27 July 2024

गप्पाष्टक 06

Edit Posted by with No comments

नेहमी प्रमाणे यावेळी आषाढी च्या आधी पंढरपूर ला गेलो होतो.पर्णवी ला न्यावं असं काही ठरलं नव्हतं पण ऐनवेळी ती स्वतःहुन यायला तयार झाली. विठुरायाची इच्छा अस म्हणून तिला पण सोबत घेऊन निघालो.प्रवासात अभंग अन गप्पा असं सुरू होतं. मग जरा टाइमपास म्हणून कोडी सुरू झाली. मग बोलता बोलता अचानक एक असं कोडं समोरून आलं की काही तिथे काही डोकं चालेना. कोडं अस होत..


पर्णवी : बाबा, तुला आता असं कोडं घालते की तुला त्याचं उत्तर शोधता येणारच नाही


मी : बरं... अगोदर कोडं तर सांग मग बघू या.


पर्णवी: भविष्यात सारं काही शक्य होऊ शकतं पण एक अशी गोष्ट आहे की जी कधी चं शक्य होऊ शकत नाही.

आता हे ऐकून मी पण जरा गोंधळून गेलो.ही नक्की काय संदर्भाने बोलते आहे याचा काही अंदाज लागत नव्हता. कारण आमचं डोकं इतकं तुफानी आहे कर्क कोणताही संदर्भ कुठे ही अन कसाही लागू शकतो.

मी :  म्हणजे तुला नक्की कशा बद्दल बोलायचं आहे.

पर्णवी : वारी बद्दल रे बाबा

मी: अच्छा...अस म्हणते आहे होय.

मी जरा वेळ विचार केल्याचं नाटक केलं अन मग हारलो असं सांगून दिलं. आता हिचा डोक्यातून काय येतंय याची मला उत्सुकता होती.

पर्णवी : अरे...वारी मध्ये सारं काही होऊ शकतं पण भाव नसेल तर काहीच होणार नाही.

मी : म्हणजे..

पर्णवी: हे बघ भविष्यात किनई असं होऊ शकतं की वारीला रोबोट पण येतील.भले वारी मध्ये येणारे रोबोट बनवतील पण ते एक गोष्ट नाही करू शकत ती म्हणजे भाव.

मी : असं होय

पर्णवी: वारी ला यायचं म्हणजे भाव हवाच. अन भाव असेल तर वारी होईल.कारण विठ्ठल बाप्पा फक्त भाव बघतो. त्यामुळे आपण वारीला जाणारे  रोबोट बनवले तरी आपण तो वारी मध्ये हवा असणारा भाव बनवू शकत नाही....बरोबर आहे की नाही.

अगदी बरोबर अस म्हणून नेहमी प्रमाणे मी बापुड्या ने हार मान्य केली.अन जे बोलली त्याचा विचार करू लागलो. ते अगदी योग्यच आहे. AI च्या दुनियेत बरंच काही शक्य होईल पण श्रद्धा अन विश्वास यातून निर्माण होणारा भाव याची निर्मिती कशी काय शक्य होईल?

08 December 2023

गीता पुराण

Edit Posted by with No comments

संध्याकाळी शाळेतून परत आल्यावर पर्णवी ला यु ट्यूब वर कसलासा व्हिडिओ बघायाचा होता म्हणून मग सुजाता कडून अर्धा तासचं बघणार अशी कबुली देऊन लॅपटॉप सुरू झाला. पण नेहमी प्रमाणे पर्णवीच्या घड्याळात अर्धा तास काही होईना त्यामुळे मग सुजाता तिला समजुतीच्या स्वरात सांगू लागली की, पर्णवी तू अर्धा तास कबूल केलं होतं ना मग आता बस्स झालं.गीतेत काय सांगितलं आहे की कोणत्याही एखादया गोष्टीत वाहवत जायचं नाही.जे काही आहे ते थोडक्यात.


