22 June 2021

गप्पाष्टक 03

Edit Posted by with No comments

 

करोना मुळे मागील वर्षी पर्णवीची शाळा म्हणजे एकदम धम्माल झाली.ऑनलाइन शाळा म्हणजे फक्त रेकॉर्ड केलेले व्हिडिओ यायचे अन ते आपण आपल्या सोयीनुसार बघायचे व त्यानंतर होमवर्क करायचा. होमवर्क झाला की तो व्हाट्सएपच्या  ग्रुपवर टीचर ना पाठवून द्यायचा.अस सारं होत.एकंदरीत सगळे मूड स्विंग बघता शाळा पर्णवी ची पण परीक्षा मात्र सुजाताची असायची.आता उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली तेव्हा लिहण्याचा विसर पडू नये म्हणून टीचर रोज एक लहानशी स्टोरी पाठवून द्यायच्या अन आपण सराव म्हणून ती लिहायची असं होतं. सुट्टी मध्ये पण अभ्यास करायचा का, मग जरा वेळाने लिहिते, मला भूक लागली, मला energy घेऊ दे जरा, मला एक बदाम अन एक पिस्ता खाल्ला की मगच energy येते, लिहताना चा आम्ही एकदम कोणत्या तरी तिसऱ्या जगात जायचो मग वेगळंच काही आठवणार वगैरे वगैरे अस सगळं करत चार ओळी लिहणे म्हणजे हा किमान 2 ते 3 तासांचा कार्यक्रम व्हायचा.

एक दिवस मग सुजाता ने कंटाळून जाहीर केलं, तू आज लिहिण्याचा सराव केला नाही त्यामुळे आता मी टीचर सोबत बोलले आहे अन त्यांना सांगून दिल आहे की ,"आमच्या पर्णवी ला लिहण्याचा कंटाळा येतोय त्यामुळे ती काही सराव करणार नाही, अन आज पण तिने काही लिहिलेलं नाहीये." अन यावर टीचर ने सांगितलं आहे की...."ठीक आहे, पर्णवी लिहीत नाही ना मग आम्ही तिला आता ग्रुप मधून काढून टाकतो.पहिली ची शाळा सुरू झाली की मग बघू."

हे ऐकल्यावर मग सुरुवातीला पर्णवी ला गंमत वाटली, तिला वाटलं आई मजा करते आहे.पण नंतर मग आई च्या म्हणण्याला बाबा पण हो म्हणतो आहे म्हणजे नक्की असंच झालं असणार.मग मात्र स्वारी काहीशी खट्टू झाली पण तस काही दाखवलं नाही.

संध्याकाळी मग आत्या कडे गेल्यावर मात्र सार पुराण सुरू झालं...आत्या ला म्हणे....

"आत्तु, तुला माहीत आहे का आज काय झालं...."

"नाही....का ग ...काय झालं..."

"अग, आऊ ने आज माझ्या टीचर ला फोन केला होता अन मी गोष्ट लिहली नाही ते सांगून दिलं..."

"अस होय.....बरं मग काय झालं..."

"अन मग त्यांनी म्हणाल की पर्णवी ने नाही ना लिहलं मग आम्ही तिला ग्रुप अन ऍप मधून काढुन टाकतो....अन मला आता काढून पण टाकलं आहे."

"अरे बापरे...खरंच की काय..."

"अग खरंच.....मला काढून टाकल आहे....आता आत्तु...मला सांग....असं कधी कोणी करतं का? एक दिवस लिहलं नाही म्हणून काही लगेच ग्रुप अन ऍप मधून काढालं...."

"हो ना..."

