12 September 2022

सिझर बेबी

Edit Posted by with No comments
पर्णवी अन मी असं गप्पाष्टक सुरू असलं की कधी कोणता विषय सुरू होईल हे सांगता येणार नाही.मागच्या आठवड्यात दुपारी मी आपलं वाचत बसलो होतो अन बाजूला बाचकं आपलं काही तरी खुडबुड करत बसलं होतं. सोबतीला अखंड बडबड सुरू होती.अन मधे मधे बाबा काय रे तुझं माझं ऐकतच नाही.

मग मी आपलं मधून हूं... बोल...मग काही तरी तुफानी प्रश्न किंवा काही तरी ज्ञानामृत अस चाललं होतं...मग अचानक गुगली पडली अन मग प्रश्न-ज्ञानामृत मिळालं...ते असं...

"बाबा....तुला माहितये का मी सिझर बेबी आहे...."

हे ऐकल्यावर एकदम लगा लगा लगा....जोर का झटका धीरे से असं झालं...

मग मी पण म्हणालं चला ऐकू या...तेवढं च जरा ज्ञानवृद्धी 🤣🤣

म्हणलं..."नाय रे पिल्या.... काय असतं ते..."

मग कपाळाला हात लावत..."बाबा...अरे इतकं पण माहीत नाही....अरे आपलं टमी असतं ना त्याला डॉक्टर काका असं कट करून मग बेबी ला बाहेर काढतात मग त्या बेबी ला बाहेर काढतात...मग ते बेबी म्हणजे सिझर बेबी...मी ग्रमी [ग्रमी म्हणजे सुजाता...सध्या आई ला आम्ही हे टोपण नाव दिल आहे..😂😂😂🤣🤣] च्या पोटात होते ना तेव्हा डॉक्टर काकांनी मला असंच बाहेर काढलं होत...समजलं का"

"अच्छा....असं होय...मला तर हे माहीतच नव्हतं...बरं झालं मला सांगितलं ते...."

"अरे उन्नी दीदी, आर्या दीदी अन आदू हे पण सेम आहेत..."

"बरं मग त्याचं काय आता..."

"अरे बाबा...जे सिझर बेबी असतात त्यांना खूप गरम होतं.. अन त्यांना सारखा फॅन हवा असतो...तुला किंवा ग्रमीला गरज नाही पडणार पण मला ,आदू ला मात्र हवा असतो "

"हो काय...म्हणजे तुम्हाला सारखा फॅन हवाच तर...."

या नंतर मग हळूच आदेश आला..."बाबा...प्लिज फॅन लावतोस का रे?"

यानंतर हो म्हणून मी मनातल्या मनात.."म्हणजे आम्ही येडे..."

तर हे असं आहे सगळं 🤣🤣🤣😂😂😂





07 August 2022

परतावा !!

Edit Posted by with No comments

 आपण सांगितलेली एखादी शिकवण कधी अन कोणत्या वेळी आपल्यावरच परतवली जाईल याचा काही नेम नसतो. याचा आता खूप चांगला अनुभव गाठीशी आलाय. असंच काहीसं आज झालं. आज दुपारी माझं अक्षरधारा ला जायचं ठरलं होतं . मी अन सुजाता याबद्दल बोलत होतो, मी एकटाच कुठे तरी जातोय अशी कुणकुण लागताच लगेच छोटं हायकमांड ने लगेच प्रश्नावली सुरु केली.. 

" बाबा...कुठे जातो आहेस रे ?"

" मी गावात जातोय ..." [मला जेव्हा सिटी मध्ये म्हणजेच टिळक रोड, लक्ष्मी रोड, असं मध्यवर्ती भागात जायचं असेल तर गावात जातो असं बोलायची सवय आहे ]

" गावात ?? मग मी पण येऊ  का रे ? मी गावात कधीच गेली नाही  रे ..."

" अग गावात म्हणजे तूझ्या शाळेजवळच  जातोय .... "

" बरं ... पण तरी येऊ का रे बाबा ..."

अशा वेळी मग  मी संधी कशी सोडणार... म्हणाल एका अटीवर ... " माझी स्तुती कर... म्हणजे माझ्यावर छान छान १० वाक्य बोल अन आई पेक्षा सर्वात जास्त मीच आवडतो हे कबुल कर लगेच घेऊन जातो ...."

