10 March 2022

आता काय...😃

Edit Posted by with No comments
वेळ : रात्री 11.30 ची

स्थळ : बेडरूम

पात्र : आई , बाबा अन पर्णवी

दुपारी मस्त पैकी झोप झाल्यामुळे रात्री 11 नंतर मग पर्णवी च्या  दिवसाची सुरुवात झाली होती.माझं ऑफीसच काम पण जवळपास संपत आलं होत त्यामुळे माझी आपली आवराआवर चालली होती. अन सोबतीला पर्णवी चा दंगा सुरू होता.मी माझं आपलं आवरत होतो पण नियमानुसार बेड च्या एकूण एक कोपऱ्यात पर्णवी ची खेळणी, वह्या ,पुस्तके असा मजबूत पसारा पडला होता.शाळेची बॅग सुद्धा सुजाताला भरायला लावून पर्णवी माता मस्तपैकी चिल करत होत्या.असा एकंदरीत माहोल होता.
पण इतका पसारा बघून मग मात्र सुजाता ने जरासा सौम्य असा रुद्रावतार घेतला अन पर्णवी ला जरासं ओरडली.अन त्यानंतर जरा व्यवस्थित ठेवण्या वरून थोडं फार सुनावलं तर यावर आलेली प्रतिक्रिया :

पर्णवी : आई, तुला पण आत्ताच बोलायचं होत का?

सुजाता: अग पण काय झालं

पर्णवी : तू आता झोपताना पसाऱ्यावरून का बोलली,आता हे सगळं माझ्या डोक्यात राहणार अन मी विचार करत झोपणार नाही ते सुद्धा सकाळी 6 पर्यंत...

मी: म्हणजे आता मला पण पर्णवी सोबत जागायला लागणार तर...

सुजाता: हो काय....बर ठीक आहे मग आता तुम्ही दोघे जागणार आहातच तर तेवढा संस्कृत चा अभ्यास तेवढा पूर्ण करून घ्या 😂🤣

अभ्यासाचं नाव येताच एकदम वातावरणात बदल अन म्हणे...
"काही नको ...ऑलरेडी एक डोक्यात आहे तर आता अजून एक डोक्यावर देऊ नकोस...जाऊ दे मी झोपतेच आता..."

हे असं इतकं आता नौटंकी सुरू असत...😂😂😂🤣🤣🤣


23 January 2022

बोबड बोल 😀

Edit Posted by with No comments
पर्णवी खूप जास्त बोबड काही बोलली नाही पण काही शब्दांचे उच्चार मात्र किंवा त्यांना वेगळं काही तर आपलं स्वतःच लॉजिक लावत काही तरी वेगळाच उच्चार करायचा.अशेच काही बोबडे बोल 😃

प्रसंग 1:
पर्णवी चल बर पटकन 1 ते 100 मराठी मधून म्हण बर.1ते 80 पर्यंत गाडी एकदम सुसाट सगळे उच्चार अन क्रम एकदम व्यवस्थित आता सुरूवात झाली..
एक्केऐंशी
ब्याऐंशी
.
.
.
.
सत्याऐंशी
अठ्ठ्याऐंशी
यानंतर मात्र गाडी अडकली. 88 नंतर काय हे काही आठवेना...अखेरीस मग चला माघार कशी घेणार म्हणून मग म्हणे..

नव्व्याऐंशी

अशा प्रकारे एकोंनव्वद ला आम्ही समानार्थी शब्द शोधला आहे 😂😂😂

प्रसंग 2:
पर्णवी अन सुजाता यांच शाळेचं काही तरी activity की काय सुरू होत तेव्हा पंचिंग मशीन हवं होतं. तर पर्णवी म्हणे अरे मला ते चिंगपिंग मशीन द्या रे.😂🤣🤣

प्रसंग 3:
पर्णवीच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या तेव्हाची ही गोष्ट आहे.मी, पर्णवी अन भाचा अद्वय अस आम्हा तिघांची मस्ती सुरू होती. जरा वेळ मस्ती करून मग मी त्यांना म्हणालो चला आता बस झालं...मस्ती खूप झाली आता पटकन आपआपला अभ्यास संपवून घ्या बर.
यावर पर्णवी म्हणे..."बाबा...उद्या तर माझी ओलर आहे...अन माझा तर ओलरचा सगळा अभ्यास झालाय..."
ते ओलर म्हणजे ओरल बर...🤣🤣😂🤣