"अस करतात का कधी...पण माझ्या टीचर ने केलं आहे...बघ ना..."😂😂😂🤣🤣🤣🤣🤣

हे असं आहे...इतकं शहाणपण फक्त स्वतःचा मुद्दा पटवायचा असतो तेव्हाच बरोबर येतो....नंतर मात्र मी आता छान लिहीन ,रोज लिहीन वगैरे वगैरे प्रॉमिस करून आम्हाला गुंडाळल अन त्यानंतर ये रे माझ्या मागल्या 🤣🤣😂😂

 

27 April 2021

आंबा परेड 😂😂😂

Edit Posted by with No comments
वंश परंपरेने आंबा प्रेम पर्णवी कडे पण आहे.आंबा हवा बस्स बाकी काही नको.पापड-आमरस,भात-आमरस,चपाती-आमरस,आमरस करताना राहिलेली कोय अन आंब्याचं साल, किंवा फोडी करून आंबा खाताना कोय अन साल एकदम चकाचक करणे हे असं आंबा प्रेम आहे.

मागच्या आठवड्यात दुपारी जेवण झाल्यावर आंबे खाण्याचा कार्यक्रम सुरू झाला.आजोबा अन पर्णवी यांच्या मध्ये फोडी कोणी खायच्या अन कोय कोणी खायची याचा करार झालेला आहे.खर तर दोघांचे अशे बऱ्याच गोष्टीत करार झालेले असतात.सकाळी लिंबू सरबत कोण बनवणार,गोष्ट कोण सांगणार वगैरे अन महत्त्वाचे म्हणजे नियम...तो बिलकुल ही तोडणे नाही. तर त्यादिवशी फोडी पर्णवी खात होती अन कोय आजोबा अस सुरू होतं. त्यादरम्यान दोघांचं झालेलं गप्पाष्टक.

पर्णवी : आजोबा, कोय आंबट आहे का

आजोबा : होय...आंबट गोड आहे.

पर्णवी : आजोब्या, आंबट असेल तर खाऊ नको बरं

आजोबा : नाही ,इतकी पण काही आंबट नाही

पर्णवी : बघ बर.... आंबट कोय खाल्लीस तर खोकला येईल तुला....अन जर काय खोकला झाला तर मला अजिबात सांगायला येऊ नकोस.

आजोबा : बरं

पर्णवी : बरं काय....अन ऐक आत्ताच सांगते तुला...जर खोकला झाला तर मग त्या नंतर तुझी कोय कॅन्सल... तुला अजिबात आंबा मिळणार नाही...अन मग मला लाडीगोडी लावायची नाही की... पणू... आंबा दे...कोय दे...समजलं..मी देणार नाही 😂😂😂🤣🤣🤣🤣😂😂

24 April 2021

घात विश्वासघात 😂😄🤣

Edit Posted by with No comments
चिकू ची आजोबांच्या सोबत भन्नाट connection आहे.सकाळी उठल्या बरोबर जे आजोबांसोबत मस्ती सुरू होते ते थेट रात्री उशिरापर्यंत.आजोबां सोबत गोष्टी, क्रिकेटच्या मॅच अन ऐतिहासिक मालिका अस सगळं फुल ऑन दोघांचं मेतकूट जमलेलं असतं.संध्याकाळी स्वामींची मालिका, घेतला वसा ,बाळू मामा वगैरे मूड असेल बघणं सुरु असतं.यादरम्यान त्यांच्या गप्पा म्हणजे एक वेगळाच प्रकार आहे.त्यात मूड असेल तसं आजोबांना वेग वेगळी नावाने हाका मारली जाते,आजोबा,आजोब्या,आजूबी अशी एक ना अनेक.

मागच्या आठवड्यात रामनवमीच्या दिवशी रात्री दोघांचा झालेला संवाद...साधारण आठ वाजले असतील,स्वामींची मालिका सुरु होत होती तेव्हा अचानक पर्णवी ला काय आठवलं देव जाणो...बाबांना म्हणे,

पर्णवी : आजोबी ,किती वाजले रे.

आजोबा : आठ वाजले, स्वामींची मालिका सुरू होते आहे.

पर्णवी :(नेहमीच्या एकदम मोठ्या माणसाच्या टोन मध्ये,सोबत हातवारे सुद्धा) आजोब्या, अरे घात झाला....

