10 August 2021

असं का बरं ?

Edit Posted by with No comments

जेव्हा आपल्या मनाची पाटी कोरी असते तेव्हा आपला एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा असतो. लहान मुलांचं अगदी असंच असतं .त्यांच्या मनाची पाटी कोरी असते त्यामुळे जे त्यांना दिसतं ते आपल्या मोठयांना दिसत नाही. मग कधी तरी त्यांच्या कडून त्याबद्दल बोललं गेलं की ती गोष्ट आपल्याला आश्चर्यचकित करते तर कधी अंतर्मुख करते. असंच काहीसं मागच्या आठवड्यात झालं. 

माझ्या मित्राच्या मुलाचा वाढदिवस होता तेव्हा मी, सुजाता , भाचा अद्वय अन पर्णवी असं चौघे जण गेलो होतो. चिल्लर गॅंग बरेच दिवस घराबाहेर कुठे गेले नव्हते त्यामुळे बाहेर जायचं म्हणून दोघे पण खूप खुश होते. करोना मुळे तर वाढदिवस, हॉटेल किंवा बाहेर कुठे बागेत जाणे वगैरे अशे सारे प्रकार अगदी बंदच झाले आहेत त्यामुळे करोना काळात कंटाळलेल सर्वात जास्त कोण असेल तर ते  चिल्लर कंपनी . बऱ्याच दिवसांनी बाहेर पडल्यामुळे मग बाहेरची गंमत बघण्यात अन मस्ती करण्यात दोघे जण व्यग्र होते. अन सोबत प्रश्न याची जंत्री सुरूच होती. 

मित्राकडे पोहचलो तेव्हा लहानग्याचे खेळ सुरु होते. सगळी धम्माल सुरु होती. अद्वय ची लगेच मस्ती सुरु झाली पण पर्णवी ला मात्र जरा वेळ लागला. तिचं आपलं निरीक्षण सुरु होतं . जरा वेळाने मात्र खेळणं सुरु झालं. असाच थोडा वेळ गेला असेल पर्णवी सुजाता कडे आली अन म्हणे... 

" आई , मला एक सांग इथे सगळी लहान मुलं , ताई  अन दादा आहेत सर्व जण  खेळत आहेत मात्र ती तिकडे एक ताई आहे पण ती  मात्र  खेळत नाहीये . ती तर तिच्या आई सोबतच थांबली आहे. ती तर इकडे आली पण खेळली नाही.  असं का बरं ?"

ती मुलगी म्हणजे मित्राच्या घरात ज्या मावशी येतात त्यांची मुलगी होती, तशी ती त्यांच्या घरातील माणूस असल्यासारखीच आहे पण इतकी सगळी मुलं अन लोक  पाहून ती बावरली होती अन तिच्या आई जवळ जाऊन थांबली होती. इतक्या सगळ्या गोंधळात हे मात्र कोणाच्याही लक्षात आलं नव्हतं  तेच नेमकं मात्र पर्णवी च्या लक्षात आलं. 😊😊

0 Comments:

Post a Comment