16 June 2019

बाबापण !!

Edit Posted by with No comments

बाप झाल्या पासून मला आई पणा बद्दल आतून एक सुप्त अशी असूया वाटू लागली आहे.लेकरांसोबत त्यांची आतून एक जन्मजात घट्ट अशी वीण असते.कदाचित ते 9 महिने अन त्या अशक्यप्राय अशा वेदना याचा बोनस असावा.पर्णवी सोबत सुजाता ला जेवढा वेळ घालवता येतो तितकासा मात्र मला शक्य होत नाही ही सल किंवा आपण खूप काही मिस करतोय ही टोचणी अदृश्य रूपाने नेहमीच पाठलाग करत असते.

सुरूवातीच्या काळात सकाळी पर्णवी ला सोडून ऑफिस ला जायचं म्हणजे माझ्यासाठी एक वेदनादायी प्रकार असायचा.जस हळू हळू तिला समज यायला लागली तस मग सकाळी ऑफिस ला निघूनच द्यायची नाही मग गुपचूप फसवून तिला मी ऑफिसला निघून जायचो.आपण कसले वाईट आहोत अस पण वाटून जायचं.मग जराशी मोठी झाल्यावर मात्र मग रोज मी तिला सकाळी माझ्या सोबत पार्किंग ला घेऊन जायचो अन जवळच गाडीवर चक्कर मारून मग मी माझा ऑफिसला जायचो.

पर्णवीची शाळा सुरू होण्याआधी ची ही गोष्ट आहे.नेहमीप्रमाणे मी ऑफिसला जाण्यासाठी तयार होतो पण आज पर्णवी चा मूड काही वेगळाच होता.तू आज नको ना जाऊ ....माझ्या सोबतच थांब...असा हट्ट करून बसली होती.हरेक प्रकारे समजावून झालं पण सगळे प्रयत्न निष्फळ होते.आज मला तूच हवा आहे अस म्हणून घट्ट मिठी मारून बसली होती.त्यादिवशी माझं ऑफिसला काम असल्याने सुट्टी पण घेणं शक्य नव्हतं.घड्याळाचा काटा जसा सरकू लागला तस माझी घालमेल वाढत होती.

तुला ऑफिसला काय जायचं असत...जाऊच नको...मला तू हवाय...अस म्हणल्यावर आज जरा वेगळंच वातावरण आहे हे लक्षात आलं.मग आता समजूत काढण्याची गरज आहे म्हणून तिला जवळ घेतलं अन समजावू लागलो.

"अरे बच्चा.....तुला खेळणी आवडतात की नाही...आपण दुकानात जाऊन घेतो की नाही.."

"हो...मला आवडतात...पण तू मला झायलो फोन नाही आणलास"

"बर...आणू या की...तुला बुक्स आवडतात....आपण हॉटेल ला जातो...डोसा खातो...पावभाजी खातो....हो की नाही..."

"हो..."

"तुला वा वा ड्रेस घेतो...तू केवढा हट्ट करते...बाबा...सगळं आणतो की नाही तुझ्यासाठी..."

"हो..."

" हे सर्व करायला बाबा कडे पैसे कसे येतात...कारण बाबा ऑफिसला जातो मग ऑफिसवाले बाबा ला पैसे देतात...आता तूच सांग जर बाबा ऑफिसला गेला नाही तर तुला गेम,बुक्स,कपडे वगैरे कस आणणार ??"

आता मात्र हे बरोबर लागू पडलं...हे ऐकल्यावर पर्णवी जरा विचारात पडली....आता काय करावं....मला वाटलं आता मला लगेच परवानगी मिळेल.

जरासा विचार केल्यासारख करून मग पर्णवी  म्हणे....
"बाबा...तू थोडासाच जा ऑफिसला...अन लगेच ये....मग थोडे पैसे मिळतील....मला एकच खेळणं घे...आपण बाहेर फक्त डोसाच खाऊ अन कपडे नको मला....पण तू लवकर यायचं....ठीक आहे"

ऐकल्यावर जरास गलबलून आलं पण काही व्यक्त करू शकलो नाही...फक्त एक मिठी मारली अन ठीक आहे म्हणालो...त्या दिवशी ऑफिसला जाताना मात्र रस्ता खूप धूसर होता अन मनात असंख्य विचार...

प्रत्येक बापाला ही कसरत करावीच लागते...भावना अन व्यवहार याचा समतोल साधावाच लागतो...बाप कधीच व्यक्त होत नाही...पण बापाचं आयुष्यभर असच द्वंद्व सुरू असते....एक बाहेर जगण्याच्या लढाईसाठी तर एक आतूनच स्वतः सोबतच...कधीही न संपणार........

15 June 2019

मेकअप !!

Edit Posted by with No comments

शनिवारी दुपारची निवांत वेळ....दुपारचं जेवण करून विकांताच्या पेंडिंग कामाची लिस्ट पाहत....चला आता कोणत काम उरकायचं असा साधा सरळ विचार करत तुम्ही पुढचं सगळं नियोजन ठरवून टाकता....पण त्याच वेळी नियतीच्या मनात काही तरी वेगळंच सुरू असत....भविष्यात काय लिहलं आहे याची तुम्हाला जाणीव ही नसते...अन अशा वेळी तुम्ही सहजच बेडरूम मध्ये डोकावता....त्याच क्षणी तुमचा घात होतो...

"बाबू.....आलास....इकडं ये ना....आता मी तुझा मेकअप करणार आहे....."

अशी आकाशवाणी होते अन अवघा हलकल्लोळ होतो...नियतीने हे काय लिहून ठेवलं आहे...आता मोठ्या बाक्या प्रसंगाला सामोरं जावं लागणार आहे याची तुम्हाला जाणीव होते...क्षीण का होईना पण प्रतिकार करावा म्हणून तुमच्या तोंडातून बोल पडतात...