आजोबा: काय...कसला घात...

पर्णवी : अरे तू माझा विश्वासघात केला आहेस....प्रॉब्लेम झालाय सगळा...

आजोबा : अग पण नक्की केलंय काय मी...कसला विश्वासघात..

पर्णवी : अहो आजोबा, मी तुम्हाला सांगितले होते ना 7 वाजता रामायण लावा म्हणून....तुम्ही का लावलं नाही....आता मला कस बघायला मिळणार....तुम्ही न्यूज बघत बसले असणार ना...विश्वासघात केलाय तुम्ही 😂😂😂🤣🤣🤣🤣

यावर आता आजोबा काय बोलणार....असा प्रॉब्लेम आहे होय म्हणून गुपचूप ऐकून घेतलं ....परत लागेल तेव्हा बघू असं पटवून परत मालिका सुरू 🙈😀

23 April 2021

जिंदगी गुलजार है

Edit Posted by with No comments
बरेच दिवस झाले डायरी मध्ये आठवणीचा खजाना भरून ओसंडतो आहे पण लिहायला काही मुहूर्त लागत नाहीये.मागे एका पोस्ट मध्ये लिहलं आहे त्याप्रमाणे करोना मध्ये माझ्यासाठी सर्वात चांगली झालेली गोष्ट म्हणजे पर्णवी सोबत मिळालेला वेळ... जरी ऑफिसची भरपूर काम असली तरी ती सततची लुडबुड किंवा एखाद्या मिटिंग वेळी मध्येच येऊन डिस्टर्ब करणं किंवा हळूच चिमटा काढणं आ काही ना काही सुरूच असतं. डायरी ची पान सर सर पुढे जात आहेत,पिल्लू मोठं व्हायला लागलं आहे. जीवन नजरेसमोर भरभर पुढे जातंय मात्र आयुष्य जगायला कमी पडतोय अस कधी तरी वाटून जातं.खूप साऱ्या आठवणी लिहायच्या आहेत त्यासाठी वेळेचं गणित जमवाव लागेल.बघू या कस जमतंय.

बरीच जुनी गोष्ट आहे म्हणजे करोना सुरू होण्यापूर्वी ची...ऑफिस वरून घरी आल्यावर पाहिले 10-15मिनिटं चिकू सोबत मस्ती व्हायलाच हवी असा काहीसा अलिखित नियमच झाला होता.मग किती पण उशीर होवो डोळे ताणून पिल्लू वाट बघायचं.कधी कधी तर जास्त उशीर झाला तर वाट बघून झोपून पण जायची.

त्यादिवशी अचानकच ऑफिस मध्ये असताना कणकण जाणवायला लागली अन विशेषतः पाय प्रचंड दुखायला लागले.त्यामुळे ऑफिस मधून लवकरच म्हणजे वेळेवर निघालो 😀😀. घरी आलो तर चिकू समोरच, त्यामुळे थोडं वरवर गंमत करून तिच्या नकळत मी बेडरूममध्ये जाऊन बसलो.तोवर पाणी गरम व्हायला लावलं होत,म्हणलं जरा शेक घ्यावं म्हणजे मग बर वाटेल.गरम पाणी टब मध्ये घेऊन मी डोळे बंद करून शेक घेत होतो.अन हे करताना चिकू केव्हा बेडरूममध्ये आली हे मला समजलं पण नाही.जरा शेक घेऊन पाय मी टब बाहेर ठेवले होते तोच त्यावर कोणी तरी हलकी फुंकर घातली.कोण आहे बघायला डोळे उघडले तर लगेच ओरडा ऐकू आला....

" तू पण ना बाबा....तुला काहीच समजत नाही....भाजला ना पाय...कशाला गरम पाण्यात बुडवला.... आता असाच बस्स....मी फुंकर घालते म्हणजे मग तुला जर बर वाटेल....काय समजलं ना...."