आता  झाली का पंचाईत आई ची पार्टी तर सोडायची नाही पण बाबा बरोबर जायच तर आहे मग काय करावं  बरं ?? असं हो नाही वगैरे सुरु होत मग ब्रम्हास्त्र म्हणजे रडायला सुरु केलं ....त्यामुळे शिस्तीत माघार घेतली अन मग मी व पर्णवी दोघे अक्षरधारा ला गेलो. आमची पुस्तकं घेऊन झाली अन बाहेर आलो तर तिथे शेजारी असलेल्या भेळी च्या गाड्यावरून असला भारी वास येत होता की बस्स... लगेचच छोटा पॅकेट म्हणे... 

" बाबी .... पाणी पुरीचा कसला रे भारी वास येतोय ..."

" हो ना ... झकास वास आहे ... इथे मस्तच पाणी पुरी मिळते .."

मग जरा सूचक मौन .... अन त्यांनतर मग मीच जरा फिरकी घ्यावी म्हणून विचारलं... 

" चिकू .... का ग ..तुला खायची आहे का पाणी पुरी ?"

लगेचच चेहऱ्यावर अगदी साळसूद भाव आणत ... " माझं काही नाहीये ... तुलाच खायची असेल तर बघ... माझं काही नाही हा..."

" असं होय ...बरं  मग नको खायला मला तर काही भूक नाहीये..  तुला खायची असती तर खाल्ली असती पण  आता असू देत..."

आता मात्र पर्णवी चा चेहरा पाहण्यासारखा झाला होता... खायचं तर होत पण नेहमीप्रमाणे माझ्यावर ढकलून रिकामी झाली होती ...म्हणजे दोघांनीच खाल्लं असं आई ने विचारलं तर मी नाही म्हणाले होते पण बाबा ने च खाऊ घातलं असं सांगून बिल बाबा वर फाडायचं अन आपण नाम निराळं राहायचं हे नेहमीच आहे. 

जरा वेळ शांततेत गेला ...अन मग अचानक म्हणे ... 

" बाबा...आपल्या दोघांत लहान कोण आहे ?"

" मी .... तू तर  नेहमीच म्हणते ना की मोठी आहेस ..."

" ते गंमत रे ...खरं सांग ना ..."

" बरं ...मी मोठा आहे ... अन तू लहान आहेस "

"हो ना ....  अन तू म्हणतो की नाही ... लहानांनी मोठयांच सगळं ऐकायचं ... तर मग ठरलं तर ..आत्तापासून मी तुझं सारं काही ऐकणार ...तू म्हणशील तसं ... म्हणजे आता जर तू म्हणालास की पाणीपुरी खाऊ या तर खाईन मी किंवा अजून काही तुला खावंसं वाटलं तर खाऊ या आपण ... मी ऐकणार तुझं ..."😎😄

थोडक्यात काय तर ...काही पण होऊ देत ...बाबा ला कसं गुंडाळायचं हे लेकीला अगदी परफ़ेक्ट जमलं आहे  ते पण त्याचेच उपदेश त्याला ऐकवून !!

" असं होय ... मला तर डोसा खावा वाटतो आहे.. चालेल का..."

थोड्डसं जरा विचार करते आहे असं दाखवत ...😇

" किती वाजलेत रे आत्ता ...खुशबू चालू नसेल झालं ना ...जाऊ देत मग आपण नागब्रम्ह लाच जाऊ या ... मला डोसा चालेल पण अप्पे खाऊ या का रे ... "😅😅

असं म्हणत आम्ही नागाब्रम्ह ला निघालो... आन अर्थातच सर्व खाऊन वगैरे झाल्यावर .... बाबा... मी तुझी गंमत केली होती रे ... तू लहानच आहेस अजून अन मीच मोठी आहे हे सांगायला विसरली नाही !!😂😂

27 July 2022

पसारा पुराण !!

Edit Posted by with No comments
घराचा असा एकही कोपरा नाही की जिथे पर्णवी मातेने आपल्या अस्तित्वाची खूण सोडली नाही.पर्णवी शाळेत जाते तेव्हा त्या वेळात घर मोकळा श्वास घेत. अन त्या वेळात घर अगदी गरीब होऊन जातं.सार काही जागेवर,कुठेही काहीच अस्ताव्यस्त नाही.यादरम्यान घराला जी काही गरिबी येते ती पर्णवी च आगमन होताच चुटकीसरशी गायब होते अन घर गर्भश्रीमंत होतं. हॉल,किचन ,बेडरूम, गॅलरी ,ड्रेसिंग टेबल ,सोफा इ इ ठिकाणी लाथ मारेल तिथे पाणी काढेल या धर्तीवर हात घालेल तिथे पर्णवी ची वस्तू सापडेल अशी परिस्थिती असते.

