17 July 2021

गप्पाष्टक 04

Edit Posted by with No comments
आपण रोजच्या आजबाजूला दिसणाऱ्या नेहमीच्या गोष्टी किंवा व्यक्ती याबाबत इतकं गृहीत धरून असतो की आपल्याला पडद्याआड असणारी बाजू वा दुसऱ्या दृष्टीकोनातून असणारी बाजू आपल्याला दिसत नाही मात्र लहानग्या च असं नसतं त्यांच्या निरागस मनाला अशाही बऱ्याच गोष्टी दिसतात किंवा त्यातून येणारे प्रश्न नकळत अंतर्मुख करतात.

आज सकाळी मी अन पर्णवी दूध आणण्यासाठी गेलो होतो, तेव्हा पालिकेची गाडी कचरा घेण्यासाठी आली होती.तस पाहिलं तर माझ्यासाठी हे रोजचं आहे कारण माझी ऑफिसची वेळ अन पालिकेच्या गाडीची वेळ एकच असते.रोजच या गाडीला बायपास करून जातो म्हणजे माझ्यासाठी तो रुटीनचा भाग आहे.आज सकाळी ती गाडी पाहिली अन पर्णवी ने मला लगेच प्रश्न केला...

"बाबी, हे काका काकू जे कचरा गाडी मध्ये ठेवत आहेत त्यांना त्या गाडीवर इतक्या माशा आहेत त्याचा त्रास होत नाही का रे?"

"होत असणार की....ते पण आपल्या सारखेच आहेत ना...."

"त्यांना त्रास होतोय ना मग ते हे काम करतात..."

माझ्यासाठी हा प्रश्न खूप अनपेक्षित होता...काय उत्तर द्यावं... हे क्षणभर मला काही सुचेनासे झालं...

"ती त्यांची गरज आहे म्हणून हे काम करत असतील....त्यांना दुसरं काम मिळालं नसेल त्यामुळे मग ते हे काम मिळालं म्हणून करतात....अन मग या कामातून त्यांना पैसे मिळतात त्यामुळे जेवण,शाळा असं सारं काही करू शकतात..."

माझा आपला उत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न करून झाला...ते कितपत पटेल हे माहीत नाही तोवर पुढची प्रतिक्रिया आली...

"अच्छा म्हणजे बाबी, त्यांना त्रास होतोय पण त्यांना हे काम करायला लागत आहे....म्हणजे  त्यांना त्या त्रासाची सवय होऊन गेली आहे ....बरोबर ना ?....."

"सवय होऊन गेली आहे...."यावर मी एकदम आश्चर्यचकित झालो..आपण जसे मोठे होतो तस परिस्थिती अन गरज यापोटी कितीतरी त्रासांची सवय करून घेतो....हो की नाही?

0 Comments:

Post a Comment