07 August 2022

परतावा !!

Edit Posted by with No comments

 आपण सांगितलेली एखादी शिकवण कधी अन कोणत्या वेळी आपल्यावरच परतवली जाईल याचा काही नेम नसतो. याचा आता खूप चांगला अनुभव गाठीशी आलाय. असंच काहीसं आज झालं. आज दुपारी माझं अक्षरधारा ला जायचं ठरलं होतं . मी अन सुजाता याबद्दल बोलत होतो, मी एकटाच कुठे तरी जातोय अशी कुणकुण लागताच लगेच छोटं हायकमांड ने लगेच प्रश्नावली सुरु केली.. 

" बाबा...कुठे जातो आहेस रे ?"

" मी गावात जातोय ..." [मला जेव्हा सिटी मध्ये म्हणजेच टिळक रोड, लक्ष्मी रोड, असं मध्यवर्ती भागात जायचं असेल तर गावात जातो असं बोलायची सवय आहे ]

" गावात ?? मग मी पण येऊ  का रे ? मी गावात कधीच गेली नाही  रे ..."

" अग गावात म्हणजे तूझ्या शाळेजवळच  जातोय .... "

" बरं ... पण तरी येऊ का रे बाबा ..."

अशा वेळी मग  मी संधी कशी सोडणार... म्हणाल एका अटीवर ... " माझी स्तुती कर... म्हणजे माझ्यावर छान छान १० वाक्य बोल अन आई पेक्षा सर्वात जास्त मीच आवडतो हे कबुल कर लगेच घेऊन जातो ...."

आता  झाली का पंचाईत आई ची पार्टी तर सोडायची नाही पण बाबा बरोबर जायच तर आहे मग काय करावं  बरं ?? असं हो नाही वगैरे सुरु होत मग ब्रम्हास्त्र म्हणजे रडायला सुरु केलं ....त्यामुळे शिस्तीत माघार घेतली अन मग मी व पर्णवी दोघे अक्षरधारा ला गेलो. आमची पुस्तकं घेऊन झाली अन बाहेर आलो तर तिथे शेजारी असलेल्या भेळी च्या गाड्यावरून असला भारी वास येत होता की बस्स... लगेचच छोटा पॅकेट म्हणे... 

" बाबी .... पाणी पुरीचा कसला रे भारी वास येतोय ..."

" हो ना ... झकास वास आहे ... इथे मस्तच पाणी पुरी मिळते .."

मग जरा सूचक मौन .... अन त्यांनतर मग मीच जरा फिरकी घ्यावी म्हणून विचारलं... 

" चिकू .... का ग ..तुला खायची आहे का पाणी पुरी ?"

लगेचच चेहऱ्यावर अगदी साळसूद भाव आणत ... " माझं काही नाहीये ... तुलाच खायची असेल तर बघ... माझं काही नाही हा..."

" असं होय ...बरं  मग नको खायला मला तर काही भूक नाहीये..  तुला खायची असती तर खाल्ली असती पण  आता असू देत..."

आता मात्र पर्णवी चा चेहरा पाहण्यासारखा झाला होता... खायचं तर होत पण नेहमीप्रमाणे माझ्यावर ढकलून रिकामी झाली होती ...म्हणजे दोघांनीच खाल्लं असं आई ने विचारलं तर मी नाही म्हणाले होते पण बाबा ने च खाऊ घातलं असं सांगून बिल बाबा वर फाडायचं अन आपण नाम निराळं राहायचं हे नेहमीच आहे. 

जरा वेळ शांततेत गेला ...अन मग अचानक म्हणे ... 

" बाबा...आपल्या दोघांत लहान कोण आहे ?"

" मी .... तू तर  नेहमीच म्हणते ना की मोठी आहेस ..."

" ते गंमत रे ...खरं सांग ना ..."

" बरं ...मी मोठा आहे ... अन तू लहान आहेस "

"हो ना ....  अन तू म्हणतो की नाही ... लहानांनी मोठयांच सगळं ऐकायचं ... तर मग ठरलं तर ..आत्तापासून मी तुझं सारं काही ऐकणार ...तू म्हणशील तसं ... म्हणजे आता जर तू म्हणालास की पाणीपुरी खाऊ या तर खाईन मी किंवा अजून काही तुला खावंसं वाटलं तर खाऊ या आपण ... मी ऐकणार तुझं ..."😎😄

थोडक्यात काय तर ...काही पण होऊ देत ...बाबा ला कसं गुंडाळायचं हे लेकीला अगदी परफ़ेक्ट जमलं आहे  ते पण त्याचेच उपदेश त्याला ऐकवून !!

" असं होय ... मला तर डोसा खावा वाटतो आहे.. चालेल का..."

थोड्डसं जरा विचार करते आहे असं दाखवत ...😇

" किती वाजलेत रे आत्ता ...खुशबू चालू नसेल झालं ना ...जाऊ देत मग आपण नागब्रम्ह लाच जाऊ या ... मला डोसा चालेल पण अप्पे खाऊ या का रे ... "😅😅

असं म्हणत आम्ही नागाब्रम्ह ला निघालो... आन अर्थातच सर्व खाऊन वगैरे झाल्यावर .... बाबा... मी तुझी गंमत केली होती रे ... तू लहानच आहेस अजून अन मीच मोठी आहे हे सांगायला विसरली नाही !!😂😂