23 April 2019

पेंटिंग!!

Edit Posted by with No comments
काल सुट्टीचा पहिला दिवस होता. लेकीने हे स्टोन पेंटिंग केलंय अर्थात माझ्यासाठी च आहे 😉

पर्णवी ला विचारलं काय बनवलं आहे .....तर "तुम आम खाओ ना..."असा भाव चेहऱ्यावर ठेऊन बाबा अरे पेंटिंग आहे रे...ते असंच असतं.... म्हणून विषय संपवला 😂😂😂🤣🤣🤣

थोडक्यात काय आहे ते आपलं आपण ठरवावं ....शास्त्र असतं ते 😆😆






जिंगल बेल !!!

Edit Posted by with No comments
पर्णवीच नवीन रिमिक्स....या गाण्याच्या गीतकाराचा अन गाण्याचं उगमस्थान या दोघांचा शोध चालू आहे.😂😂😂😂

जिंगल बेल ....जिंगल बेल....जिंगल बेल...

जिंगल ऑन द वेल.....जिंगल बेल...जिंगल बेल....

सांताक्लॉज च्या डोक्यावर पतंजली च तेल....

😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣

पन्हाळा गड...

Edit Posted by with No comments
सकाळी सर्व आवराआवर झाल्यावर सुजाता ने पर्णवी ला सांगितलं की आता खूप मस्ती झाली जरा अभ्यास कर यानंतर झालेला संवाद....

पर्णवी : मला बाहेर जायचं आहे

सुजाता : कुठे जायचं आहे तुला?

पर्णवी: गडवर [गडावर हे बोलण्या ऐवजी त्यासाठी गडवर हा प्रतिशब्द]

सुजाता : कोणत्या गडवर?

पर्णवी : पन्हाळा गडवर जायचं आहे

सुजाता : कशाला?

पर्णवी : शंभू बाळ माझी वाट पाहत आहेत.

सुजाता : का बर...काय झालंय.

पर्णवी : दिलेरखान आलाय ना ग आऊ

😂😂😂😂😂😂😂😂😂😂

घ्या....आता काय बोलावं...

नसते उद्योग...

Edit Posted by with No comments
शनिवार संध्याकाळ जरा कंटाळवाणीच होती.मी अन पर्णवी हॉल मध्ये बसलो होतो.मी आपलं पुस्तक वाचत बसलो होतो अन पर्णवी च काही तरी खुडबुड चालली होती.

ब्लॉक्स, डॉल ,पुस्तक इ इ चा अगदी शिस्तबद्ध रित्या पोस्टमॉर्टेम करून झालं होतं. अन हे करताना तोंडाचा पट्टा अखंड सुरू होता.मी वाचता वाचता मधूनच हूं.... हूं... हूं... करून प्रतिसाद देत होतो अन सोबत लक्ष पण ठेऊन होतो....कारण नजर हटी दुर्घटना घटी हे आम्हाला शब्दशः लागू आहे...जरा थोडं दुर्लक्ष झालं रे झालं की काही तरी पराक्रम गाजवणारच....असो...

अस थोडा वेळ सुरू होतं... पण बाबा घरात आहे अन अस शांततेत पुस्तक वाचतोय काही एक दंगा नाही हे पर्णवी मातेला पचनी कस पडेल....त्यामुळे बाबा नीटसं लक्ष देत नाही आहे म्हणल्यावर सगळं सोडून पुढ्यात येऊन बसली...अन मग सुरू झालं....

"बाबु....ऐक ना...मी काय करू....."

मी: "ते ब्लॉक च पार्क कर की....नाही तर मग आर्वी (आमची बाहुली) बरोबर खेळ..."

"नको ना रे ते....दुसरं काही तरी...."

मी: "मग ते बुक्स आहेत त्या मध्ये कलरिंग करतेस का..."

"नको....ते तर सकाळीच केलं ....आता नको...."

मी : " मग झायलो फोन देऊ का....त्यासोबत खेळतेस का"

"नको ते पण नको....आपण काही तरी वेगळं करूया ना...."

