24 January 2019

संवेदना!!

Edit Posted by with No comments

दोनेक महिन्यांपूर्वी शुक्रवारी ऑफिसवरून घरी आल्यावर पर्णवी नेहमीपेक्षा जरा जास्तच लाडात आली होती.तेव्हाच लक्षात आलं आज काही तरी गडबड झाली आहे त्यामुळेच ही लाडीगोडी आहे.तोच सुजाता ने सांगितलं...."बाबा...आज तुला तिच्यासोबत बेडरूममध्ये बोलायचं आहे...अन मी काही सांगणार नाही तू तिलाच विचारायचं आहे."हे ऐकल्यावर पर्णवी चा खरं तर चेहरा पडला होता पण उगाचंच आपला उसना आव आणून दंगा सुरू होता.

त्याआधी थोडं बेडरूम विषयी...पर्णवी चा अन माझा बेडरूममध्ये खिडकी जवळचा कोपरा म्हणजे आमचा कट्टा...आमच्या सिक्रेट चा ,कनफेशन्स चा, मस्ती चा एक मूक साक्षीदार...तिच काही चुकलं किंवा हट्ट करून बसली असेल तर समजावण्यासाठी ही एकमेव जागा....आमच्या दोघांच्या नात्यातील एक हळवा कोपरा.

माझं जेवण झाल अन मग पर्णवी सोबत बेडरूममध्ये जायला निघालो....बेडवर नेहमीप्रमाणे बसलो तोच पर्णवी काही बोलायच्या आत मांडीवर आली अन इवल्याश्या हातांनी घट्ट मिठी मारली...त्या मिठी मधील भावना व्यक्त करायला खर तर शब्दच नाही आहेत पण ही मिठी नेहमी सारखी नव्हती हे नक्की.

जरावेळ आम्ही दोघे पण निःशब्द होतो...आजूबाजूला एकदम निरव शांतता होती...अन हे करताना ती माझ्याकडे पाहत नव्हती..शेवटी मग मीच....चिकू काय झालं बच्चा...अस म्हणत माझ्या  दोन्ही हातात तिचा चेहरा पकडून मान वर केली तर....दोन टपोऱ्या इवल्याशा डोळ्यात खूप सारे ढग भरून आले होते...केव्हा बरसू शकतील अशी अवस्था होती...मग एक मोठा आवंढा घेत बोलू लागली...." बाबू....माझं चुकलं रे...आजीला माझ्या तोंडातून पडवून गेलं तस... [आजी ला मी चुकून बोलले यासाठी ते पडवून गेलं 😀😀] मी परत नाही वागणार अस...सॉरी "

"तुला वाटतय ना तुझं चुकलं...मग झालं तर...अन चूक झाल्यावर काय करतो आपण??"

"स्वामी आजोबांना बाप्पा करायचा अन सॉरी बोलायचं....आजी ला पण बाप्पा करायचं अन सॉरी बोलायचं"

अस म्हणली अन टुणकन उडी मारून देवघरात गेली...स्वामींना नमस्कार करून सॉरी म्हणाली अन मग आजीला बाप्पा करून ...सॉरी म्हणत...मस्ती सुरू " 😊😊

स्वामी कृपेने आयुष्यभर चिकूने जगण्यातील सहजता अशीच जपावी....आता मनाची पाटी कशी कोरी आहे त्यामुळे ज्या सहजतेने झालेली चूक कळाली पण व माफी सुद्धा मागितली.मोठ झाल्यावर पण हे असच राहावं अशी इच्छा आहे.कस आहे...जस आपण मोठे होत जातो तस या पाटीवर षडरिपू येतात अन साध सरळ जगणंच आपण विसरून जातो.मग राहतात ते फक्त वाद,विवाद,अहंकार.

काही वेळापूर्वी जमा झालेले ढग न बरसातच निघून गेले होते अन सार कस निरभ्र झालं होत...सगळ्याचा कसा निचरा झाला होता..राहिला होता तो फक्त निखळ आनंद अन माझ्यातला अंतर्मुख झालेला बाप.

0 Comments:

Post a Comment