21 January 2019

डबा

Edit Posted by with No comments

शुक्रवारी लेकीला शाळेत स्नॅक्स मिळतात त्यामुळे रिकामा डबा द्यावा लागतो.काल दुपारी शाळेतून आल्यावर नेहमीप्रमाणे लेकीचा कॉल झाला.काल शाळेत गोड पुरी मिळाली होती त्यामुळे स्वारी एकदम खुषीत होती.शाळेतील बाकी सर्व update अन बडबड झाली. आता आऊ सोबत मावशीला भेटायला जातोय त्यानंतर मग आत्तू कडे राहयला जाणार .त्यामुळे उद्या मला घ्यायला ये असा धमकीवजा आदेश मिळाला अन मग फोन बंद केला.मला वाटलं होतं हे प्रकरण इथं च संपलं पण अस काही नव्हतं. पिक्चर तो अभी बाकी था।

संध्याकाळी ऑफिस वरून घरी आलो तेव्हा नेहमी सारख स्वागत काही झालं नाही...पर्णवी नसल्याने घर एकदम शांत झालं होतं...खूपदा हवी हवीशी वाटणारी शांतता आज खूप त्रासदायक होती..आई पर्णवी च्या दिवस भरातील उचापती सांगत होती (अगदी तुझ्या सारखी च आहे,तू जश्या बारीक खोड्या करायचा अगदी तश्याच खोड्या काढते...हा डायलॉग पण ऐकवून झाला 😂😂😂) अन त्यानंतर मग आमचं रात्रीच जेवण सुरू झालं. अर्ध जेवण झालं अन मग आई ने सांगितलं अरे, पर्णवी ने तुझ्यासाठी डबा ठेवलाय तो घे अन बघ काय आहे ते. तसाच उठून गेलो अन डबा घेऊन आलो. डबा उघडून पाहिला तर त्यात एक पुरी तशीच तिने माझ्यासाठी ठेवली होती. अन जाताना आईला सांगितलं होतं..."आजी, बाबा आला की त्याला ही पुरी दे.अन ही पुरी फक्त बाबा साठी आहे तुम्ही कोणी खायची नाही असं आजी अन आजोबा दोघांना बजावून गेली होती."

ती गोड पुरी खाल्ली अन पोट अन मन दोन्ही कस एकदम फुल्ल झालं होत.शाळेत मिळालेल्या खाऊ मधील अर्धा खाऊ माझ्यासाठी ठेवणारी पर्णू काही केल्या डोळ्यासमोरून जात नव्हती.तिच्या विचारात केव्हा झोप लागली ते समजलं च नाही.

अस म्हणतात लेकीचा सर्वात जास्त जीव बापावर असतो ते काही चुकीचं नाही.

0 Comments:

Post a Comment