अन यानंतर मग खरी गंमत असते.कारण पसारा आवरायचा कोणी हा फार मोठा मुद्दा असतो.अन मग अशा वेळी बाबा वरील प्रेम उफाळून येतं. मग एक ना अनेक क्लुप्त्या सुरू होतात... एकदम लाडात यायचं....बाबा तू किती चांगला आहेस...तू बेस्ट आहेस... आज मी खूप थकले आहे... मग आपण समजून घ्यायचे वधस्तंभावर जायची ही तयारी आहे.शास्त्रा प्रमाणे पसारा आवरणे प्रकारात बाबा चाच नेहमी बळी असतो कारण आई कडे शष्प काही होणार नाही हे एकदम ठावूक असतं. कारण आई लेकीच्या एक पाऊल पुढे आहे त्यामुळे तिकडे डाळ काही शिजत नाही.

असंच काहीसं आता शुक्रवारी झालं. बेडरूममध्ये पर्णवी ने फुलऑन राडा करून ठेवला होता.जेवणं झाली अन त्यानंतर जोश मध्ये मस्ती सुरू होती.सगळ्यांना त्रास देण्याचं काम सुरू होतं तितक्यात सुजाता ने किचन मधूनच ऑर्डर सोडली इतकाच जोश आहे तर पटकन पसारा आवरून घे म्हणजे मग पटकन झोपता येईल. या एका वाक्यासरशी सगळा माहोल च बदलून गेला.मी संधी साधून हॉल मध्येच आडवा होऊन गेलो.कारण पसारा गळ्यात पडणार हे लक्षात आलं होत.सुजाता च्या आदेश येताच नेहमी प्रमाणे पर्णवी ने लगेच माझ्याकडे बघत मी करू शकतो की नाही याचा अंदाज घेतला.जस लक्षात आलं की आज बाबा कडे आपलं काही होणार नाही. तस लगेच पुन्हा किचनमध्ये सुजाता कडे जात म्हणे,

"आई...एक सांग रोज पसारा आपण दोघीचं आवरत असतो की नाही?"

"हो...."

"बाबा ने कधीतरी पसारा आवरला आहे का...रोज
आपल्यालाच पसारा आवरायला लागतो..."

"बरं मग..."असा भाव ठेवत सुजाता ने फक्त पर्णवी कडे बघितलं.

"मग आता मला एक सांग...रोज आपणच आवरतो मग किमान weekend ला तरी बाबा ने आवरायला हवंय की नाही..सांग बरं..."

सुजाता गडबडीत होती त्यामुळे काही करा पण पसारा आवरा बाकी मला काही माहीत नाही... असंच होतं...आई चा एकंदरीत नूर बघून पुन्हा रोख बाबा वर आला. अन बाहेर येऊन लगेच आदेश सुटला...

"बाबा हे बघ...रोज मी अन आई पसारा आवरत असतो त्यामुळे नियमानुसार weekend ला तुलाच पसारा आवरावा लागणार आहे..."🤣🤣🤣🤣

मग यानंतर बाबा गप गुमान पसारा आवरायला निघाला🙈😂

19 March 2022

निबंध - माझे गुरू☺️

Edit Posted by with No comments
पर्णवी ला इंग्रजी लिहण्याचा सराव व्हावा म्हणून रोज तिला चार पाच ओळी आम्ही लिहायला सांगतो.एक दोन आठवड्या पासून रोज शुद्ध लेखन लिहायच अशी group activity सुरू केली होती मग त्यात भाषेचं बंधन अस काही नाही.दोनेक दिवसांपूर्वी पर्णवी ने स्वतःच्या मनाने माझे गुरू असा लहानसा निबंध लिहलाय.मराठी ची सध्या तिची फक्त अक्षरओळख सुरू आहे.शब्द वाचू शकते, सोपे शब्द लिहिते पण जोडशब्द अजून काही जमत  नाही.हे जे काही लिहलं आहे हे तिने स्वतःच्या मनाने लिहलं आहे.कोणी काही सुद्धा मदत केली नाहीये त्यामुळे जोडशब्द लिहताना जरा गोंधळ केलाय 😃

13 March 2022

कोल्ड कॉफी 😃

Edit Posted by with No comments
विकांताला मला सकाळीच कामासाठी बाहेर जायचं होतं म्हणून मी माझं पटकन आवरून तयार होतो.निघणार तोच पिल्लू बागडत आलं अन अगदी केविलवाणा भाव घेऊन म्हणे..
"बाबा...तू बाहेर जातो आहेस काय..."

