23 April 2019

धडा!!

Edit Posted by with No comments
रोज ऑफिसवरून घरी येताच क्षणी पर्णवी चा अन माझा किमान किमान 10-15 मिनीट नॉन स्टॉप दंगा असतो.मी आल्याची चाहूल तिला एकदम परफेक्ट लागते.गेटचा आवाज झाला की दरवाजा मागे लपायच मग मी गुपचूप दरवाजा उघडायचा अन मग तिला शोधायचं नाटक करायचं. शोधलं की मग थोडासा डान्स...थोडी लुटपुटीची कुस्ती...मग शाळेतील,बालभवन च्या गोष्टी...अभ्यास काय केला...अन आवर्जून मी अगदी कुणालाच त्रास दिला नाही...एकदम शहाणी वागले हे सांगणं...हा असा आमचा रोजचा नित्यनेमाचा कार्यक्रम असतो.

बुधवारी ऑफीस वरून आलो तेव्हा पर्णवी drawing करण्यात एकदम गुंग होती त्यामुळे मी तिला उगाच डिस्टर्ब नको म्हणून किचन मध्ये गेलो.[म्हणलं drawing चाललं आहे तर चालू दे आपण उगाच तिच्या मध्ये कशाला जायचं असा फक्त विचार होता.] अन सुजाता सोबत बोलत होतो तोच बाबू...म्हणून पर्णवी ने पायाला मिठी मारली अन त्यानंतर उचलून घे अस खुणावल....उचलून घेतल्यावर अगदी अनपेक्षित असा प्रश्न आला....

दोन्ही इटूकल्या हातात माझा चेहरा पकडला अन म्हणे...
"बाबू....काय झालं रे आज?"

मी म्हणलं..."कुठे काय....काहीच नाही...."

"नाही...काही तरी झालंय....आजच तर आल्यावर तू माझ्याशी बोललाच नाही..." अस म्हणून हातांचा गळ्याभोवती वेढा पडला अन खांद्यावर डोकं आलं...

मग अलवार हाताने थापटत तसाच बेडरूममध्ये गेलो अन मग समजावलं अस काहीच नाही बच्चा......अन त्यानंतर त्या लहानशा मिठीत बाप लेकीचा निःशब्द असा एक संवाद सुरू झाला....😊😊😊

जरावेळ असाच मिठीत गेला मग जेव्हा तिची खात्री पटली की सगळं नॉर्मलच आहे तेव्हा कुठे गाडी ट्रॅक वर आली ...😍😍😍

आपल्याला उगाचच वाटत की लहान पिल्लांना काही कळत नाही.मला तर वाटत उलट त्यांनाच जास्त कळत कारण ते फक्त वर्तमान जगत असतात अगदी स्वच्छंदीपणे.....माझ्यातील बापासाठी मात्र हा एक धडा होता....आयुष्यभरासाठी 😊😊

आंघोळ!!

Edit Posted by with No comments
पर्णवी ला स्कुल ला जेव्हा पासून सुट्टी लागली तेव्हापासून सात शिवाय झोपेतून न उठणारी लेक आता 5.30 लाच जागी होते आहे.अन ते पण एकदम फ्रेश मूड मध्ये....शाळा चालू होती तेव्हा सकाळी झोपेतून उठवणं म्हणजे सर्वात अवघड काम.कधी कधी तर एवढी गाढ झोपलेली असायची की झोपेतून उठवायला जीवावर यायचं. सुट्टी लागल्या नंतर मात्र काय झालं माहीत नाही 5.30-6 लाच पर्णवी झोपेतून जागी होते अन तेव्हा पासून दंगा सुरू होतो...."अरे काय झोपताय....सकाळ झाली ....उठा लवकर....." वगैरे....वगैरे सुरू असत.

आज पण असच झालं...सहा वाजता पर्णवी मातेचा अलार्म वाजला अन तेव्हा पासूनच मग गोष्ट सांग...आज स्विमिंग आहे का रे...तुला ऑफिस आहे का...माझ्या डॉल ला आज तरी छोटा पाळणा घेऊन ये....हे अस आमचं सुरू होत...माझी पण झोप गेली अन मग जरा वेळ मस्ती करून मी आंघोळीसाठी साठी जायला निघालो तर म्हणे मला पाठकुळी घे अन किचन मध्ये सोड....आदेश आला म्हणल्यावर पालन करणं आवश्यकच होत...पर्णवी ला किचन मध्ये सोडलं अन मी आंघोळीसाठी जायला लागलो तर सुजाता ने लगेच पर्णवी ला सांगितलं....जा बाबा सोबत शंभो करून घे....

