30 March 2019

धडा!!

Edit Posted by with No comments
रोज ऑफिसवरून घरी येताच क्षणी पर्णवी चा अन माझा किमान किमान 10-15 मिनीट नॉन स्टॉप दंगा असतो.मी आल्याची चाहूल तिला एकदम परफेक्ट लागते.गेटचा आवाज झाला की दरवाजा मागे लपायच मग मी गुपचूप दरवाजा उघडायचा अन मग तिला शोधायचं नाटक करायचं. शोधलं की मग थोडासा डान्स...थोडी लुटपुटीची कुस्ती...मग शाळेतील,ग्राउंड वरच्या गोष्टी...अभ्यास काय केला...अन आवर्जून मी अगदी कुणालाच त्रास दिला नाही...एकदम शहाणी वागले हे सांगणं...हा असा आमचा रोजचा नित्यनेमाचा कार्यक्रम असतो.
बुधवारी ऑफीस वरून आलो तेव्हा पर्णवी drawing करण्यात एकदम गुंग होती त्यामुळे मी तिला उगाच डिस्टर्ब नको म्हणून किचन मध्ये गेलो.[म्हणलं drawing चाललं आहे तर चालू दे आपण उगाच तिच्या मध्ये कशाला जायचं असा फक्त विचार होता.] अन सुजाता सोबत बोलत होतो तोच बाबू...म्हणून पर्णवी ने पायाला मिठी मारली अन त्यानंतर उचलून घे अस खुणावल....उचलून घेतल्यावर अगदी अनपेक्षित असा प्रश्न आला....
दोन्ही इटूकल्या हातात माझा चेहरा पकडला अन म्हणे...
"बाबू....काय झालं रे आज?"
मी म्हणलं..."कुठे काय....काहीच नाही...."
"नाही...काही तरी झालंय....आजच तर आल्यावर तू माझ्याशी बोललाच नाही..." अस म्हणून हातांचा गळ्याभोवती वेढा पडला अन खांद्यावर डोकं आलं...
मग अलवार हाताने थापटत तसाच बेडरूममध्ये गेलो अन मग समजावलं अस काहीच नाही बच्चा......अन त्यानंतर त्या लहानशा मिठीत बाप लेकीचा निःशब्द असा एक संवाद सुरू झाला....
जरावेळ असाच मिठीत गेला मग जेव्हा तिची खात्री पटली की सगळं नॉर्मलच आहे तेव्हा कुठे गाडी ट्रॅक वर आली ...
आपल्याला उगाचच वाटत की लहान पिल्लांना काही कळत नाही.मला तर वाटत उलट त्यांनाच जास्त कळत कारण ते फक्त वर्तमान जगत असतात अगदी स्वच्छंदीपणे.....गोष्ट अगदी तशी लहानशीच होती पण माझ्यातील बापासाठी मात्र हा एक धडा होता...आयुष्यभरासाठी 

0 Comments:

Post a Comment