प्रसंग 4:
TV वरील जाहिरात हा पर्णवी चा अत्यंत आवडता प्रकार आहे.बऱ्याच जाहिरात किंवा त्यांच्या जिंगल्स तिला पाठ पण आहे.जाहीरात मध्ये एखादा शब्द न समजणारा असला की मग तिथे एकतर काही तरी ल ल ला किंवा मग तिच्या समजुतीने हवा तो शब्द टाकणार.पितांबरी ची गूळ पावडर ची जी जाहिरात आहे ती एक सर्वात जास्त आवडीची.त्यात एक ओळ अशी आहे वेळ आली पश्चात्तापाची....तर पश्चात्ताप काही बोलता येत नव्हता त्याऐवजी आमचा शब्द होता पक्षाताप..... वेळ आली पक्षातापाची 😂😂

असेच अजून काही शब्द...
हॉस्पिटल - हॉस्टीपल
रिक्षा - रिशका
लॅपटॉप - लॅटपॉट
इंजेक्शन - इंजेक्षण
आईस्क्रीम - आईशिम




05 January 2022

स्वामी आजोबा !!

Edit Posted by with 2 comments
पर्णवीला अजाणतेपणा पासून स्वामींचे आकर्षण आहे.लहानपणी झोपताना स्वामींचा जप असो किंवा तारकमंत्र लावला की अगदी तल्लीन होऊन ऐकायची. मग जसजशी मोठी होत गेली तशी स्वामी आजोबा तिचे फ्रेंड झाले.त्यांच्या सोबत गप्पा मारते ,आमचं काही चुकलं की स्वामींना तक्रार करते.तिच्या कडून चुकीचे वागलं गेलं किंवा बोललं गेलं की लगेच स्वामींच्या समोर जाऊन चूक कबूल करते.

स्वामींची मालिका सुरू झाल्यापासून तर मग खूप सारे प्रश्न पडतात,काही प्रश्न तर असे असतात की त्याची उत्तर आम्हाला माहीत नसतात मग अशा वेळी आमचे गुरुमाऊली अन तिचे विजय काका म्हणजे हक्काचं माणूस,त्यांना फोन करून प्रश्न विचारायचं. 

सातारा जवळ बोरणे ला आमचा स्वामींचा मठ आहे.शक्य होईल तेव्हा आम्ही तिथे मठात सेवेसाठी किंवा पायी अक्कलकोट वारीला जात असतो.एकदा तर जाताना संपूर्ण प्रवासात स्वामींच्या मालिकेचं गाणं आमच्या कडून म्हणून घेतलं होतं..त्यात पण स्वामी आजोबांचं गाणं आहे नीट म्हणायच,थोडा उच्चार चुकला तरी परत म्हणायला लावलं 🤣😂

तर एकंदरीत अस हे सारं स्वामी प्रेम आहे.काल सुजाता अन ती अशा दोघींच्या गप्पा सुरु होत्या तर अचानक म्हणे..

"आई ,तुला सांगू का आपण कोणीच स्वामींना "स्वामी" किंवा "श्री स्वामी समर्थ " अस काही म्हणायला नको..."

"हो का....का ग...अस का बरं...."

"अग आई...ते आपल्या सर्वांपेक्षा किती मोठे आहेत...अन आपण किती लहान आहोत..."

"अस होय...."

"त्यांचे  गुरू च त्यांना फक्त स्वामी म्हणणार कारण ते त्यांच्या पेक्षा मोठे असणार ना..."

"बर मग आपण काय म्हणायचं ?"

"आपण ना  स्वामी आजोबा असंच म्हणायचं...."🥰

09 November 2021

आज्जी....

Edit Posted by with No comments

 आजी अन आजोबा यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही  पर्णवी वर  दिली आहे . लक्ष म्हणजे काय दिवसभरात आराम केला किंवा नाही  की फक्त काम करत राहिलेत , वेळेवर जेवण अन औषध घेतलं का  अन इतर बाकी काय उद्योग केले का हे सार काही पर्णवी च काम आहे. अन मग संध्याकाळी ऑफिसवरून आलो  की मग दिवसभराचा सगळा डिटेल रिपोर्ट मग मला दिला जातो. 

आजोबांच्या बाबतीत जास्त काही तक्रार नसते त्यांचं सार काही वेळेवर अन तब्येतीला जपून असतं याउलट आजीची मात्र मोठी तक्रार असते. बाबी, आजी आज झोपली नाही , मास्क न लावताच खाली जाणार होती, हात धुवायला विसरली, औषध पण नाही घेतलं वगैरे वगैरे.... अन तुला माहीत आहे का ती माझं ऐकतच नाही आता तूच काही तरी कर बरं . 

मग मीच पर्णवी ला विचारतो , चिकू मला तर काही सुचत नाही तूच काही तरी आयडिया सांग बरं .... असं म्हणाल की मग अशा काही एकाहून एक भन्नाट आयडिया डोक्यातून येतात  की बस्स.... जस की .. 