मी :" आता वेगळं म्हणजे काय रे बच्चा....सर्व तर विचारलं पण तुला काहीच नको आहे..."

"अरे बाबू....वेगळं ..वेगळं...म्हणजे काही तरी...." [हे अगदी डोळे मोठ्ठ करून चेहऱ्यावर डांबरट अन खोडकर भाव...ते पाहूनच काही तरी भन्नाट डोक्यात चाललंय हे लक्षात आलं ]

"म्हणजे किनई..... [न वाजणारी हाताची चुटकी वाजवत]....आपण दोघे की नाही आत बेडरूम मध्ये जाऊ अन नसते उद्योग करू...."🤣🤣🤣🤣😂😂😂

मी :" नसते उद्योग.... अन आपण दोघे....🤦🤦🤦"

"हो...आपण नसते उद्योग करू....म्हणजे मग आऊ येईल....तुला ओरडेन.... अन मग मी सगळं आवरेन...." 🤣🤣🤣🤣🤣

[कसली भन्नाट स्क्रिप्ट आहे की नाही.......हिरो कोण तर स्वतः अन ओरडा कोण खाणार तर बाबा...😂😂😂😂...बादवे हे "नसते उद्योग" म्हणजे...आमच्या तोंडी असलेला शब्द.... तो असा साभार परत झाला होता]

चर्चा...

Edit Posted by with No comments
अतिशय गोपनीय अन उच्च अशी चर्चा अर्थात ती पण सांकेतिक भाषेमध्ये. जगातील कोणतीच गुप्तहेर संघटना काय मेसेज आहे हे शोधू शकणार नाही.

हा कोणामधील संवाद आहे अर्थात मी आणि पर्णवी. हे रोजच आहे दुपार नंतर हा आमचा असा संवाद होतो.

जास्त काही नाही ....बाबू काय करतो आहे...जेवण झालं का...luv u...हे लिहलं आहे 🤣🤣🤣😂😂😂



दोन भारत!!

Edit Posted by with No comments
आजचं ज्ञान !!

"बाबा....तुला माहितये का आपण दोन दोन भारतात राहतो".

"नाही बच्चा....अरे भारत आपला देश अन महाराष्ट्र आपलं राज्य...अस दोन दोन देश नसतात"

"अरे बाबा...तुला कसं कळत नाही...दोन भारत आहेत रे"

आता अस्मादिक संपूर्ण आत्मविश्वासात....कसा बोका सापडला...अशा अविर्भावात...

"दोन दोन भारत कस सांग बर....अस कधी असत का?"

आता हिला काही उत्तर देता येणार नाही...शेवटी विजय आपलाच असा विचार चालू होताच तोच उत्तर आलं...

"अरे पाणी कस असत दोन दोन....पिण्याचं अन शंभो करायचं..तसच दोन दोन भारत असतात रे " 😂😂😂😂

या लॉजिक ने बाबाची विकेट पडली होती....पण त्यानंतर जवळ जवळ अर्ध्या तास लेकीला देश अन राज्य समजावयला गेले.

कॉपी कॅट !!

Edit Posted by with No comments
मागच्या चार वर्षात पर्णवी मुळे बोलताना खूप काळजीपूर्वक बोलायला लागत.आमची frequency इतकी strong आहे की थोडसं जरी वेगळं बोललं तरी लगेच catch केलं जात. पर्णवी झाल्यापासून विशेषतः बाराखडी मधील शब्द तर पुर्णतः बंदच आहेत...काही विशिष्ट मित्रांचा फोन आला तर तो गुपचूप घ्यावा लागतो किंवा एकदम सज्जन भाषेत बोलावं लागतं...असो..😉😉

मात्र खूपदा आजी आजोबांच्या बोलण्यात कडमडू नको, धडपडू नको यासारखे किंवा मग जे त्यांच्या पिढीत वापरले जायचे असे काही टिपीकल शब्द वापरले जातात.मग याचा योग्य वेळी वापर केला जातो ...असाच एक अनुभव 🤣🤣

रविवारी सकाळी माझा चहा बनवून झाला होता पण आई चा काही आवाज येईना म्हणून हॉलमध्ये खेळणाऱ्या पर्णवी ला विचारलं.. "पर्णवी....आजी कुठाय ग? बघ बर...मला चहा द्यायचा आहे."