म्हणलं ..."हो पिलू...मला थोड्या वेळाच काम आहे एक दोन तासात येईल लगेच..."

माझं बोलणं पूर्ण होण्या आधीच लगेच समोरून प्रत्युत्तर आलं..."थोडंच काम आहे तर मी पण येऊ का...चालेल ना..."

नाही म्हणायचा काही प्रश्नच नव्हता किंवा तो पर्याय च नव्हता...मी काही बोलण्याआधी स्वारी अगदी शून्य मिनिटात तयार पण झाली. बाबा ला ब्लॅकमेल करून कस गंडवायच हे अगदी परफेक्ट जमायला लागलं आहे 😂😅

आम्ही नाश्ता न करताच निघालो होतो त्यामुळे सोसायटी मधून जस बाहेर पडलो तेच मी आपलं सहज विचारलं ..."पर्नू...तुला भूक लागली आहे का? नाश्ता करायचं का ?"

तर म्हणे..."बाबा...म्हणजे अस काही नाही...पण तू म्हणत असशील तर करू या नाश्ता...."म्हणजेच याचा अर्थ असा की बाबा नाश्ता करायचा आहे 😂😅

नाश्ता करायचा म्हणून मग आम्ही डोसा खायला रेस्टॉरंट मध्ये गेलो.ऑर्डर दिली अन मग आमच्या दोघांच्या गप्पा टप्पा सुरू झाल्या मग हॉटेलमध्ये हेच का मग तस का नाही असं काहीसं सुरू होतं. मी आपलं शक्य तितके उत्तर देत होतो.तेच आम्ही बसलो तिथेच समोरील बाजूला फिल्टर कॉफी बनवत होते ते पाहून पर्णवी म्हणे..."बाबा,कोल्ड कॉफी कशी बनवतात...गोड असते का...बर्फ असतो का...खूपच थंड  असते का..." अशा एका मागून एक बाऊन्सर आले...मी सगळी उत्तर देत गेलो अन मग शेवटी गुगली पडली....

"बाबी....ऐक ना...आपण आज कोल्ड कॉफी पिऊ या का रे...मी कधीच पिली नाहीये...आदु, रितिका,निहू यांनी सर्वांनी पिली आहे..."

मी शक्य तितका निर्विकार भाव ठेवत फक्त ..."हम्म" केलं यावर मग प्रत्युत्तर आलं..

"तू अन आई म्हणाला आहात की मी  11 years ची झाल्यावर मला कॉफी देणार ..."

"पण मला माहित आहे की मी 11 years ची झाली की तुम्ही म्हणणार 15 years ची झाली की देऊ...अन अस करत करत मी म्हातारी होईल....अन म्हातारी झाल्यावर पण  तुम्ही म्हणाल...पर्नू...अजून थोडी म्हातारी होऊ दे मग तुला कोल्ड कॉफी देतो...अरे अस कुठे कधी असत का" 😂😂😂😂

अन यानंतर मात्र मला काही सिरीयस राहता आलं नाही आणि सोबत डोसा पण आला...त्यामुळे जास्त काही न बोलता आज आपण पिऊ या अस म्हणत खाण्याचं काम सुरू झालं.😃

12 March 2022

खायची गोष्ट आहे का...😉

Edit Posted by with No comments
संध्याकाळी मी कामानिमित्त बाहेर गेलो होतो तेव्हा ट्रॅफिक मध्ये अडकून राहिलो त्यामुळे यायला उशीर झाला होता.रात्रीच्या जेवणात थालीपीठ चा बेत होता.थालीपीठ अन शेजवान चटणी हा पर्णवी चा एकदम आवडता प्रकार आहे.नेमकं शेजवान चटणी संपलेली मला यायला उशीर मग आता दुकानात कोण जाणार यावरून माय लेकी मध्ये झालेली फटकेबाजी खालील प्रमाणे....