यावर मग कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता शांततेत ऐकून घेऊन पर्णवी ने लॅपटॉप बंद केला.पण हा विषय काही इतक्या वर काही मिटला नव्हता 🤣🤣🤣


सुजाता ची सध्या परीक्षा सुरू आहे त्यामुळे तिचं सतत अभ्यास सुरू असतो.अन अभ्यास सुरू असला की DND मोड चालू होतो त्यामुळे पर्णवी ला दंगा मस्ती जरा शिस्तबद्ध करावी लागते 🤣🤣


दुसऱ्या दिवशी सकाळी पर्णवी ची शाळेला निघण्याची तयारी सुरू होती. सुजाता तिला बूट घालत होती तर पर्णवी म्हणे,


"आई, तू तर फक्त दुसऱ्याला गीता छान सांगू शकते पण त्यातील काही फॉलो करत नाही"


"का ग ,काय झालं मी काय केलं"-इति सुजाता


"अग काल तुच मला सांगितलं ना एखाद्या गोष्टीत वाहवत जायचं नाही पण तूच अभ्यासात वाहवत चालली आहेस.अग किती अभ्यास करते आहेस किती वाहवत चालली आहेस त्या अभ्यासात, इतकं पण वाहवत जाऊ नकोस" 🤣🤣🤣


08 April 2023

परीक्षेचा ताप !!

Edit Posted by with 1 comment
पुढच्या वर्षी पर्णवी तिसरी मध्ये जाईल.सध्या दुसरीची तोंडी परीक्षा झाल्यात अन लेखी परीक्षा सुरू आहे.सराव साठी शाळेतून सराव प्रश्न दिले आहेत त्यामुळे सुजाता अन पर्णवी अस दोघांचं धुमशान सुरु आहे.

त्यातच आता शाळेतून तिसऱ्या इयत्तेसाठी अर्ज भरून घेणं वगैरे सुरू झालं आहे.दोन दिवसांपूर्वी पर्णवी आत्याकडे अभ्यासासाठी गेली होती. तेव्हा सहजच ताई तिला म्हणाली
"पर्णवी...आता तिसरी पासून प्रश्नपत्रिका अन उत्तरपत्रिका अस वेगवेगळ्या मिळणार.आता सारखं एकंच नसणार बरं..."

ताई च बोलणं पूर्ण होतंय तोवर लगेचचं पर्णवी म्हणे...
"अरे कशाला असं करत आहेत...मग माझं काही खरं नाही बघ ,आत्तु...माझा पेपर होऊन मी घरी येते नाही तोच लगेच तुम्ही सगळे सुरू कराल ...हं... सांग बरं याचं उत्तर काय...हे काय लिहलं....हे चुकलं ...हे बरोबर... कशाला हवंय हे..."

"हो काय...मग आता..."इति ताई

"मला काय वाटतं माहित्ये का आत्तु...मी तर आता मग दुसरी मध्ये च राहते...तिसरीला जायलाच नको....किंवा मग काय करायला हवं माहित्ये का...उत्तरपत्रिका घ्यायलाच नको....वैतागच आहे नाही का "🤣🤣🤣🤣🤣

खर तर पालकत्व निभावून नेणं फार कठीण आहे. तसं पाहिलं तर ही फार लहान गोष्ट आहे पण मुलांच्या संगोपनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. परीक्षेवरून आल्यावर त्याबाबत विचारणं हे पिढ्यानपिढ्या चालतं आलेलं आहे नकळतपणे ते प्रत्येक पालक हेच करतो.पण जेव्हा आपण मुलांच्या मानसिकेतून पाहिलं तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे.पालक म्हणून विचार करायला हवाय.


07 April 2023

भाव तिथे देव !!

Edit Posted by with No comments
आंबाप्रेम पर्णवी ला उपजत च लाभलं आहे.आंब्याचा मौसम सुरू झाला की आम्हाला सर्वात आधी प्रतीक्षा असते ती म्हणजे देवगड हापूस ची.यावेळी आंबा आणायला तसा आम्हाला उशीरच झाला.आंबा आणला की सर्वात अगोदर तो स्वामींना अन मग आम्हाला असा नेहमीचा शिरस्ता आहे.