पलीकडून आलेलं उत्तर...

"बाबू....आजी कुठे धडपडायला गेली आहे काय माहित...मला तर नाही दिसत".

यावर जरा मोठ्या आवाजात मी म्हणलं...."पर्ना...काय म्हणालीस??"

पर्णवी - "अरे बाबू...कुठे काय..गंमत केली रे....मी तर म्हणते आहे...आजी तर इथे नाहीये...खाली बाप्पा ला गेली आहे "

आपण बोलायला चुकलोय हे लक्षात आल्यामुळं लाडीगोडी करून बाबाला गुंडायला सुरुवात झाली होती 🤣🤣😂😂

बाबाचा पचका....

Edit Posted by with No comments
सकाळी नेहमी प्रमाणे शाळेची गडबड सुरू होती.पण पर्णवी काही नेहमीच्या मूड मध्ये नव्हती.मी पण ऑफिसच्या गडबडीत होतो त्यामुळे जरा दुर्लक्षच केलं.मला वाटलं होत की झोप झाली नाही म्हणून स्वारी नाराज आहे.

तोच समोरून सर्जिकल स्ट्राईक झाला.बाबू अरे तुला माहितये का माझी स्कुल मधील फ्रेंड आहे ना ती मला म्हणते तू माझ्या पेक्षा ब्लॅक आहेस अन ती खूप व्हाइट आहे. ती सारखी मला ब्लॅक म्हणते...तूच म्हणतो ना सर्व कलर गुड असतात.

ऐकल्यावर दोन मिनीट मी पण हँग झालो होतो.कारण अनपेक्षित पणे एक वेगळाच बाऊन्सर आला होता.आता काय बोलावं विचार करत होतो.तोच अगदी छोटूस तोंड करून..."बाबू बोल ना रे..."

"बच्चा....अस काही नसत रे....सर्व कलर्स गुड च असतात...."

" अन तुला जर परत तुझी फ्रेंड अस म्हणाली ना तर तिला म्हणावं...असू दे ब्लॅक...त्यात काय एवढस....विठु माऊली ब्लॅक आहे....स्वामी आजोबा पण ब्लॅक आहेत...अन कृष्ण बाप्पा पण ब्लॅक आहे..."

मी अस म्हणल्या बरोबर लेकीच्या चेहऱ्यावर जो काही उत्साह आला....वाटलं वाह...क्या बात है।....अभिमानाने ऊर भरून आलं...पण कसलं काय... हा आनंद फार काळ टिकला नाही...

कपाळावर हात आपटत लेक म्हणे....." अरे बाबू....तुला कस रे कळत नाही....कृष्ण बाप्पा काय ब्लॅक असतो का?....तो तर ब्लु असतो रे...ब्लु...समजल का...."

आता एवढ्यावर गप्प बसावं ना....पण आता बाबाचा पंचनामा व्हायलाच हवा ना... सुजाता कडे पाहत जोराने म्हणे...." आऊ...ऐकलं का बाबू काय म्हणाला ते...म्हणे कृष्ण बाप्पा ब्लॅक असतो...ब्लु असतो की नाही...बाबू ला तर काहीच कळत नाही..." अन त्यानंतर मोठ्याने खी....खी...खी...

अशा प्रकारे मूळ मुद्दा बाजूला राहून बाबा चा झालेला पोपट पाहून सगळं कस आनंदी आनंद गडे वातावरण झालेलं असत 😉😉

व्हेम...

Edit Posted by with No comments
संध्याकाळी नेहमी प्रमाणे आमचा दंगा चालू होता. अचानक पर्णवी म्हणे....

