा आमच्या गप्पा ना काही विषय असतो काही संदर्भ नसतो कुठून सुरू होईल अन कुठे संपेल याची खात्री नाही. मग या गप्पा कधी आंघोळ करताना, तर कधी बेड मध्ये, कधी खिडकीत ,कधी गाडीवर,कधी झोपताना थोडक्यात बोलायचं तर स्थळ,काळ,वेळ वगैरे च्या पलीकडे हे सारं असतं. अशाच काही गप्पा लिहण्याचा हा प्रयत्न.

वेळ: संध्याकाळ 7  स्थळ : बेडरूम

मी माझ्या कामात नेहमी सारखा बिजी होतो.पेंडिंग काम उरकवत होतो. त्याचवेळी बाजूला पर्णवी बेडवर लोळत पडली होती...काही तरी आपलं नेहमी सारख बडबड सुरू होती बहुतेक गाणं की काय म्हणत होती.माझं काही लक्ष नव्हतं.

मग अचानक आमच्या गप्पा सुरु झाल्या....

"बाबू...तू एवढं काम का करतोस?"

"मला ऑफिसमध्ये आहे खूप जास्त काम मग करावं लागतं..."

"तुला सांगू का बाबी...तू किनई टीचर व्हायला हवं होतं..."

"का बरं....मग काय झालं असत...."

"अरे..बाबी...मग तुला खूप जास्त काम करायला लागल नसत..."

"अग अस काही नाही नसत....टीचर्स ला पण खूप काम असत...ते काय सोपं आहे होय..."

"सगळ्यांनाच खूप काम असत का...."

"हो मग...तू बघतेस ना...आपल्या आजू बाजूला किती लोक करत असतात...अन वेग वेगळी लोक असतात....अन प्रत्येक जण त्याला आवडत तस त्याप्रमाणे काम करतो..."

"म्हणजे तुला पण तुझं काम करायला आवडत..."

"हो....मला माझं जे काम आहे ते मला आवडत म्हणून मी करतो...अन मी लहान होतो तेव्हाच ठरवलं होतं की मी इंजिनिअर होणार ....त्याप्रमाणे मी झालो सुद्धा...."

"अच्छा...म्हणजे जस मला डॉक्टर व्हावस वाटत तस का... मी पण ठरवलं आहे की मी डॉक्टर होणार...."

"अस होय....होशील की तू डॉक्टर... पण तुला तेवढा अभ्यास पण करावा लागेल...."

"बाबी....ते बिल्डिंग च काम करतात त्यांना पण खूप काम असत ना..ते कसं ठोकतात ना..."

"हो...त्यांना पण खूप काम असतं... अन ते पण अगदी मनापासून आवडीने ते काम करतात...."

"पण बाबी त्यांना दुःखत असेल का रे ? अवघड असेल ना ते काम..."

"हो....पण ते करतात...."

"बाबी...ऐक मी ना नर्स होणार आहे ....."

"अग पण आत्ताच तर तू म्हणाली होती की डॉक्टर होणार त्याच काय झालं...."

"नाही आता ते नाही....मला नर्स च व्हायचं आहे...."

"पण का ग तुला नर्स का व्हायचं...."

"अरे बाबी....ते किनई पिंक ड्रेस घालतात...अन डोक्याला छान टोपी लावतात अन त्यांना ती किती छान ट्रॉली असते....मला तिला फिरावयला खूप आवडतं म्हणून मी नर्स होणार...." 🤣🤣🤣🤣🤣

इथेच मग आमच्या गप्पांना जरा पुर्णविराम लागला अन मी परत आपला माझ्या कामाला...😊




18 September 2020

आठवण 🤗

Edit Posted by with No comments
Work From Home असेल त्यावेळी पर्णवी सतत आपली आजूबाजूला दंगा करत असते.कधी तरी दंगा करताना तिला म्हणालो होतो की, चिकू मी ऑफिसमध्ये असतो तेव्हा मला तुझी खुप आठवण येते.मी तुला खूप मिस करतो.तेव्हा तिने फक्त ऐकून घेतलं होतं असं काय बाबी...अस म्हणून तिथेच आमचं बोलणं संपलं होत.

मला वाटलं होतं की ही विसरली असेल...पण छे... आमची मेमरी एकदम तुफानी आहे...बरोबर सगळं लक्षात असतं अन योग्य वेळी मग बरोबर आठवतं...तर त्याच झालं असं की मागच्या आठवड्यात तीन आठवड्यानंतर ऑफिसला जाणार होतो. रविवारी रात्री मी बेडरूममध्ये माझं आपलं काम करत बसलो होतो तेच पर्णवीच आगमन झालं. अन म्हणे...

" बाबी, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे....पण हे सरप्राईज फक्त आपल्या दोघांमध्ये ठेवायचं कोणाला सांगायचं नाही..."

मी म्हणालो..." ठीक आहे...चालेल...कोणाला सांगणार नाही..."

मग हळूच जाऊन बेडरूम चा दरवाजा बंद केला अन म्हणे...
" डोळे बंद कर....हात पुढे कर....अन मी सांगेपर्यंत डोळे उघडायचे नाही..."

आदेशानुसार मी आपला डोळे बंद करून हात पुढे करून सरप्राईज ची वाट बघू लागलो.तोच हातावर काही तरी ठेवलं अन पुढचा आदेश आला.."हं...आता उघड डोळे..."

पाहतोय तर हातावर पेन्सिलची लहान कॅप होती...आता हे काय नवीन... अन हे कसलं सरप्राईज ...असा माझा आपला विचार सुरू झाला.

तोवर पुढंच बोलणं एकदम हळू आवाजात सुरू झालं...
"बाबी आता ऐक... मी जे सांगते आहे ते फक्त तू एकटा असताना करायचं....कोणी आलं तर लगेच लपवायच... कोणाला सांगायचं नाही अन कोणासमोर हे करायचं पण नाही...समजलं?"

"बर... चालेल...कोणाला सांगणार नाही....."

"तर ऐक... तुला ऑफिसमध्ये माझी आठवण येते की नाही...मग जेव्हा तुला आठवण येईल तेव्हा ना तू हा टायगर असा हातात पकडायचा अन डोळे बंद करायचे.त्यानंतर मग तू लहानपणीची मी आठवायची....अस केलंस ना की मग लगेच तुला दिसायला लागेल...मग तुला बोअर पण होणार नाही...समजलं.." 😇

"आता हे व्यवस्थित तुझ्या बॅग मध्ये ठेव अन आत्ताच ठेव नाही तर सकाळी विसरून जाशील..." अस म्हणून मला ती कॅप माझ्या पाकिटात ठेवायला लावली. इतकंच नाही तर सोमवारी सकाळी जाताना अर्धवट झोपेतुन उठून कॅप घेतली आहेस ना याची खात्री केली.😄😄

संध्याकाळी ऑफिसवरून आल्यावर लगेच चौकशी पण झाली..."बाबू ...केलंस ना तू? मी सांगितलं होतं तस अन दिसले ना मी तुला..."

"बघ...मस्त वाटलं ना तुला...."

मी जस हो म्हणालो...तस इतकी खुष की झाली की बस्स..."

तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून खूप समाधान वाटलं.लेकी किती लहान लहान गोष्टींत बापाची काळजी घेत असतात..😊😊😊😊