- बाबी आपण किचन ला ग्रील बसवू अन लॉक लावू या का?

- बाबी आपण  असा अलार्म लावू या का रे  की आजी आली की मग तो वाजायला हवा 

- बाबी, नाही तर असं करू आपण आजी ला किनई छुम छुम वालं  पैंजण आणू या का? म्हणजे मग काय होईल आजी कुठेही जाणार असेल  की  त्याचा आवाज झाला  की लगेच आपल्याला समजेल  

असं बरच काही काही चालू असत... असो तर असं एकंदरीत आजी अन नात प्रकरण आहे . दोनेक आठवड्यापूर्वी मी अन चिकू गप्पा मारत बसलो होतो. अन नेहमी प्रमाणे गाडी आजीवर येऊन थांबली. मग पुन्हा एकदा आजीने आराम करायला हवा यासाठी काय करावं बरं .... ती सारखं काही ना काही काम करत राहते  मग आपण काय बरं करू शकतो... आता विषय आपला नेहमीचाच होता म्हणालं आता जरा चिकूची फिरकी घेऊ या बरं . 

म्हणून तिला म्हणाल ..." चिकू.... आता मला काही सांगू नको बघ ...मी थकलो आहे ... आजी साठी माझ्याकडे तरी काही उपयोग नाही आता तुलाच काही तरी करावं लागणार माझं तर डोकं बंद झालं आहे..."

असं म्हणाल्यावर लगेच एकदम गंभीर चेहरा करून म्हणे ..... " बाबी ... तूझ्या सारखंच माझं पण झालं आहे माझ्याकडे पण काही उपाय नाही रे... "

"अन तुला सांगू का .... ही आजी म्हणजे ना ..."खालून पापड अन वरतून काठी असा प्रकार आहे बघ ...."".. 😅😅

हे ऐकल्या बरोबर मी अशक्य हसलोय. आता हे कुठे ऐकलं अन कुठून आल हे देवाक ठाऊक. सहा वर्षांचा असताना आम्हाला  शेंबूड पुसता येत नव्हता अन आता हे बघा किती मोठ्या मोठ्या गप्पा 😂😂

02 October 2021

डॉक्टर!!

Edit Posted by with No comments
पर्णवी ची डेंटिस्ट ची अपॉइंटमेंट होती म्हणून आम्ही निघालो होतो.डेंटिस्ट अन तिचे आयुर्वेदिक डॉक्टर एकाच ठिकाणी आहेत.अन आयुर्वेदिक डॉक्टरांसोबत तिचं मोठं असं गप्पाष्टक असतं. मागील वेळी गेलो होतो तेव्हा पर्णवी एकटीच होती यावेळी मात्र अद्वय पण सोबत होता.तस अद्वय पेक्षा पर्णवी फक्त सहा महिन्यांनीच मोठी आहे पण संधी मिळताच ताईगिरीची एक पण संधी सोडत नाही.

यावेळी पण असंच झालं.मागील वेळेस पर्णवी एकदा जाउन आली होती मात्र अद्वय पहिल्यांदाच डेंटिस्ट कडे चालला होता त्यामुळे डॉक्टर कशा आहेत, त्या काय काय बोलल्या,तिथं जाऊन काय बोलायचं ,काय करायचं काय नाही करायचं या सूचनांची अगदी जंत्रीच होती.

हे चालू होतं तेच अचानक पर्णवी म्हणे...

"हे बघ आदू... आता तुला जरा महत्त्वाचे सांगते आहे...नीट ऐकून घे..."

"आपण दवाखान्यात गेलो की बाहेर बसावं लागेल अन मग काही वेळाने डॉक्टर काका मलाच बोलावतील..... त्यांना माझ्या सोबत बोलायचं असतं.... अन तेव्हा फक्त माझ्याशीच बोलतील....अन आमचं बोलणं सुरू असताना मध्येच येऊ नकोस अन आलास तर बोलू पण नको..."

"काय समजलं ना....लक्षात राहील ना...."

"डॉक्टर काकांना महत्त्वाचे बोलायचं असतं...त्यामुळे आम्हाला डिस्टर्ब करायचं नाही.... आमचं बोलणं झालं की मग तू बोल..."

😂😂😂🤣🤣😂🤣🤣🤣

01 October 2021

पोस्टमन !!