पर्णवी- आई, मी जाते ना एकटी दुकानात अन घेऊन येते चटणी.

सुजाता- पिलू....तू लहान आहेस अजून अन आता अंधार पण पडला आहे...मी बाबा ला सांगते तो घेऊन येईल

पर्णवी-  आई...तुला ना मला लहान च ठेवायचं आहे...मी 11 years ची झाली किंवा 13 years ची झाली तरी तू असंच म्हणणार आहेस

सुजाता : अग पण रात्री गाड्या वेगात असतात...तुला अंधारात लक्षात नाही येणार.

पर्णवी - आई तुला माहीत आहे का टीचर ने आम्हाला स्कुल मध्ये रस्ता कसा क्रॉस करायचा हे शिकवलं आहे.अन शाळेत काय असंच उगाचंच शिकवतात का? अन मी 4 years ची होती तेव्हा गेली होती की नाही एकटी?

सुजाता - हो...तू गेली होतीस पण तेव्हा बाबा गुपचूप तुझ्या पाठीमागे आला होता.

पर्णवी - आई, तू फक्त 10 रुपयाचं coin नेऊ की नोट नेऊ एवढंच सांग...मी काही आता लहान नाही... मी एकटी जाऊन घेऊन येऊ शकते

सुजाता - नाय रे पिल्लू....अजून तू लहान च आहेस त्यामुळे अंधारात एकटी नको जाऊ बरं

पर्णवी- आई ....आता मी 7 years ची झाली आहे ...अन 7 years म्हणजे काही लहान नाहीये....मी मोठी च झाली आहे....7 years च होणं म्हणजे काही खायची गोष्ट नाही...समजलं ना 😂😂🤣🤣🤣

अखेरीस मोठ्ठं झालेल्या माणसाने फोन करून बाबा लाच चटणी आणायला लावली 😁😃

10 March 2022

आता काय...😃

Edit Posted by with No comments
वेळ : रात्री 11.30 ची

स्थळ : बेडरूम

पात्र : आई , बाबा अन पर्णवी

दुपारी मस्त पैकी झोप झाल्यामुळे रात्री 11 नंतर मग पर्णवी च्या  दिवसाची सुरुवात झाली होती.माझं ऑफीसच काम पण जवळपास संपत आलं होत त्यामुळे माझी आपली आवराआवर चालली होती. अन सोबतीला पर्णवी चा दंगा सुरू होता.मी माझं आपलं आवरत होतो पण नियमानुसार बेड च्या एकूण एक कोपऱ्यात पर्णवी ची खेळणी, वह्या ,पुस्तके असा मजबूत पसारा पडला होता.शाळेची बॅग सुद्धा सुजाताला भरायला लावून पर्णवी माता मस्तपैकी चिल करत होत्या.असा एकंदरीत माहोल होता.
पण इतका पसारा बघून मग मात्र सुजाता ने जरासा सौम्य असा रुद्रावतार घेतला अन पर्णवी ला जरासं ओरडली.अन त्यानंतर जरा व्यवस्थित ठेवण्या वरून थोडं फार सुनावलं तर यावर आलेली प्रतिक्रिया :

पर्णवी : आई, तुला पण आत्ताच बोलायचं होत का?

सुजाता: अग पण काय झालं

पर्णवी : तू आता झोपताना पसाऱ्यावरून का बोलली,आता हे सगळं माझ्या डोक्यात राहणार अन मी विचार करत झोपणार नाही ते सुद्धा सकाळी 6 पर्यंत...

मी: म्हणजे आता मला पण पर्णवी सोबत जागायला लागणार तर...

सुजाता: हो काय....बर ठीक आहे मग आता तुम्ही दोघे जागणार आहातच तर तेवढा संस्कृत चा अभ्यास तेवढा पूर्ण करून घ्या 😂🤣

अभ्यासाचं नाव येताच एकदम वातावरणात बदल अन म्हणे...
"काही नको ...ऑलरेडी एक डोक्यात आहे तर आता अजून एक डोक्यावर देऊ नकोस...जाऊ दे मी झोपतेच आता..."

हे असं इतकं आता नौटंकी सुरू असत...😂😂😂🤣🤣🤣