"बाबू, अरे तुला माहितये का आज आम्ही व्हेम केला "

" हो का....अरे वाह...."

मला खर तर व्हेम म्हणजे काय ते समजलं नव्हतं...पण नेहमीप्रमाणे पचका नको म्हणून पटकन गुगल भाऊला विचारलं हे व्हेम म्हणजे काय. पण तिकडे पण पोपट झाला.

अखेरीस पर्णवी मातेस शरण गेलो...अन म्हणालो..

"बच्चा...व्हेम म्हणजे काय केलंत रे तुम्ही नक्की..."

" अरे...व्हेम रे व्हेम...बाबू..."

"मला नाही कळत आहे...तुम्ही नक्की काय केलंत ते जरा नीट सांगतोस का..."

"अरे बाबू....ते नाही का...आपले हात अप डाउन करतो ते..."

अस म्हणून हातवारे करून दाखवलं.

मग लक्षात आलं ते व्हेम म्हणजे ...." व्यायाम " होत 🤦🤦🤦

मेकी पुराण...

Edit Posted by with No comments
आजच अमूल्य ज्ञान.....

चिकु हल्ली खूपदा नाक ड्राय झाल्यामुळे नाकात बोट घालत असते. त्यामुळे सर्वांना तिच्यावर लक्ष ठेवण्याची एक ड्युटीच आहे.खूपदा मग मी चिकुला चिडवण्यासाठी कोणाला फोन करते आहेस, नाकाचा वडा होईल वगैरे अस काही बोलत असतो.

सुजाता पण चिकुला खूपदा समजावत असते.पण ऐकेल ती पर्णवी काय? प्रत्येक गोष्टीला काही ना काही अस भन्नाट स्पष्टीकरण देते की एकदम बोलती बंद होते.

सुजाता तिला समजावून सांगत होती तर पर्णवी म्हणे....

"अग आऊ....आपल्या नाकात मोठा खडक असतो ....तो फुटतो अन मग त्याचे लहान लहान बॉम्ब होतात अन मग ते म्हणतात...पर्णवी... आम्हाला बाहेर काढ..म्हणून तर मग मी त्यांना बाहेर काढण्यासाठी नाकात बोट घालते..."🤣🤣🤣🤣😂😂😂😂

#म्हणजे_आम्ही_येडे

पसारा..

Edit Posted by with No comments
स्थळ - बेडरूम.

वेळ - आत्ताची च थोड्या वेळापूर्वीची.

बेडरूम रुपी समरांगणावर लेकी ने संपूर्ण ताकदीने अतुल्य असा पराक्रम गाजवला आहे. टेंट ,किचन सेट ,पझल्स ,बुक्स अस जे काही आहे ते सगळं संपूर्ण बेड रूम मध्ये अगदी तब्येतीत पसरवून ठेवलं आहे.काही वेळात गृहमंत्री आले अन एकंदरीत सर्व परिस्थिती चा अंदाज घेऊन लगेचच आदेश सोडला..." पर्णवी...सर्व पसारा आवरायचा आहे....सगळं मला जागेवर अन नीट आवरलेलं पाहिजे."

एकंदरीत वातावरणाचा अंदाज घेत पर्णवी मातेने नेहमी प्रमाणे अशा वेळी संकटमोचक म्हणून धावणाऱ्या बाबा कडे कटाक्ष टाकला अन त्यानंतर चा आमचा संवाद....

अगदी लाडी गोडीत येऊन...मूळ प्रश्नाला हात न घालता...मस्त पैकी मिठी मारून....गालावर एक पा घेत...बाबू....बबुडी ...बाबडी अस करत वातावरण निर्मिती करत...

"बाबू....हे बघ ना मी काय केलंय..."

"हे बघ...किचन च कस बनवलं आहे...."

"अरे हे बार्बी च बूट पाहिलं का..."

"बाबू...मी हे बघ मी आता टेंट मध्ये जाते हं...."

"बाबू...मी कुठाय शोध बर...."

