30 December 2019

टाइम मशीन !!

Edit Posted by with No comments

रोज सकाळी आंघोळ,बाप्पा करून झालं की सर्वात आधी आम्हला भिजवलेले बदाम लागतात.सर्वांना सम समान वाटप होत.

दोन दिवसांपूर्वी रात्री बदाम भिजवायचे विसरून गेलं.दुसऱ्या दिवशी सकाळी मग आदेश निघाला...

"आऊ... बदाम दे ग..."

सुजाता ने सांगून दिल बच्चा आज बदाम नाहीये मी रात्री भिजवायला विसरून गेले.आता उद्या देते किंवा कोरडे बदाम खाते का?

"नको...कोरडे नको...मला भिजवलेले हवेत..."

मग थोडा वेळ शांतता होती...थोडा विचार चालू होता...मग पुढचा आदेश आला...

"आऊ...तू आता इंग्लंड ला जाते का?"

सुजाताला दोन मिनीट हे अस काय बोलते आहे हे काही समजलंच नाही म्हणून मग विचारल..." का...मी कशाला जाऊ इंग्लंड ला...काय आहे तिकडे..."

"अग आऊ...तिकडे आता रात्र आहे...तू तिथे जा रात्रीचे बदाम भिजव अन मग घेऊन परत ये..."🤣🤣🤣😂😂😂

कारण बदाम हे रात्रीच भिजवायचेच असतात...हे असलं तुफानी लॉजिक आहे....🙈😂😂😂


27 December 2019

निरोप!!

Edit Posted by with No comments
तीनेक महिन्यांपूर्वी मला ऑफिसच्या कामानिमित्त ट्रॅव्हल करावं लागणार होत.मला दोनेक आठवडे आहेत अन तेवढ्या वेळात पर्णवी ला समजावू असा माझा समज होता तोच एक दिवस अचानक मेल आला की दोन दिवसातच ट्रॅव्हल करावं लागणार होतं.आता मात्र माझी पंचाईत झाली होती की पर्णवी ला कस समजावून सांगायचं.त्या दरम्यान ताई अन अद्वय दोघे पण होते त्यामुळे जास्त काही काळजी वाटली नाही.थोडा वेळयात समजावून होईल अस वाटलं.शनिवारी रात्री निघायचं होत त्यामुळे शनिवारी सकाळी समजावू अस ठरवलं होत.

अखेरीस शनिवार आला,पर्णवी सोबत दुपारी निवांत बोलु अस ठरवलं होत.सकाळी सकाळी मी लिस्ट बनवत बसलो होतो तेव्हा बाजूलाच पर्णवी अन अद्वय बसले होते.तोच पर्णवी म्हणे...

"अद्वय...हे बघ...बाबू आता विमानात बसून जाणार आहे अन तो फाईव्ह डेज झाले की मग येणार आहे म्हणून आजच आपण लॅपटॉप वर गोष्ट बघून घ्यायची....ठीक आहे"

हे ऐकल्यावर मला धक्काच बसला...मी जे सांगायची तयारी करत होतो ते तर हिला अगोदरच माहीत आहे.म्हणून मी आपलं सहजच तिला म्हणालं...

"बच्चू....मी जाणार आहे तुला रे कस माहीत? मी तर सांगितलं नाही...आऊ ने सांगितलं का?"

तर कमरेवर दोन्ही हात ठेवत...मानेला हलकासा झटका देत म्हणे...
"मला सगळं माहीत असत...तू नाही सांगितल ना पण मला माहीत आहे तू मला सोडून जाणार आहेस ते.."

अन हे सांगताना आवाज भरून आला होता.मग अजून वातावरण गंभीर होण्याआधी मी आपलं गंमत सुरू केली.पण दुपार नंतर जस जसं पॅकिंग अन आवराआवर सुरू झाली मग मात्र पर्णवी गप्प गप्प झाली.संध्याकाळी मी सर्व चेक करत होतो तेव्हा बेडरूम मध्ये आली तर मी तिला म्हणालो..

"हे बघ...पर्णवी...मी आता नाहीये....तर कोणाला अजिबात त्रास द्यायचा नाही...आजोबांची अन आजीची काळजी घ्यायची...आऊ ला मदत करायची...शहाण्यासारखं वागायचं...अन रडायचं तर बिलकुल नाही....समजलं." 

यावर काही न बोलता फक्त हूं एवढं च केलं अन तेवढ्यात सुजाता पण आली.मग आमच बोलणं सुरू झालं.तोवर पर्णवी म्हणाली..."बाबू मी बाहेर जाऊ का रे?"