यानंतर पर्णवी मातेने दिलेलं आजच ज्ञानामृत....

"आऊ....शंभो काय???....(हा एकदम स्टाईल मधला डायलॉग)

सुजाता: अग....बाबा शंभो करायला जातोय ना तर तू पण आज त्याच्या सोबतच शंभो कर...

"अग आऊ....पण मी आत्ताच उठले आहे ना...."

सुजाता: म्हणून काय झालं...जा पटकन आवर

" झोपेतून उठल्यावर लगेच कधी शंभो करतात का??"🤔🤔

सुजाता : मग काय करतात??

" अग आऊ...झोपेतून उठलं की आधी खाऊ खायचा.....मग मस्ती करायची असते.....अन त्यानंतर मग शंभो करायचा असतो...."🤣🤣🤣🤣

हे ऐकल्यावर मग मी आपलं हळूच म्हणालो...." बरोबर हाय ग माझे माय.....शास्त्र असत ते....😂😂😂😂"

समानता!!!

Edit Posted by with No comments
पर्णवी अन तिच्या समवयस्क मुलं बघताना माझं एक लहानस निरीक्षण अस आहे की ही पिढी जी आहे ते त्यांच्या मतांवर ठाम असतात अन ते त्यांच म्हणणं पटवण्यासाठी जे लॉजिक लावतात ते तर अफलातून असतं. या सोबत त्यांच्यात थोडासा बंडखोरपणा स्वभावात आहे.आपल्या लहानपणी आपल्याला दोन फटके दिले की आपण चिडीचूप पण आता कालानुरूप यात बदल झालाय.

आज दुपारी माझ्या मित्राची मुलगी (रितिका) पर्णवी कडे खेळायला आली होती. दोघीत साधारण एक वर्षांचा फरक आहे.पर्णवी एक वर्षाने लहान आहे. दोघींच्या असल्या धमाल गप्पा सुरू होत्या, अगदी मोठी माणसं बोलणार नाहीत अशा टोन मध्ये यांची चर्चा चालू होती.

जेवणाची वेळ झाली म्हणून मग दोघींना घेऊन जेवायला बसलो.दोघींच्या प्लेट मध्ये जेवण वाढलं अन मग आमचं जेवण सुरू झालं.मी फक्त लिसनिंग मोड वर होतो. पर्णवी दोन्ही हातांनी जेवण करत होती. तोच रितिका तिला म्हणे...

"अग...अस दोन्ही हातांनी जेवू नये...फक्त राईट हँड नेच जेवायचं हसत."

"अस काही नसत....आपण जेवायचं फक्त " इति पर्णवी

"नाही....माझ्या पपा नी सांगितलं आहे की राईट हँड ने जेवायचं..." रितिका

"अग...कस पण जेव...दोन्ही हाताने जेवण केलं तरी चालतं..." पर्णवी

मी शांतपणे दोघींच्या बोलण्या कडे लक्ष देऊन ऐकत होतो. दोघींपैकी कोणी एक माघार घेईना.त्यामुळे बॉल आता माझ्या कोर्टात येणार हे लगेच लक्षात आलं. तोच रितिका म्हणे...
"काका..पर्णवी ला सांगा कोणत्या हँड ने जेवायचं असत....right ने की नाही...ते good असत ना'.

"हो राईट हँड ने च जेवायचं असत...बरोबर आहे."- मी

"अस कस रे बाबू...तुच सांगतो ना सर्व समान असत...मग दोन्ही हातांनी समान जेवायचं....एकाच हाताने जेवलो तर दुसऱ्या हाताला वाईट वाटेन ना...बरोबर की नाही..अस कधी सर्व एकानेच नाही करायचं"

"हो बच्चा...बरोबर आहे...अस तेवढ्या पुरतं म्हणालो पण उजवा किंवा डावा अस न करता एका हातानेच का जेवायचं हे मला मात्र जरा काही क्षणांत पटवाव लागलं."