अस बरंच काही सुरू झालं.

मग टेंट च्या कोपऱ्यातुन ..." बाबू ऐक ना...."

एकदम केविलवाणा चेहरा करत...."बाबू....किती रे पसारा झालाय...तू आवरणार ना... तू कर ना रे बाबा...अन झालं की मग आपण दोघे टेंट मध्ये झोपू या ना...."
[ कुठून अन कोणाकडून एवढा नाटकीपणा आलाय ते देवाक ठाऊक...ऑस्कर जिंकू शकेल अशी acting असते 😉😉]

मी : बच्चा....हा एवढा पसारा कोणी केला...

पर्णवी : मी केला ना रे

मी : मग कोण आवरणार हे सारं...

पर्णवी : तू....बाबू...अस करणार ना....आवरणार ना बाबू...कर ना रे....😂😂
[अगदी फुल ऑन इमोशनल....बाबाची विकेट कशी घ्यायची याची एकदम परफेक्ट ट्रिक लेकीला जमली आहे.….गोड बोलुन बरोबर कामाला लावणार...🙈🙈]

शेवटी काय बिच्चाऱ्या बाबा ने सगळा पसारा आवरून घेतला 🤣🤣🤣

धडा!!

Edit Posted by with No comments
रोज ऑफिसवरून घरी येताच क्षणी पर्णवी चा अन माझा किमान किमान 10-15 मिनीट नॉन स्टॉप दंगा असतो.मी आल्याची चाहूल तिला एकदम परफेक्ट लागते.गेटचा आवाज झाला की दरवाजा मागे लपायच मग मी गुपचूप दरवाजा उघडायचा अन मग तिला शोधायचं नाटक करायचं. शोधलं की मग थोडासा डान्स...थोडी लुटपुटीची कुस्ती...मग शाळेतील,बालभवन च्या गोष्टी...अभ्यास काय केला...अन आवर्जून मी अगदी कुणालाच त्रास दिला नाही...एकदम शहाणी वागले हे सांगणं...हा असा आमचा रोजचा नित्यनेमाचा कार्यक्रम असतो.

बुधवारी ऑफीस वरून आलो तेव्हा पर्णवी drawing करण्यात एकदम गुंग होती त्यामुळे मी तिला उगाच डिस्टर्ब नको म्हणून किचन मध्ये गेलो.[म्हणलं drawing चाललं आहे तर चालू दे आपण उगाच तिच्या मध्ये कशाला जायचं असा फक्त विचार होता.] अन सुजाता सोबत बोलत होतो तोच बाबू...म्हणून पर्णवी ने पायाला मिठी मारली अन त्यानंतर उचलून घे अस खुणावल....उचलून घेतल्यावर अगदी अनपेक्षित असा प्रश्न आला....

दोन्ही इटूकल्या हातात माझा चेहरा पकडला अन म्हणे...
"बाबू....काय झालं रे आज?"

मी म्हणलं..."कुठे काय....काहीच नाही...."

"नाही...काही तरी झालंय....आजच तर आल्यावर तू माझ्याशी बोललाच नाही..." अस म्हणून हातांचा गळ्याभोवती वेढा पडला अन खांद्यावर डोकं आलं...

मग अलवार हाताने थापटत तसाच बेडरूममध्ये गेलो अन मग समजावलं अस काहीच नाही बच्चा......अन त्यानंतर त्या लहानशा मिठीत बाप लेकीचा निःशब्द असा एक संवाद सुरू झाला....😊😊😊

जरावेळ असाच मिठीत गेला मग जेव्हा तिची खात्री पटली की सगळं नॉर्मलच आहे तेव्हा कुठे गाडी ट्रॅक वर आली ...😍😍😍

आपल्याला उगाचच वाटत की लहान पिल्लांना काही कळत नाही.मला तर वाटत उलट त्यांनाच जास्त कळत कारण ते फक्त वर्तमान जगत असतात अगदी स्वच्छंदीपणे.....माझ्यातील बापासाठी मात्र हा एक धडा होता....आयुष्यभरासाठी 😊😊

आंघोळ!!