बाहेर हॉल मध्ये बाबा होते त्यामुळे मी म्हणलं ठीक आहे जा बच्चा बाहेर जाऊन खेळ.अन मी माझ आवरायला लागलो तर अचानक आम्हाला हुंदका देण्याचा आवाज आला.अचानक हुंदके कोण देतंय म्हणून मग आम्ही बाहेर हॉल मध्ये गेलो तर तिथं  फक्त बाबा होते अन ते पुस्तक वाचत होते.मग लक्षात आलं आवाज तर किचन मधून येतोय....म्हणून मी तिकडे गेलो तर किचनच्या कोपऱ्यात भिंतीकडे तोंड करून येणार रडू दाबून पर्णवी हुंदके देत होती.खर तर तिला खूप रडायला येत होत पण फक्त मी सांगितलं म्हणून रडत नव्हती.मग मात्र मलाच माझं चुकल्याच लक्षात आलं.मग तिला उचलून घेतलं अन विचारलं...

"तुला रडु येतंय का?"

तर म्हणे ..."हो..."

मग तसच तिला घेऊन बेडरूममध्ये आलो अन म्हणलं रडावं वाटतंय ना मग रड. अस म्हणल्यावर मला घट्ट मिठी मारत खांद्यावर डोकं ठेवत मोठयाने रडणं सुरू झालं.इतक्या वेळ बाबा म्हणाला म्हणून दाबून ठेवलेलं सार रडू बाहेर आलं.दोन चार मिनीट झाले ..मग मीच तिची घट्ट मिठी सोडवत डोळे पुसले अन म्हणाल," पण तुला रडायला काय येतंय मी तर लगेचच येणार आहे.."

तर म्हणे...."बाबू...मला काळजी वाटते रे तुझी..."❤️😍
अस म्हणत जी काही घट्ट मिठी मारली की बस्स.यानंतर मात्र मग माझा बांध फुटला पण फक्त पर्णवी ला समजू दिलं नाही.त्यानंतर मात्र बराच वेळ एक निःशब्द पण खूप काही व्यक्त होणारी घट्ट अशी मिठी होती.अवघ्या साडे चार वर्षाच्या जिवाला कसली बर काळजी वाटत असावी?किती हे प्रेम.😘

थोडा वेळ आम्ही तसंच बसून राहिलो मग माझं जाणं का गरजेचं आहे.मला माझं काम आवडत अन ते मी मनापासून करतो.अस बरचसं समजावलं तेव्हा कुठे सार नॉर्मल झालं.

आदल्या दिवशी येताना मी शिवरायांची गारद प्रिंट करून घेऊन आलो होतो.मग ती प्रिंट पर्णवीच्या मदतीने बेडरूम मध्ये चिटकवली अन तिला अगदी सहज म्हणालो तुझं हे पाठ झालं की बाबा लगेच येणार.(नंतर मात्र हे बुमरँग झालं...मला वाटत होत हे एवढं पाठ करायला किमान आठ दिवस लागतील तर लेकीने फक्त दोनच दिवसात संपूर्ण गारद पाठ करून दाखवली होती.🤗🤗)

माझा पिक अप रात्री 12 वाजता होता तर नेहमी लवकर झोपणारी पर्णवी मात्र त्यादिवशी मी निघेपर्यंत जागी होती.जाताना मात्र आम्ही फक्त डोळ्यांनीच बोललो.एक शब्द ही न बोलता आम्ही खूप काही बोललो.😊😊😊

आयुष्य खूप सुंदर आहे फक्त पोटी एक लेक हवी.

21 December 2019

गप्पा 😉

Edit Posted by with No comments
जेवताना ,चहा पिताना वा ज्यूस वगैरे पिताना हमखास कपड्याना थोडा थोडा नैवैद्य देणं हा अस्मादिकांचा जन्मसिद्ध हक्क.त्यामुळे वारसाहक्काने हे लेकीकडे पण आलं आहे.

मागच्या आठवड्यात लेकीला शाळेत इडली चटणी मिळाली होती अन सवयीने नॅपकिन वर चटणी सांडलेली होती.शाळेतून आल्यावर डबा काढताना सुजातच्या हे लक्षात आलं.त्यामुळे सुजाता पर्णवी ला विचारलं....

"काय ग...चटणी कशी काय सांडली...जरा नीट खायचं ना"

तर म्हणे...

"अग आऊ....ही वॉटर बॉटल आहे ना...हिच्यामुळे झालं हे....हीच लक्षचं नसत मुळी....मी तिला सांगितलं होत की जरा टिफिन वर लक्ष दे....तो काही सांडवेन तर बघ जरा...त्याला सांग की काही सांडवू नकोस... पण ती आहे ना त्या नॅपकिन सोबत फक्त गप्पा मारत बसते....माझं काही ऐकतच नाही....अन बघ बर आता सांडली ना चटणी ..."🤣🤣🤣

घ्या....काय बोलणार यांच्यापुढे? काही सांगायची सोय नाही....काही सांगायला जावं तर हे अशी हजरजबाबी उत्तर मिळतात.🙈🙊