लहानपणा पासून सार काही उजव्या हातानेच अन बहुतांश गोष्टी ह्या उजव्या हाताच्या लोकांना सोयीस्कर अशाच पाहत आलो.त्यामुळे उजवा -डावा ऐवजी समानता अन स्वतःला काय सोयीचे हा विचार कधी आलाच नाही. आज मात्र ती झापडं दूर झाली होती.नकळत का होईना एक मोठी गोष्ट शिकायला मिळाली.

नवरा!!

Edit Posted by with No comments
मागच्या आठवड्यात पर्णवी चे फोटो काढत होतो त्यादरम्यान चा माय लेकींचा संवाद.....

पर्णवी :आऊ, तुझं बाबु सोबत लग्न झालंय का?

सुजाता : हो...

पर्णवी: बाबू तुझा नवरा आहे का?😂😂

सुजाता: हो...

पर्णवी : तुला तुझा नवरा आवडतो का?

सुजाता: हो....आवडतो की...

पर्णवी: मला पण तुझा नवरा आवडतो....छान आहे तो...😂😂🤣🤣🤣🙈🙈🙈🙈

मोदी आजोबा!!

Edit Posted by with No comments
वैधानिक इशारा :
1. सदर पोस्ट संपूर्णतः अराजकीय आहे.
2. ह्या पोस्ट साठी कोणत्याही पक्षाच्या आय टी सेल कडून मला पैसे मिळाले नाही आहेत.😉
3. मी स्वतः कोणत्याही पक्षाच्या ideology ला फॉलो करत नाही किंवा कोणत्याही पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता नाही
4. सदर पोस्ट ही केवळ मनोरंजना साठी आहे
5.मी माझ्या लेकीवर कोणत्याही प्रकारचे राजकीय संस्कार करत नाही.
6. "खरा तो एकची धर्म..." या प्रार्थनेवर नितांत विश्वास आहे त्यामुळे आम्ही कोणाचाही द्वेष करत नाही
7. ज्यांना मोदी हे नाव घेताच पित्त खवळणे,डोकेदुखी,पोटशूळ,चक्कर येणे,अस्वस्थ वाटणे इ इ प्रकारचा त्रास होतो त्यांनी वाचण्याचे कष्ट घेऊ नये.
––––––––––––––––––––––––––––––––
काही आठवड्यापूर्वी पर्णवी ची फिल्ड ट्रिप होती त्यामुळे मला शाळेत तिला सोडवायची जबाबदारी अस्मादिकांवर होती.सकाळी पटपट आवरून आम्ही निघालो.गाडी सुरू केल्यापासूनच नेहमी प्रमाणे पर्णवी ची टकळी सुरू झाली होती. ट्रिपल सीट कोण चाललंय....त्यांना पोलीस काका पकडणार का...त्यांच चुकलं की नाही...कोण कोण सिग्नल तोडत आहे...हे अस बरचसं सुरू होत.

आम्ही पद्मावती च्या सिग्नल ला उभे होतो तोच बाजूला एक पीएमटी येऊन उभी राहिली अन त्यावर मोदींचा फोटो होतो.त्या फोटो कडे पाहून मग पर्णवी म्हणे...

"बाबु...तुला माहितये का....मोदी आजोबा...मला गुड गर्ल म्हणतात..."

[हे मोदी आजोबा जे नामकरण आहे ते माझ्या मुळेच झालं आहे...पर्णवी ला मध्यंतरी मुख्यमंत्री,पंतप्रधान,राष्ट्रपती हे सांगत होतो तेव्हा देवेंद्र अन नरेंद्र यात गोंधळ व्हायला लागला...म्हणून मग नरेंद्र मोदी यांच मोदी आजोबा नाव झालं]

मी: "हो काय....का बर....तुला का ते गुड गर्ल म्हणतात..."

"हो...अरे मी रस्त्यावर सु करत नाही....कुठे च कचरा करत नाही अन रस्त्यावर थुंकी पण काढत नाही....मी हट्ट करत नाही....आऊ सोबत दुकानात गेले की हट्ट करत नाही..म्हणून मी गुड गर्ल आहे..."

[मग काय बाबाची कॉलर एकदम टाइट....😀😀😀]

मी :"हो काय....पण मोदी आजोबा तुला केव्हा भेटले...अन केव्हा सांगितलं"

"भेटले नाही रे....मला फोन आला होता त्यांचा....अन ते म्हणाले पर्णवी तू गुड गर्ल आहेस..."
[आम्ही फोन फोन खेळतो त्याचा हा परिपाक 🤦🤦🤣🤣🤣]

अन हे अगदी खर आहे ....पर्णवी बाहेर गेली कुठेच कचरा टाकत नाही ...अगदी घरात असताना सुद्धा कचरा हा सुपली किंवा कचऱ्याच्या डब्यातच जातो.