Edit Posted by with No comments
पर्णवी ला स्कुल ला जेव्हा पासून सुट्टी लागली तेव्हापासून सात शिवाय झोपेतून न उठणारी लेक आता 5.30 लाच जागी होते आहे.अन ते पण एकदम फ्रेश मूड मध्ये....शाळा चालू होती तेव्हा सकाळी झोपेतून उठवणं म्हणजे सर्वात अवघड काम.कधी कधी तर एवढी गाढ झोपलेली असायची की झोपेतून उठवायला जीवावर यायचं. सुट्टी लागल्या नंतर मात्र काय झालं माहीत नाही 5.30-6 लाच पर्णवी झोपेतून जागी होते अन तेव्हा पासून दंगा सुरू होतो...."अरे काय झोपताय....सकाळ झाली ....उठा लवकर....." वगैरे....वगैरे सुरू असत.

आज पण असच झालं...सहा वाजता पर्णवी मातेचा अलार्म वाजला अन तेव्हा पासूनच मग गोष्ट सांग...आज स्विमिंग आहे का रे...तुला ऑफिस आहे का...माझ्या डॉल ला आज तरी छोटा पाळणा घेऊन ये....हे अस आमचं सुरू होत...माझी पण झोप गेली अन मग जरा वेळ मस्ती करून मी आंघोळीसाठी साठी जायला निघालो तर म्हणे मला पाठकुळी घे अन किचन मध्ये सोड....आदेश आला म्हणल्यावर पालन करणं आवश्यकच होत...पर्णवी ला किचन मध्ये सोडलं अन मी आंघोळीसाठी जायला लागलो तर सुजाता ने लगेच पर्णवी ला सांगितलं....जा बाबा सोबत शंभो करून घे....

यानंतर पर्णवी मातेने दिलेलं आजच ज्ञानामृत....

"आऊ....शंभो काय???....(हा एकदम स्टाईल मधला डायलॉग)

सुजाता: अग....बाबा शंभो करायला जातोय ना तर तू पण आज त्याच्या सोबतच शंभो कर...

"अग आऊ....पण मी आत्ताच उठले आहे ना...."

सुजाता: म्हणून काय झालं...जा पटकन आवर

" झोपेतून उठल्यावर लगेच कधी शंभो करतात का??"🤔🤔

सुजाता : मग काय करतात??

" अग आऊ...झोपेतून उठलं की आधी खाऊ खायचा.....मग मस्ती करायची असते.....अन त्यानंतर मग शंभो करायचा असतो...."🤣🤣🤣🤣

हे ऐकल्यावर मग मी आपलं हळूच म्हणालो...." बरोबर हाय ग माझे माय.....शास्त्र असत ते....😂😂😂😂"

समानता!!!

Edit Posted by with No comments
पर्णवी अन तिच्या समवयस्क मुलं बघताना माझं एक लहानस निरीक्षण अस आहे की ही पिढी जी आहे ते त्यांच्या मतांवर ठाम असतात अन ते त्यांच म्हणणं पटवण्यासाठी जे लॉजिक लावतात ते तर अफलातून असतं. या सोबत त्यांच्यात थोडासा बंडखोरपणा स्वभावात आहे.आपल्या लहानपणी आपल्याला दोन फटके दिले की आपण चिडीचूप पण आता कालानुरूप यात बदल झालाय.

आज दुपारी माझ्या मित्राची मुलगी (रितिका) पर्णवी कडे खेळायला आली होती. दोघीत साधारण एक वर्षांचा फरक आहे.पर्णवी एक वर्षाने लहान आहे. दोघींच्या असल्या धमाल गप्पा सुरू होत्या, अगदी मोठी माणसं बोलणार नाहीत अशा टोन मध्ये यांची चर्चा चालू होती.

