11 May 2020

रिक्षावाले काका!

Edit Posted by with No comments
मार्च पासून करोना मुळे पर्णवीच ग्राउंड अन स्कुल दोन्ही बंद आहे.आता जवळ जवळ दोन महिने झालेत घरातच आहे.पण हाय बदल सुद्धा इतका सहज पण स्वीकारला आहे की बस्स...कधी कधी खूप आश्चर्य वाटत की अवघ्या पाच वर्षात किती पटकन परिस्थिती सोबत जुळवून घेतात.आजची ही पिढी प्रचंड flexible अन बदल अगदी सहज स्वीकारणारी आहे.

पर्णवीची अन तिला ग्राउंड ला सोडणाऱ्या रिक्षावाले काका यांची प्रचंड गट्टी आहे.त्यांच्या सोबत खूप दंगा सुरू असतो.अन काका पण अगदी लहान होऊन त्यांच्या सोबत मस्ती करतात त्यामुळे मुलांना पण अजून मजा येते.

आज खूप दिवसांनंतर काकांचा सहजच पर्णवी ची चौकशी करण्यासाठी फोन आला होता.फोन वर गप्पा मारता मारता आंबे प्रकरणावर चर्चा झाली.मग आम्ही आंबे आणले अन आता संपले सुद्धा वगैरे वगैरे साग्रसंगीत वर्णन झालं.

तिचं बोलून झाल्यावर मी काकांसोबत बोलत होतो तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला आंबे हवे असतील तर सांगा मी यंदा आंबे विक्रीसाठी आणले आहेत.बाकी थोडी विचारपूस अन गप्पा झाल्या वर फोन ठेवून मी आपला माझ जेवण राहील होत म्हणून जेवायला गेलो.

जरा वेळात पर्णवी माझ्याकडे आली अन म्हणे...

"बाबू...ऐक ना...तू माझी एक गोष्ट ऐकशील का?"

"हो...ऐकणार ना पिल्लू... मी तुझं ऐकतो की नाही सगळं.."

तर अगदी विचारमग्न अन मोठं काही तरी सांगतोय असा भाव आणत म्हणे "आपण काकांकडून आंबे घेऊ या का रे?"

"का ग...काय झालं...तू म्हणत असशील तर घेऊ या की..."

"अरे बाबू....आता लॉकडाऊन आहे ना...मग काकांची रिक्षा पण बंद असेल ना...मग आपण त्यांच्या कडून आंबे घेतले तर त्यांना पैसे मिळतील ना रे...घेशील ना रे प्लिज.."

मी हो म्हणल्यावर इतकी खुश झाली की विचारायला नको....मस्त मिठी मारली अन आनंदात घरात बागडू लागली.

अन मी स्तब्ध होऊन अंतर्मुख होऊन फक्त तिला बघत होतो🤗😊

आजच्या पिढीला कुठून इतकी समज आली असेल? किती लहान लहान गोष्टींचा विचार करतात.

0 Comments:

Post a Comment