काही दिवसांपूर्वी आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हा पर्णवी ला सु लागली होती.पण आम्हाला चांगलं वॉशरूम मिळेना म्हणून मग तिला म्हणलं हे इकडे रस्त्याच्या कडेला झाडा जवळ सु कर.पण अगदी भला मोठा नकार होता.डायपर बंद करून बरेच दिवस झाले होते त्यामुळे तो असण्याचा प्रश्नच नव्हता.अखेरीस जेव्हा व्यवस्थित वॉश रुम सापडलं तेव्हाच पर्णवी ने सु केली.😃😃

फक्त याचा एकच त्रास होतो..तो म्हणजे रस्त्यावर किंवा गाडीतून कोणी थुंकल वा कचरा टाकला की मला खूप साऱ्या प्रश्नांना सामोरं जावं लागत....काही दिवसांपूर्वी बिबवेवाडी रोड ला आमच्या पुढे असणाऱ्या कार मधून गुंठामंत्र्याने हे मोठी पिचकारी रस्त्यावर मारली होती तर पर्णवी म्हणे बाबा ते बघ ते काका कसे थुंकले....चल बर तू सांग त्यांना...🤦🤦🤦...तेवढ्यात सिग्नल सुटला म्हणून बर झालं...नाही तर माझं काही खर नव्हतं 🤣🤣🤣😂😂😂

वीकेंड...

Edit Posted by with No comments
या वीकेंड ची सुरुवात एकदम धमाल झाली आहे.आज पर्णवी अन घर अस दोघांची जबाबदारी माझ्यावर होती.सकाळी उठल्यावर अंथरुणावरच जवळ जवळ दीडेक तास माझी अन पर्णवी ची मस्ती सुरू होती....अरे उठा...आंघोळी ला जा...उशीर होतोय...अशी एक पण सूचना नव्हती.सगळा कसा रॉयल कारभार होता.😉

आंघोळी बाबत तर बोलायलाच नको...निवांत पाणी खेळत खेळत आज आंघोळ पार पाडली .."अरे बाबा...पाणी वाया घालवायच नाही बर का...कमी वाया घालवायच...वगैरे एक दोन दिवसांपूर्वी मी सांगितलेलं हे अस साभार परत आलं होत.आंघोळ झाल्यावर केस अन कपडे घालण्याची कसरत सुरू झाली...हा कलर नको...भांग मीच पाडणार...क्लिप मीच लावणार....आता मी ज्यु.के.जी.ला जाणार ना मग मी मोठी झालेय...आता मीच करणार सर्व...वगैरे ...वगैरे.. अस मोठं मोठं बोलून बाबा ला नेहमी सारख गुंडाळून ठेवलं होत.

नाश्त्याला काय हवं तर....डोसा....विषय संपला...डोसा प्रेम एवढं आहे की डोसा असला की बाकी काही नको....म्हणलं डोसा खायला जायच असेल तर मग चल जाऊ या आपण...तू तुझं पेंटिंग वगैरे जागेवर ठेऊन दे...तर लगेच पलीकडून उत्तर आलं...."बाबू...घरीच मागव की रे...मी दमले आहे..."🤣🤣🤣
आज त्यांना सुट्टी आहे त्यामुळे आपल्यालाच जावं लागणार आहे...अस काही बाही सांगितल तेव्हा कुठे पर्णवी बाहेर यायला तयार झाली..."

मग मस्तपैकी डोसा,उपिट असा भरपेट नाश्ता झाला...अन मी कॉफी येण्याची वाट पाहत होतो...तोच पर्णवी म्हणे..."बाबू...आज कॉफी नाही घेतली रे...."
मी म्हणलं...सांगितल आहे ...येईल आता...मी त्याचीच वाट बघतो आहे.."
यावर फक्त..."तरीच...." असा एक धडाकेबाज षटकार एकदम स्टाईल मध्ये बसला.स्टाईल बद्दल तर काय बोलायचच नाही.