आज सकाळी आंबा खायचा म्हणून रात्रीच आंबा काढून ठेवला होता. सकाळी पर्णवी झोपेतून उठल्यावर पहिला प्रश्न होता बाबा आंबा कुठाय? मला आता लगेच खायचाय.

मी म्हणलं , "अरे पर्ना....किमान ब्रश तरी कर...आंघोळ हवी तर नंतर कर..."

ठीक आहे म्हणाली...तिचा ब्रश वगैरे होई पर्यंत मी आंबा कापून ठेवला.अन स्वामींना नेवैद्य दाखवायची तयारी करत होतो तोच पर्णवी आली अन म्हणे..

"बाबा, स्वामी आजोबांना मीच आंबा देणार आहे."

तिची आंघोळ वगैरे काहीही झालेलं नव्हतं त्यामुळे मी तिला म्हणालो, " अरे पिलू, तू आंघोळ नाही केलेली नाहीयेस असं बिना आंघोळीचं नको स्वामी आजोबांना आंबा नको देवुस.."

"बाबा...अरे भाव महत्वाचा...."इति पर्णवी

अस म्हणाल्यावर मग मी जरा बोलावं म्हणून समजलं नाही काही अस काहीसं चेहरा करत तिला प्रतिप्रश्न केला ..

"म्हणजे ग काय....काय म्हणते आहेस?..."

तर म्हणे..." अरे बाबा, स्वामी आजोबांना आंबा देताना माझा भाव महत्वाचा आहे. माझ्या मनात चांगलं नसेल अन मी आंघोळ केली असेल आणि मग स्वामी आजोबांना आंबा दिला तर ते घेणार नाही. पण जर आंघोळ केलेली नसेल अन माझा भाव चांगला असेल तर स्वामी आजोबा लगेचंच आंबा घेणार. स्वामी आजोबा भाव बघतात रे फक्त."

अस म्हणून आंब्याची डिश घेऊन स्वामींना प्रसाद दाखवायला सुरुवात केली.

मी मात्र क्षणभर फक्त स्तब्ध होऊन बघत तिच्या कडे बघत होतो. 

"काय रे बाबा, काय बघतो आहेस...असाचं दाखवायचा ना..." अस म्हणाल्यावर माझी तंद्री भंग पावली.

भाव तिथे देव या बोलांची आठवण येऊन गेली.अवघ्या आठव्या वर्षात आलेली ही समज म्हणजे स्वामींची कृपा आहे 🤗🙏 

10 December 2022

गप्पाष्टक 05

Edit Posted by with No comments
विकांताला गाडी सर्विसिंग ला जायचं होतं.शेपूट लगेचच म्हणाल मी पण येणार.आता नाही म्हणायचा काही प्रश्न नव्हताच.जाण्या येण्या दरम्यान भरपूर गप्पा झाल्या.गॅरेज वरून परत येताना मुद्दामच चालत आलो.चालत चालत आमच्या भरपूर गप्पा झाल्या.कोणत्याही विषयावर आम्ही किती वेळा गप्पा ठोकू शकतो.खूप साऱ्या गप्पा मधील हा लहानसा ट्रेलर 🤣🤣

"बाबा....तुला माहितये का....मला किनई दुसऱ्या जन्मात पंजाबी व्हायच आहे....तिसऱ्या जन्मात south indian व्हायच...चौथ्या जन्मात मी चिमणी होणार आहे....अन मग नंतर मी देवी होणार..." 🤣🤣🤣🤣

या आधी आम्ही ब्रिटीश अन मुगल किती चोर होते आपला भारत कसा लुटला अन किती त्रास दिला यावर बोलत त्यावरून अचानक गाडी इकडे सरकली.

