08 April 2023

परीक्षेचा ताप !!

Edit Posted by with No comments
पुढच्या वर्षी पर्णवी तिसरी मध्ये जाईल.सध्या दुसरीची तोंडी परीक्षा झाल्यात अन लेखी परीक्षा सुरू आहे.सराव साठी शाळेतून सराव प्रश्न दिले आहेत त्यामुळे सुजाता अन पर्णवी अस दोघांचं धुमशान सुरु आहे.

त्यातच आता शाळेतून तिसऱ्या इयत्तेसाठी अर्ज भरून घेणं वगैरे सुरू झालं आहे.दोन दिवसांपूर्वी पर्णवी आत्याकडे अभ्यासासाठी गेली होती. तेव्हा सहजच ताई तिला म्हणाली
"पर्णवी...आता तिसरी पासून प्रश्नपत्रिका अन उत्तरपत्रिका अस वेगवेगळ्या मिळणार.आता सारखं एकंच नसणार बरं..."

ताई च बोलणं पूर्ण होतंय तोवर लगेचचं पर्णवी म्हणे...
"अरे कशाला असं करत आहेत...मग माझं काही खरं नाही बघ ,आत्तु...माझा पेपर होऊन मी घरी येते नाही तोच लगेच तुम्ही सगळे सुरू कराल ...हं... सांग बरं याचं उत्तर काय...हे काय लिहलं....हे चुकलं ...हे बरोबर... कशाला हवंय हे..."

"हो काय...मग आता..."इति ताई

"मला काय वाटतं माहित्ये का आत्तु...मी तर आता मग दुसरी मध्ये च राहते...तिसरीला जायलाच नको....किंवा मग काय करायला हवं माहित्ये का...उत्तरपत्रिका घ्यायलाच नको....वैतागच आहे नाही का "🤣🤣🤣🤣🤣

खर तर पालकत्व निभावून नेणं फार कठीण आहे. तसं पाहिलं तर ही फार लहान गोष्ट आहे पण मुलांच्या संगोपनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. परीक्षेवरून आल्यावर त्याबाबत विचारणं हे पिढ्यानपिढ्या चालतं आलेलं आहे नकळतपणे ते प्रत्येक पालक हेच करतो.पण जेव्हा आपण मुलांच्या मानसिकेतून पाहिलं तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे.पालक म्हणून विचार करायला हवाय.


07 April 2023

भाव तिथे देव !!

Edit Posted by with No comments
आंबाप्रेम पर्णवी ला उपजत च लाभलं आहे.आंब्याचा मौसम सुरू झाला की आम्हाला सर्वात आधी प्रतीक्षा असते ती म्हणजे देवगड हापूस ची.यावेळी आंबा आणायला तसा आम्हाला उशीरच झाला.आंबा आणला की सर्वात अगोदर तो स्वामींना अन मग आम्हाला असा नेहमीचा शिरस्ता आहे.

आज सकाळी आंबा खायचा म्हणून रात्रीच आंबा काढून ठेवला होता. सकाळी पर्णवी झोपेतून उठल्यावर पहिला प्रश्न होता बाबा आंबा कुठाय? मला आता लगेच खायचाय.

मी म्हणलं , "अरे पर्ना....किमान ब्रश तरी कर...आंघोळ हवी तर नंतर कर..."

ठीक आहे म्हणाली...तिचा ब्रश वगैरे होई पर्यंत मी आंबा कापून ठेवला.अन स्वामींना नेवैद्य दाखवायची तयारी करत होतो तोच पर्णवी आली अन म्हणे..

"बाबा, स्वामी आजोबांना मीच आंबा देणार आहे."

तिची आंघोळ वगैरे काहीही झालेलं नव्हतं त्यामुळे मी तिला म्हणालो, " अरे पिलू, तू आंघोळ नाही केलेली नाहीयेस असं बिना आंघोळीचं नको स्वामी आजोबांना आंबा नको देवुस.."

"बाबा...अरे भाव महत्वाचा...."इति पर्णवी

अस म्हणाल्यावर मग मी जरा बोलावं म्हणून समजलं नाही काही अस काहीसं चेहरा करत तिला प्रतिप्रश्न केला ..

"म्हणजे ग काय....काय म्हणते आहेस?..."

तर म्हणे..." अरे बाबा, स्वामी आजोबांना आंबा देताना माझा भाव महत्वाचा आहे. माझ्या मनात चांगलं नसेल अन मी आंघोळ केली असेल आणि मग स्वामी आजोबांना आंबा दिला तर ते घेणार नाही. पण जर आंघोळ केलेली नसेल अन माझा भाव चांगला असेल तर स्वामी आजोबा लगेचंच आंबा घेणार. स्वामी आजोबा भाव बघतात रे फक्त."

अस म्हणून आंब्याची डिश घेऊन स्वामींना प्रसाद दाखवायला सुरुवात केली.

मी मात्र क्षणभर फक्त स्तब्ध होऊन बघत तिच्या कडे बघत होतो. 

"काय रे बाबा, काय बघतो आहेस...असाचं दाखवायचा ना..." अस म्हणाल्यावर माझी तंद्री भंग पावली.

भाव तिथे देव या बोलांची आठवण येऊन गेली.अवघ्या आठव्या वर्षात आलेली ही समज म्हणजे स्वामींची कृपा आहे 🤗🙏