Edit Posted by with No comments

करोना मुळे यावर्षी सुद्धा आई ला रक्षाबंधन साठी मामा कडे  गावी जाणं शक्य होणार नव्हतं त्यामुळे आपण राख्या पोस्टाने पाठवून देऊ असं ठरलं. सध्याच्या डिजिटल गोष्टींमुळे पोस्ट,पत्र ,तार इ.इ. जी जुनी संपर्क संसाधने आहेत ही या नव्या पिढीला काही माहित नाहीत. पर्णवी ला पोस्ट ऑफिस , पत्र , पोस्टमन याबद्दल सांगितलं होत. 


चार दिवस अगोदर  राखी पाठवून पण मामा ला रक्षाबंधन ला राखी काही मिळाली नाही. आई मग त्यावरून दोन तीन वेळा म्हणाली , राखी कशी काय मिळाली नसेल, काय झालं असावं बरं ? पत्ता वगैरे तर बरोबर टाकला होता ना कि हरवल्या असाव्यात असं बरच काही बोलणं सुरु होत. आमचं हे बोलणं सुरु असताना पर्णवी जवळच खेळत बसली होती. खेळता खेळता अचानक म्हणे,


" अगं आजी ... रक्षाबंधन होत ना मग पोस्ट ऑफिसला पण सुट्टी असेल ना ?"


" ते पोस्टमन काकांना पण राखी बांधायला त्यांच्या ताई कडे जायचं असेल ना ?"


" अन आता तुला कस वाईट वाटत आहे तसच जर पोस्टमन काका गेले नाही तर त्यांच्या  बहिणीला पण वाईट वाटेल ना ?"


" आता ते राखी बांधून आले ना कि मग मामा आजोबांना राख्या मिळतील"

इतक लहान लहान गोष्टीं मध्ये सुद्धा  असा विचार करणाऱ्या पर्णवी ला बघून मला मस्त वाटलं  😊

10 August 2021

असं का बरं ?

Edit Posted by with No comments

जेव्हा आपल्या मनाची पाटी कोरी असते तेव्हा आपला एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा असतो. लहान मुलांचं अगदी असंच असतं .त्यांच्या मनाची पाटी कोरी असते त्यामुळे जे त्यांना दिसतं ते आपल्या मोठयांना दिसत नाही. मग कधी तरी त्यांच्या कडून त्याबद्दल बोललं गेलं की ती गोष्ट आपल्याला आश्चर्यचकित करते तर कधी अंतर्मुख करते. असंच काहीसं मागच्या आठवड्यात झालं. 

माझ्या मित्राच्या मुलाचा वाढदिवस होता तेव्हा मी, सुजाता , भाचा अद्वय अन पर्णवी असं चौघे जण गेलो होतो. चिल्लर गॅंग बरेच दिवस घराबाहेर कुठे गेले नव्हते त्यामुळे बाहेर जायचं म्हणून दोघे पण खूप खुश होते. करोना मुळे तर वाढदिवस, हॉटेल किंवा बाहेर कुठे बागेत जाणे वगैरे अशे सारे प्रकार अगदी बंदच झाले आहेत त्यामुळे करोना काळात कंटाळलेल सर्वात जास्त कोण असेल तर ते  चिल्लर कंपनी . बऱ्याच दिवसांनी बाहेर पडल्यामुळे मग बाहेरची गंमत बघण्यात अन मस्ती करण्यात दोघे जण व्यग्र होते. अन सोबत प्रश्न याची जंत्री सुरूच होती. 

मित्राकडे पोहचलो तेव्हा लहानग्याचे खेळ सुरु होते. सगळी धम्माल सुरु होती. अद्वय ची लगेच मस्ती सुरु झाली पण पर्णवी ला मात्र जरा वेळ लागला. तिचं आपलं निरीक्षण सुरु होतं . जरा वेळाने मात्र खेळणं सुरु झालं. असाच थोडा वेळ गेला असेल पर्णवी सुजाता कडे आली अन म्हणे... 

" आई , मला एक सांग इथे सगळी लहान मुलं , ताई  अन दादा आहेत सर्व जण  खेळत आहेत मात्र ती तिकडे एक ताई आहे पण ती  मात्र  खेळत नाहीये . ती तर तिच्या आई सोबतच थांबली आहे. ती तर इकडे आली पण खेळली नाही.  असं का बरं ?"

ती मुलगी म्हणजे मित्राच्या घरात ज्या मावशी येतात त्यांची मुलगी होती, तशी ती त्यांच्या घरातील माणूस असल्यासारखीच आहे पण इतकी सगळी मुलं अन लोक  पाहून ती बावरली होती अन तिच्या आई जवळ जाऊन थांबली होती. इतक्या सगळ्या गोंधळात हे मात्र कोणाच्याही लक्षात आलं नव्हतं  तेच नेमकं मात्र पर्णवी च्या लक्षात आलं. 😊😊