अस म्हणून इटूकल्या ओठाचा चंबु करून फुंकर घालायला सुरुवात झाली.एक दोन मिनिटं झाले असतील मी आपला निःशब्द होऊन तो क्षण शक्य तेवढा जगून घेत होतो. लेकिचं ते निरागस बोलणं,ते हक्काने रागावणे, तो मोठेपणाचा हवा सारं काही हवं हवंस.

जिंदगी गुलजार है... बस पोटी एक लेक हवी...🤗

19 October 2020

म.....मराठी चा....😂

Edit Posted by with No comments
बाराखडी सोबतच लहान लहान मराठी शब्द मग त्यांची एकवचन , अनेक वचन, विरुद्ध रूपे, स्त्री लिंग,पुल्लिंग अशे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत सध्या पर्णवी अन भाचा अद्वय यांच्या सोबत शब्द खेळ चालू असतात याचीच ही गंमत...

एक वचन अनेक वचन
गाडी  -  गाड्या
खेळणं - खेळणी
पुस्तक - पुस्तके
.
.
.
.
.
फुल - फुलं 🤣🤣🤣🤣😂😂😂😂

स्त्रीलिंग पुल्लिंग 
हत्ती - हत्तीण
कुत्रा - कुत्री
वाघ - वाघीण
सिंह - सिंहीण
.
.
.
.
.
.
.
नळ - बायको नळ 🤣🤣🤣😂😂😂😂😂




10 October 2020

पुणेरी गुण 😄

Edit Posted by with No comments

WFH  सुरु झाल्यापासून खूप कमी वेळा असं झालं आहे की दुपारी माझं  जेवण अगदी बरोबर वेळेत झालं आहे. जेवणाची वेळ अन कॉल किंवा काही तर महत्वाचं काम  हे अगदी नित्यनेमाने झाली. त्यामुळे  असं खूप कमी वेळा झालं  की मी अगदी वेळेवर सर्वांसोबत जेवण केलं आहे. 

मागच्या आठवड्यात दुपारी माझा कॉल चालू होता. जेवणाची वेळ झाली तरी माझा कॉल काही संपेना. आई दोन तीन वेळेस बघून पण गेली. अखेरीस जास्त उशीर होतोय हे पाहून मग सर्वजण जेवायला बसले. आई आणि पर्णवी यांची नेहमीच जुगलबंदी चालू असते. माझा बाबा लहानपणी काय काय करायचा , कसा त्रास द्यायचा , कोणा कोणाची खोडी काढायचा , काम करायचा का  अशी इत्यंभूत सगळी माहिती आजी कडून आज पर्यंत काढून घेतली आहे. 

मग सर्वजण जेवायला बसल्यावर आपल्या नेहमीच्या सवयीने आई पर्णवी ला म्हणे,

" काय ग पर्णवी, काय करावं गं ... बाबा बघ तुझा सारखा कॉल वर असतो ..... "

"अग  आजी .... त्याला ऑफिसचं काम असत त्यामुळे कॉल असतात ".

"अग पण त्याच्या ऑफिस मधील लोक जेवण करतात  की नाही ... नेमकं कस काय ग जेवणाच्या वेळेला कॉल करतात ..."

यावर उत्सफुर्तपणे पर्णवी च उत्तर आलं... अन ते पण अगदी निरागस पणे .... 

" अग आजी , त्याच्या ऑफिस मधील लोक आहेत त्यांच्या आई किनई रोज सकाळी लवकर जेवण  बनवतात त्यामुळे सकाळी ते लवकर जेवतात... "

या वाक्या बरोबर घरात एक जोराचा हास्य धबधबा झाला. 😅😅😅😅

पुण्यात जन्म झाल्याचा हा कदाचित फायदा असावा.  