जेवणाची वेळ झाली म्हणून मग दोघींना घेऊन जेवायला बसलो.दोघींच्या प्लेट मध्ये जेवण वाढलं अन मग आमचं जेवण सुरू झालं.मी फक्त लिसनिंग मोड वर होतो. पर्णवी दोन्ही हातांनी जेवण करत होती. तोच रितिका तिला म्हणे...

"अग...अस दोन्ही हातांनी जेवू नये...फक्त राईट हँड नेच जेवायचं हसत."

"अस काही नसत....आपण जेवायचं फक्त " इति पर्णवी

"नाही....माझ्या पपा नी सांगितलं आहे की राईट हँड ने जेवायचं..." रितिका

"अग...कस पण जेव...दोन्ही हाताने जेवण केलं तरी चालतं..." पर्णवी

मी शांतपणे दोघींच्या बोलण्या कडे लक्ष देऊन ऐकत होतो. दोघींपैकी कोणी एक माघार घेईना.त्यामुळे बॉल आता माझ्या कोर्टात येणार हे लगेच लक्षात आलं. तोच रितिका म्हणे...
"काका..पर्णवी ला सांगा कोणत्या हँड ने जेवायचं असत....right ने की नाही...ते good असत ना'.

"हो राईट हँड ने च जेवायचं असत...बरोबर आहे."- मी

"अस कस रे बाबू...तुच सांगतो ना सर्व समान असत...मग दोन्ही हातांनी समान जेवायचं....एकाच हाताने जेवलो तर दुसऱ्या हाताला वाईट वाटेन ना...बरोबर की नाही..अस कधी सर्व एकानेच नाही करायचं"

"हो बच्चा...बरोबर आहे...अस तेवढ्या पुरतं म्हणालो पण उजवा किंवा डावा अस न करता एका हातानेच का जेवायचं हे मला मात्र जरा काही क्षणांत पटवाव लागलं."

लहानपणा पासून सार काही उजव्या हातानेच अन बहुतांश गोष्टी ह्या उजव्या हाताच्या लोकांना सोयीस्कर अशाच पाहत आलो.त्यामुळे उजवा -डावा ऐवजी समानता अन स्वतःला काय सोयीचे हा विचार कधी आलाच नाही. आज मात्र ती झापडं दूर झाली होती.नकळत का होईना एक मोठी गोष्ट शिकायला मिळाली.

नवरा!!

Edit Posted by with No comments
मागच्या आठवड्यात पर्णवी चे फोटो काढत होतो त्यादरम्यान चा माय लेकींचा संवाद.....

पर्णवी :आऊ, तुझं बाबु सोबत लग्न झालंय का?

सुजाता : हो...

पर्णवी: बाबू तुझा नवरा आहे का?😂😂

सुजाता: हो...

पर्णवी : तुला तुझा नवरा आवडतो का?

सुजाता: हो....आवडतो की...

पर्णवी: मला पण तुझा नवरा आवडतो....छान आहे तो...😂😂🤣🤣🤣🙈🙈🙈🙈

मोदी आजोबा!!

Edit Posted by with No comments
वैधानिक इशारा :
1. सदर पोस्ट संपूर्णतः अराजकीय आहे.
2. ह्या पोस्ट साठी कोणत्याही पक्षाच्या आय टी सेल कडून मला पैसे मिळाले नाही आहेत.😉
3. मी स्वतः कोणत्याही पक्षाच्या ideology ला फॉलो करत नाही किंवा कोणत्याही पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता नाही
4. सदर पोस्ट ही केवळ मनोरंजना साठी आहे
5.मी माझ्या लेकीवर कोणत्याही प्रकारचे राजकीय संस्कार करत नाही.
6. "खरा तो एकची धर्म..." या प्रार्थनेवर नितांत विश्वास आहे त्यामुळे आम्ही कोणाचाही द्वेष करत नाही
7. ज्यांना मोदी हे नाव घेताच पित्त खवळणे,डोकेदुखी,पोटशूळ,चक्कर येणे,अस्वस्थ वाटणे इ इ प्रकारचा त्रास होतो त्यांनी वाचण्याचे कष्ट घेऊ नये.
––––––––––––––––––––––––––––––––
काही आठवड्यापूर्वी पर्णवी ची फिल्ड ट्रिप होती त्यामुळे मला शाळेत तिला सोडवायची जबाबदारी अस्मादिकांवर होती.सकाळी पटपट आवरून आम्ही निघालो.गाडी सुरू केल्यापासूनच नेहमी प्रमाणे पर्णवी ची टकळी सुरू झाली होती. ट्रिपल सीट कोण चाललंय....त्यांना पोलीस काका पकडणार का...त्यांच चुकलं की नाही...कोण कोण सिग्नल तोडत आहे...हे अस बरचसं सुरू होत.