"बच्चू....अरे मला काम आहे....बाहेर जायचं आहे...लगेच आलो....मी बाहेरून आलो की मग कर...."

"नो....नो....नो...सीट डाऊन...आधी मेक अप मगच तू जायचं...."

आधी लग्न कोंढाणाचे मग रायबाचे...तुम्हाला अगदी असच वाटून जात...

थोडा धाक दाखवून...सुटण्याचा प्रयत्न करून मग सुटावं म्हणून तुम्ही म्हणता....

"अरे बोकू....बॉईज कधी मेक अप करतात का? मेक अप तर फक्त गर्ल्स करतात...बाबूला मेक अप नाही करायचा"

तुम्हाला कामगिरी फत्ते झाली आता सुटतोय अस वाटत असतानाच तुमच्या वर ब्रम्हास्त्र सोडलं जात...

"नाही करू देत  मेक अप बॉईज....पण मला तुझा मेकअप करायचाच आहे...मी तुझा येंगे आहे (येंगे हे मी दिलेल्या नावांपैकी एक आहे 😂😂😂😂)...तू माझं नाही ऐकणार ना...अस करणार ना....मी तर तुझं सर्व ऐकते की नाही....मग मेकअप करायचा म्हणजे करायचा....."

एकंदरीतच वातावरणाचा अंदाज घेऊन तुम्ही शरणागती पत्कराता अन यानंतर मग तुमचा ताबा घेतला जातो....हुकूम सुटले जातात...गरीब बिचाऱ्या याचका प्रमाणे तुम्ही हुकूम ऐकत राहता...

"हं....चल झोप...."

"पाय सरळ कर...हात पोटावर घे....."

"फेस किती खराब झाला आहे...वॉश करता की नाही...."

मग पुढील दहा पंधरा मिनीट मेकअप किट मधील जे काही आहे ते तोंडावर लावलं जात.

"हं....झालं आता....उठून बस"

तुम्हाला वाटत चला झालं सुटलो बुवा....म्हणून तुम्ही म्हणता...

"झालं ना...मेकअप संपला....आता जाऊ मी...."

"नाही रे बाबू अजून....मेकअप काय असा पटकन होतो...थांब अजून बेल्ट अन क्लिप लावायची आहे...."

"अरे पण बच्चा...मला तर केस च नाहीयेत...टकलू आहे...कसा क्लिप लावणार...राहू दे "

छ्या....पण तुमचं म्हणणं मान्य कस होईल...काही ना काही कुरघोडी करणार च...

"अरे आपण दाढी ची पोनी बांधू अन त्याला क्लिप लावू..."

"हं...हे बघ झालं.....आता लिपस्टिक लावायची बर का..."

"नो बच्चा...अग लिपस्टिक काय...नको ना...आता हे बस्स झाल...."

"नो...लावायची....तोंड बंद कर...कर बंद चल...."

"अरे ओठ हे अशे कर...हे अस करतात...लिपस्टिक लावलं की..." (हे अगदी अभिनय करून दाखवलं गेलं होत )

"अन आता....लास्ट....लिपस्टिक लावायची टकलू ला....."अस एकदम मोठं हसून सांगितलं जात

बाबा बिचारा काय करणार....एवढं सगळं सजवून मग लेक एवढी खुश झाली की बस्स....त्या अवतारात पण लेकी ची प्रतिक्रिया होती.... "बाबू तू खूप छान दिसतो आहेस..." सोबत एक गालावर पापी सुद्धा...😍😍😍

[ शास्त्रात सांगितल्या प्रमाणे मग पाऊट करून सेल्फी सुद्धा होतात...]

संपूर्ण मेकअप ती एवढया तल्लीनतेने करत होती की जस काय तिला हे खूप महत्त्वाच task दिलंय.अन सार झाल्यानंतर चेहऱ्यावर असणारा आनंद अन हास्य हे निव्वळ priceless होता.

#लेकीसाठी_करायला_लागतं 😉

14 June 2019

भूक

Edit Posted by with No comments

"बाबू....मला भूक लागली आहे...काही तरी खायला दे...."

"बरं....काय देऊ??...पोळी भाजी देऊ का "

"नको....."

"मग...डाळू भातु खाणार का...."

"नको..."

"भेळ खाणार का..."

"नको...."

"केळी...."

"नको..."

"खजूर...."

"नको..."

"भेळ....चिवडा....बिस्कीट....कलिंगड.... " अस एक ना अनेक बरेच option देऊन झाले पण प्रत्येकाला नकारघंटा...

शेवटी वैतागून विचारलं...."बच्चा....तुला नक्की भूक लागली आहे ना?"

"हो रे बाबू...भूक लागली आहे..पण मला वेगळं हवंय खायला"

"वेगळं?? मग मलाच खाते का आता....😂😂😂"

"तू नको...मला वेगळं खायचं आहे....😂😂😂"

अरे बच्चा मग सांग काय हवंय....देतो मी...

यावर मग एका हाताची घडी ,एक हात गालावर अब तोंडाचा चंबू करत...विचाराधीन...पर्णवी माता म्हणे...."बाबू....मला किनई आता वॉटर मेलन ज्यूस ची भूक लागली आहे..." 🤦🤦🤦

तर हल्ली अस सुरू झालंय..... आम्हाला आता वेगवेगळ्या प्रकारची भूक लागते म्हणजे.... पावभाजी ची भूक...डोसा ची भूक....आईस्क्रीम ची भूक....वगैरे वगैरे....