नाश्ता पाणी आवरून घरी आल्यावर पुन्हा एकदा गाडी फॉर्म मध्ये आली होती....हॉल ,बेडरूम इकडं सगळीकडे दणदणीत पसारा झाला होता.सुजाता आल्यावर आता ओरडा खावा लागणार हे नक्की होत.असा विचार करत होतो तोच सुजाता पोहचली...अन एकंदरीत घराचा अवतार बघून जी एक वैश्विक प्रतिक्रिया असते तीच प्रतिक्रिया बाहेर आली.🤣🤣😂😂

अन पुढच्या क्षणी गृह खात्याकडून आदेश आला...."पर्णवी ....तू घातलेला सगळा पसारा आवरायचा आहे....सगळ्या वस्तू मला जागेवर हव्या आहेत..."

याच्यावर आलेला रिप्लाय....

"तुम्हा दोघांना एवढी चांगली मुलगी आली आहे तरी तुम्ही रागवता...अस करणार का " 😂😂🤣🤣😂😂🤣

रिपोर्ट डे

Edit Posted by with No comments
पर्णवी चा आज रिपोर्ट डे होता.काल शाळेत आईस क्रीम पार्टी ने शेवटचा दिवस मस्त साजरा झाला होता.त्यामुळे स्वारी एकदम खुष होती.

दोन्ही टीचर ला आपण रिपोर्ट डे ला ब्लेसिंग कार्ड देऊ या अस आमचं ठरलं होत. त्यामुळे आज संध्याकाळी तू ऑफिस मधून लवकर यायचं असा आदेश कम धमकी दुपारीच मिळाली होती.ठरल्याप्रमाणे काल ऑफिस मधून लवकरच घरी पोहचलो.

सुजाता ने कार्ड शीट आणून ठेवले होते. अगोदर तू कट करून ठेऊ नंतर सगळे मिळून कार्ड बनवू असा चर्चेअंती निर्णय झाला.सुजाता किचन मधील काम आवरून येई पर्यंत मी सर्व शीट कट करून.पर्णवी कडून काय करून घ्यावं याचा विचार करत होतो.

त्या दरम्यान पर्णवी च excitement मुळे सारख टूमक चालू होत...बाबू काय काय करायचं सांग ना...तू तर काही सांगतच नाही...वगैरे वगैरे ...तिला बिजी ठेवायचं म्हणून मग एका रफ कागदावर पेंट करायला लावलं होत.

थोड्याच वेळात सुजाता सर्व आवरा आवर करून आली. अन त्यानंतर मग आम्ही दोघे बोलत होतो...पर्णवी ला करायला काय सोपं जाईल अन मुळात तिला काय करायला आवडेल त्यानुसार काही तरी करावं लागणार होत.नेहमी प्रमाणे बरीच चर्चा होऊन पण आमचं काही एकमत झालं नाही. शेवटी मग सुजाता म्हणाली भेंडी कट करून आणते आपण त्याचे छाप करू या....असच काही तरी जे पटकन होईल ते बघू....अस म्हणून ती परत किचन मध्ये गेली...

तोच आत्ता पर्यंत गुपचूप बसलेल्या पर्णवी मातेने एक तीक्ष्ण असा कटाक्ष टाकला....आता हिला काय झालं...म्हणून मी आपलं डोळ्यानी च खुणावत विचारलं ...काय झालं??

तर म्हणे..." बाबू....का केलंस अस??"

मी:.."कुठे काय....काय झालं...मी काय केलं?"

पर्णवी: "मग आऊ का गेली....तू आऊ च का ऐकलंस नाही.."

[लेकराला...काय माहीत...गृहमंत्र्याचं ऐकायचं नाही...एवढी हिम्मत कोणात तरी आहे का 😂😂]

मी : "नाय रे बच्चा....अस काही नाही..."

तर यावर अगदी उत्स्फूर्त अशी पर्णवीच उत्तर..."नाही ऐकलस...माहीत आहे मला...तू तुझ्या मनाचंच ऐकतोस...ऐकूच नकोस तू.." 🤣🤣🤣🤣

शेवटी मग सर्व मला नीट समजावं लागलं तेव्हा कुठे मग पर्णवी माता शांत झाल्या अन ग्रिटींग सुद्धा तयार झालं. खाली फोटोत आहेत ते दोन्ही ग्रिटींग पर्णवी ने फिंगर प्रिंट ने तयार केलेत. अर्थात outline अन कलर मिक्स आम्ही करून दिली होते.