आम्ही पद्मावती च्या सिग्नल ला उभे होतो तोच बाजूला एक पीएमटी येऊन उभी राहिली अन त्यावर मोदींचा फोटो होतो.त्या फोटो कडे पाहून मग पर्णवी म्हणे...

"बाबु...तुला माहितये का....मोदी आजोबा...मला गुड गर्ल म्हणतात..."

[हे मोदी आजोबा जे नामकरण आहे ते माझ्या मुळेच झालं आहे...पर्णवी ला मध्यंतरी मुख्यमंत्री,पंतप्रधान,राष्ट्रपती हे सांगत होतो तेव्हा देवेंद्र अन नरेंद्र यात गोंधळ व्हायला लागला...म्हणून मग नरेंद्र मोदी यांच मोदी आजोबा नाव झालं]

मी: "हो काय....का बर....तुला का ते गुड गर्ल म्हणतात..."

"हो...अरे मी रस्त्यावर सु करत नाही....कुठे च कचरा करत नाही अन रस्त्यावर थुंकी पण काढत नाही....मी हट्ट करत नाही....आऊ सोबत दुकानात गेले की हट्ट करत नाही..म्हणून मी गुड गर्ल आहे..."

[मग काय बाबाची कॉलर एकदम टाइट....😀😀😀]

मी :"हो काय....पण मोदी आजोबा तुला केव्हा भेटले...अन केव्हा सांगितलं"

"भेटले नाही रे....मला फोन आला होता त्यांचा....अन ते म्हणाले पर्णवी तू गुड गर्ल आहेस..."
[आम्ही फोन फोन खेळतो त्याचा हा परिपाक 🤦🤦🤣🤣🤣]

अन हे अगदी खर आहे ....पर्णवी बाहेर गेली कुठेच कचरा टाकत नाही ...अगदी घरात असताना सुद्धा कचरा हा सुपली किंवा कचऱ्याच्या डब्यातच जातो.

काही दिवसांपूर्वी आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हा पर्णवी ला सु लागली होती.पण आम्हाला चांगलं वॉशरूम मिळेना म्हणून मग तिला म्हणलं हे इकडे रस्त्याच्या कडेला झाडा जवळ सु कर.पण अगदी भला मोठा नकार होता.डायपर बंद करून बरेच दिवस झाले होते त्यामुळे तो असण्याचा प्रश्नच नव्हता.अखेरीस जेव्हा व्यवस्थित वॉश रुम सापडलं तेव्हाच पर्णवी ने सु केली.😃😃

फक्त याचा एकच त्रास होतो..तो म्हणजे रस्त्यावर किंवा गाडीतून कोणी थुंकल वा कचरा टाकला की मला खूप साऱ्या प्रश्नांना सामोरं जावं लागत....काही दिवसांपूर्वी बिबवेवाडी रोड ला आमच्या पुढे असणाऱ्या कार मधून गुंठामंत्र्याने हे मोठी पिचकारी रस्त्यावर मारली होती तर पर्णवी म्हणे बाबा ते बघ ते काका कसे थुंकले....चल बर तू सांग त्यांना...🤦🤦🤦...तेवढ्यात सिग्नल सुटला म्हणून बर झालं...नाही तर माझं काही खर नव्हतं 🤣🤣🤣😂😂😂