23 April 2021

जिंदगी गुलजार है

Edit Posted by with No comments
बरेच दिवस झाले डायरी मध्ये आठवणीचा खजाना भरून ओसंडतो आहे पण लिहायला काही मुहूर्त लागत नाहीये.मागे एका पोस्ट मध्ये लिहलं आहे त्याप्रमाणे करोना मध्ये माझ्यासाठी सर्वात चांगली झालेली गोष्ट म्हणजे पर्णवी सोबत मिळालेला वेळ... जरी ऑफिसची भरपूर काम असली तरी ती सततची लुडबुड किंवा एखाद्या मिटिंग वेळी मध्येच येऊन डिस्टर्ब करणं किंवा हळूच चिमटा काढणं आ काही ना काही सुरूच असतं. डायरी ची पान सर सर पुढे जात आहेत,पिल्लू मोठं व्हायला लागलं आहे. जीवन नजरेसमोर भरभर पुढे जातंय मात्र आयुष्य जगायला कमी पडतोय अस कधी तरी वाटून जातं.खूप साऱ्या आठवणी लिहायच्या आहेत त्यासाठी वेळेचं गणित जमवाव लागेल.बघू या कस जमतंय.

बरीच जुनी गोष्ट आहे म्हणजे करोना सुरू होण्यापूर्वी ची...ऑफिस वरून घरी आल्यावर पाहिले 10-15मिनिटं चिकू सोबत मस्ती व्हायलाच हवी असा काहीसा अलिखित नियमच झाला होता.मग किती पण उशीर होवो डोळे ताणून पिल्लू वाट बघायचं.कधी कधी तर जास्त उशीर झाला तर वाट बघून झोपून पण जायची.

त्यादिवशी अचानकच ऑफिस मध्ये असताना कणकण जाणवायला लागली अन विशेषतः पाय प्रचंड दुखायला लागले.त्यामुळे ऑफिस मधून लवकरच म्हणजे वेळेवर निघालो 😀😀. घरी आलो तर चिकू समोरच, त्यामुळे थोडं वरवर गंमत करून तिच्या नकळत मी बेडरूममध्ये जाऊन बसलो.तोवर पाणी गरम व्हायला लावलं होत,म्हणलं जरा शेक घ्यावं म्हणजे मग बर वाटेल.गरम पाणी टब मध्ये घेऊन मी डोळे बंद करून शेक घेत होतो.अन हे करताना चिकू केव्हा बेडरूममध्ये आली हे मला समजलं पण नाही.जरा शेक घेऊन पाय मी टब बाहेर ठेवले होते तोच त्यावर कोणी तरी हलकी फुंकर घातली.कोण आहे बघायला डोळे उघडले तर लगेच ओरडा ऐकू आला....

" तू पण ना बाबा....तुला काहीच समजत नाही....भाजला ना पाय...कशाला गरम पाण्यात बुडवला.... आता असाच बस्स....मी फुंकर घालते म्हणजे मग तुला जर बर वाटेल....काय समजलं ना...."

अस म्हणून इटूकल्या ओठाचा चंबु करून फुंकर घालायला सुरुवात झाली.एक दोन मिनिटं झाले असतील मी आपला निःशब्द होऊन तो क्षण शक्य तेवढा जगून घेत होतो. लेकिचं ते निरागस बोलणं,ते हक्काने रागावणे, तो मोठेपणाचा हवा सारं काही हवं हवंस.

जिंदगी गुलजार है... बस पोटी एक लेक हवी...🤗

0 Comments:

Post a Comment