16 June 2019

बाबापण !!

Edit Posted by with No comments

बाप झाल्या पासून मला आई पणा बद्दल आतून एक सुप्त अशी असूया वाटू लागली आहे.लेकरांसोबत त्यांची आतून एक जन्मजात घट्ट अशी वीण असते.कदाचित ते 9 महिने अन त्या अशक्यप्राय अशा वेदना याचा बोनस असावा.पर्णवी सोबत सुजाता ला जेवढा वेळ घालवता येतो तितकासा मात्र मला शक्य होत नाही ही सल किंवा आपण खूप काही मिस करतोय ही टोचणी अदृश्य रूपाने नेहमीच पाठलाग करत असते.

सुरूवातीच्या काळात सकाळी पर्णवी ला सोडून ऑफिस ला जायचं म्हणजे माझ्यासाठी एक वेदनादायी प्रकार असायचा.जस हळू हळू तिला समज यायला लागली तस मग सकाळी ऑफिस ला निघूनच द्यायची नाही मग गुपचूप फसवून तिला मी ऑफिसला निघून जायचो.आपण कसले वाईट आहोत अस पण वाटून जायचं.मग जराशी मोठी झाल्यावर मात्र मग रोज मी तिला सकाळी माझ्या सोबत पार्किंग ला घेऊन जायचो अन जवळच गाडीवर चक्कर मारून मग मी माझा ऑफिसला जायचो.

पर्णवीची शाळा सुरू होण्याआधी ची ही गोष्ट आहे.नेहमीप्रमाणे मी ऑफिसला जाण्यासाठी तयार होतो पण आज पर्णवी चा मूड काही वेगळाच होता.तू आज नको ना जाऊ ....माझ्या सोबतच थांब...असा हट्ट करून बसली होती.हरेक प्रकारे समजावून झालं पण सगळे प्रयत्न निष्फळ होते.आज मला तूच हवा आहे अस म्हणून घट्ट मिठी मारून बसली होती.त्यादिवशी माझं ऑफिसला काम असल्याने सुट्टी पण घेणं शक्य नव्हतं.घड्याळाचा काटा जसा सरकू लागला तस माझी घालमेल वाढत होती.

तुला ऑफिसला काय जायचं असत...जाऊच नको...मला तू हवाय...अस म्हणल्यावर आज जरा वेगळंच वातावरण आहे हे लक्षात आलं.मग आता समजूत काढण्याची गरज आहे म्हणून तिला जवळ घेतलं अन समजावू लागलो.

"अरे बच्चा.....तुला खेळणी आवडतात की नाही...आपण दुकानात जाऊन घेतो की नाही.."

"हो...मला आवडतात...पण तू मला झायलो फोन नाही आणलास"

"बर...आणू या की...तुला बुक्स आवडतात....आपण हॉटेल ला जातो...डोसा खातो...पावभाजी खातो....हो की नाही..."

"हो..."

"तुला वा वा ड्रेस घेतो...तू केवढा हट्ट करते...बाबा...सगळं आणतो की नाही तुझ्यासाठी..."

"हो..."

" हे सर्व करायला बाबा कडे पैसे कसे येतात...कारण बाबा ऑफिसला जातो मग ऑफिसवाले बाबा ला पैसे देतात...आता तूच सांग जर बाबा ऑफिसला गेला नाही तर तुला गेम,बुक्स,कपडे वगैरे कस आणणार ??"

आता मात्र हे बरोबर लागू पडलं...हे ऐकल्यावर पर्णवी जरा विचारात पडली....आता काय करावं....मला वाटलं आता मला लगेच परवानगी मिळेल.

जरासा विचार केल्यासारख करून मग पर्णवी  म्हणे....
"बाबा...तू थोडासाच जा ऑफिसला...अन लगेच ये....मग थोडे पैसे मिळतील....मला एकच खेळणं घे...आपण बाहेर फक्त डोसाच खाऊ अन कपडे नको मला....पण तू लवकर यायचं....ठीक आहे"

ऐकल्यावर जरास गलबलून आलं पण काही व्यक्त करू शकलो नाही...फक्त एक मिठी मारली अन ठीक आहे म्हणालो...त्या दिवशी ऑफिसला जाताना मात्र रस्ता खूप धूसर होता अन मनात असंख्य विचार...

प्रत्येक बापाला ही कसरत करावीच लागते...भावना अन व्यवहार याचा समतोल साधावाच लागतो...बाप कधीच व्यक्त होत नाही...पण बापाचं आयुष्यभर असच द्वंद्व सुरू असते....एक बाहेर जगण्याच्या लढाईसाठी तर एक आतूनच स्वतः सोबतच...कधीही न संपणार........

0 Comments:

Post a Comment