25 November 2019

हिरकणी 😀

Edit Posted by with No comments
गोष्ट पुराणातील पुढील अध्याय....

रात्री किंवा दुपारी झोपताना आम्हाला गोष्ट ही लागतेच.आजोबा असतील तर मग त्यांच्या अच्चू बच्चू,लाकूडतोड्या वगैरे टिपिकल जुन्या गोष्टी,मी असेल तर मग ट्रेक च्या गोष्टी,किंवा मग आमची कस्टम मेड बेडुकराव,बंटी बिबट्या अशा गोष्टी असतात.(एकदा काही तरी वेगळी गोष्ट...वेगळी गोष्ट ...अस म्हणतं प्रत्येक गोष्टी ला ना चा पाढा...कंटाळून गेलो...अन मग चक्क माझ्या एका एअरपोर्ट प्रोजेक्टच्या डिजाईनचीच गोष्ट सांगितली होती 🙈🙊).थोडक्यात काय तर माणसानुरूप गोष्ट असते.

एके दिवशी रात्री झोपताना रायगड ची गोष्ट सांगत होतो.मला तर जाम झोप येत होती अन आमचं वादळ मात्र अगदी टळटळीत जागं होतं.मी आपलं झोपेच्या आशेने गोष्ट पूर्ण केली.पण लेकरू काही झोपेना.आता रायगडा ची वेगळी गोष्ट सांग असा आदेश आला.म्हणून मग तिला झोपेतच हिरकणी ची गोष्ट सांगायला घेतली,अन इथेच बाबा चा घात झाला.झोपेत मी तिला चुकीची गोष्ट सांगितली,म्हणजे हिरकणी कडा उतरून जाण्याऐवजी कडा चढून वर गेली.दूध विकायला गडावर येण्याऐवजी गडाखाली गेली....सगळं कस उलट. झोपेच्या आशेने गोष्ट संपवली अन सुटलो.पण मग एक दोन दिवसांत परत गोष्ट सांगत होतो तेव्हा सुजाता ने चूक लक्षात आणून दिली.मग ट्यूब पेटली की आपण चुकीची गोष्ट सांगत होतो.मग परत व्यवस्थित गोष्ट सांगितली अन सॉरी बच्चा ते चुकून आधी वेगळं सांगितले अस म्हणून बापुडा तोकडा असा बचावाचा प्रयत्न केला.

पण प्रकरण तिथे संपलं नव्हतं त्यानंतर बाबु तू मला एकदा उलटी गोष्ट सांगितली होती ना...हो की नाही..अस वेळोवेळी डिवचल गेलं.पण काय करणार...घेतलं गप गुमान ऐकून.

आता हिरकणी पिक्चर आला तेव्हा केव्हाच ठरलं होत आपल्याला हा पिक्चर पाहायचा आहे.पण मला अचानक काम आलं त्यामुळे पर्णवी ला ताई सोबत पिक्चरला पाठवलं.पिक्चर पाहून आल्यावर एक दोन दिवस गडबडीत गेले त्यामुळे आमचं त्यावर जास्त काहीच बोलणं झालं नाही.

पर्णवीच नाईट आउट होत त्यादिवशी मग तिला संध्याकाळी ग्राउंड वरून लवकर आणावं लागणार होत म्हणून मी घ्यायला गेलो होतो.येताना गाडीवर आमच्या खास अशा गप्पा सुरू नव्हत्या.तिला शाळेत सोडायच म्हणून मी गडबडीत होतो.तर अचानक आदेश आला....

"बाबू....ऐक ना...गाडी बाजूला घे पटकन...."

"का ग ...काय झालं..."

"घे ना रे बाबू पटकन..."

मला वाटलं हिला काही तरी त्रास होतोय म्हणून पटकन ट्रॅफिक असूनही गाडी बाजूला उभी केली.

अन म्हणलं..." हं...बोल...काय झालं...का थांबायला लावलंस"

तर म्हणे..."काही नाही...तुला हिरकणी ची गोष्ट सांगायची आहे"

"अग...पर्णवी...आपल्याला उशीर होतो...आता रात्री किंवा उद्या निवांत सांग...आता नको..."

"नाही...आत्ताच...ऐक ना रे बाबू...अस करणार ना तू मला"

झालं घेतली विकेट...मी अजून काही बोलेपर्यंत गोष्ट सुरू पण झाली.नशीब माझं की अगदी पटकन संपवली...पण...लगेचच डायलॉग आला..

" बाबू ...तुला माहितये का...हिरकणी कडा चढून नाही रे उतरून तिच्या बाळाला भेटायला आली होती...समजलं का"

भर रहदारीच्या रस्त्यावर बाजूला उभे राहून गोष्ट ऐकणारे बाप लेक ...अस कधी असतंय व्हय...अन ते पण का तर बाबाचं चुकलं होत याची आठवण करून द्यायला 😂😂🤣🤣🤣

पण..मी काय म्हणतो...चुकतो माणूस...झाली जरा गडबड..तर अस करायचं का बाबाला 😛😉🤣🤣


0 Comments:

Post a Comment