04 October 2020

गप्पाष्टक 02

Edit Posted by with No comments
आज दुपारी माझं काम सुरू होतं नेहमीप्रमाणे बाजूला पर्णवीच चित्र काढायचं काम सुरू होतं. सोबतच एकमेकांना टपल्या देण्याचं काम सुरू होतं. चित्र काढून झालं अन मग पर्णवी माता डोक्यावर बसली की चल मला गोष्ट वाचून दाखव.तिच्या लायब्ररीत सध्या फ्रॅंकलिन ची नवीन 3 पुस्तक आली आहेत त्यामुळे रोज त्याच पारायण सुरू आहे.यादरम्यान च्या आजच्या शिळोप्याच्या गप्पा🤣🤣🤣

"बाबी....चल ना  आपण झोपू तू मला गोष्ट वाचून दे..." 

"आलोच बच्चा.....अगदी थोडं काम राहील आहे मग झालं...पाच मिनिटं दे फक्त..."

"काय रे तू....पाच मिनिटांत येतो म्हणतो अन येत नाही.... मग मी पण माझी मिटिंग करू का? "
[घ्या....बडी बडी बाते....हे स्वगत....]

"तुझी कसली मिटिंग आहे...झालंय माझं काम...आलोच..."

"माझ्या माऊ सोबत आहे...मी करतेच मिटिंग..."

"बर ठीक आहे...कर..."

अस म्हणून वेळेवरच पांढरे निशाण दाखवून माघार घेतली अन तेवढं च जरा शांत राहील.मग मी माझं काम पटकन संपवलं अन मग आमची गोष्ट कार्यक्रम सुरू झाला सोबतच हे आजच ज्ञानामृत...

"बाबू ...तुला माहीत आहे का.... आपण आता इथे आहोत पण खरं तर आपण आता ढगांवर आहोत ..."

"म्हणजे काय...." माझा आपला भाबडा प्रश्न

अरे म्हणजे की किनई...[हातवारे करत...]

"हे आता आपण झोपलो आहोत ना....हे फक्त आपल्याला वाटत आपण झोपलोय पण खरं तर आपण ना ढगांवर मस्त पैकी फिरतो आहोत....एकदम वर वर....अन तुला सांगू का...खरं तर आपण हे अस नेहमीच असतो..."

हे ऐकल्यावर मी जरा शॉक झालो...कारण तिला अस म्हणायचं होत की...आपण फक्त शरीराने झोपलेलो असतो आपलं मन हे कधीच झोपत नाही...अन हे तिला अगदी सोप्या भाषेत विचारलं सुद्धा की तुला हे असं म्हणायचं आहे का...😊

हे झालं तोच लगेच म्हणे...."बाबू...आपण ना खर तर पक्षी असायला हवं होतं...."

"का ग...कशासाठी.... काय झालं असतं..."

"अरे मग आपण लॉकडाऊन मध्ये घरात राहिलोच नसतो...मस्त पैकी दूर दूर उडत गेलो असतो..."

"हो ना बच्चा....कसलं भारी ना...मस्त आपल्याला जिकडे हवं तिकडे गेलो असतो...."

"अस ढगांवर ....मग डोंगरावर... वेगवेगळ्या झाडांवर फिरलो असतो..."

"अग पण मग झोपलो कुठे असतो..."

"अरे आपण पक्षी असतो तर मग आपल्याला झाडावर घरटं बांधाव लागलं असतं.... अन त्यासाठी कष्ट करावं लागलं असतं...."

"अच्छा....अस होय...हो ना कष्ट कराव लागलं असतं..."

"अन बाबू तुला सांगू का....कष्ट केल की कष्टाचे फळ हे मिळतेच...."

हे ऐकल्यावर मला कोणीतरी मोठं तत्वज्ञान सांगतो आहे असंच काहीसं वाटलं🤗😊

भानावर येतोय तोच लगेच आदेश आला..."अरे बाबू....गोष्ट वाचतो आहेस ना...वाच की...."

एवढं सगळं ज्ञानामृत मिळाल्यावर मग आमची गाडी गोष्टी कडे गेली.😊