मी हे ऐकल्यावर म्हणालो...."अरे वा म्हणजे तुला आत्ताच माहीत आहे तर तू काय होणार आहे...कसली हुशार आहेस ग?"

तोवर चेहरा विचारमग्न झाला होता अन मी बापुडा पूढे काय बॉम्ब पडतोय याचा विचार करत होतो.तोच म्हणे...

"बाबा..तुला सर्वात जास्त खायला काय आवडत....पंजाबी की south indian?"

"माझं असं काही नाही मला सगळंच खायला आवडतं फक्त veg असावं एवढंच आहे.."🤣🤣🤣 [ Veg की Non Veg यावर नेहमीच आमचं तू तू मै मै सुरू असत म्हणून एकदम safer side वर बोलावं लागतं]

"अस नाही बाबा...तुला सगळ्यात जास्त काय आवडतं ते सांग..."

"अरे बच्चा अस काही नाही... मला मूड असेल अन जे चांगलं असेल मग तस खातो मग ते पंजाबी असू दे किंवा south indian "

"अरे बाबा....काय रे तू पण...अस नाही...तुला जर एकच जर निवडायचं असेल तर काय?"

"मग अस असेल तर....South Indian मला जास्त आवडतं"

"मला तर बाबा...पंजाबी फार आवडत....छोले भटूरे तर कसले भारी ना..."

"हो का..."

"पण मी छोले भटूरे तर अजून एकदा पण खाल्ले नाही.... पण मला माहित आहे की ते खूप टेस्टी असणार..."

"त्यात काय इतकं...आपण पुढच्या वेळी खाऊ या की...आपली पुढची पार्टी याचीच करू..."

मी अस म्हणतोय तेच पुढून धमाकेदार उत्तर आलं...

"नको रे बाबा....आता जर छोले भटूरे खाल्ले तर दुसऱ्या जन्मात मी पंजाबी होणार आहे ना तेव्हा काय खाऊ???" 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣



09 December 2022

कॉफी!!

Edit Posted by with No comments
पर्णवी कधी कधी अचानकपणे असं काही तरी बोलते किंवा वागते की आपसूकच अंतर्मुख व्हायला होतं.मग उमगत की मोठं झालो खरं पण त्यासोबत जगण्यातील सहजपणा , संवेदनशीलता  ,सजगता हे मात्र हरवून गेलंय. असंच काहीसं मागच्या आठवड्यात झालं.

बऱ्याच दिवसांनी मित्र सहकुटूंब आला होता.त्याला घेऊन ताई कडे गेलो . तिथेआमच्या  गप्पा अन चिल्लर कंपनीची मस्ती सुरू होती.अस सगळं गोंधळ गडबड सुरू होती अन नेमकं त्याच वेळेस ताई कडे कामाला येणाऱ्या मावशी आल्या.त्यांना काय काय करायचं हे सांगून ताई थोड्या वेळात परत आली.

ताई या मावशीना रोज कामाला आल्या की कॉफी देते.हे पर्णवी ने खूप वेळा पाहिलेलं आहे त्यामुळे तिला हे अगदी पक्क लक्षात आहे. ताई जेव्हा परत आली तेव्हा गडबडीत असल्याने मावशींना आज कॉफी च काही विचारलं नाही अन हे पर्णवी च्या बरोबर लक्षात आलं. खेळण्यात इतके दंग होते तरी ते सगळं बाजूला ठेवून आली अन ताई ला म्हणे...

"आत्तु... अग आज तर तू मावशींना कॉफी दिलीच नाही....आता काम झालं तर त्या तश्याच जातील.."

"अरे हो ...अग इतकी गडबड सुरू आहे ना त्यामुळे राहूनच गेलं...देते बरं..." इति ताई

" मग त्यांना सांगतेस का तू कॉफी पिल्याशिवाय जाऊ  नका म्हणून..." पर्णवी

"हो...ठीक आहे...देते हं..." ताई

"नाही तर असं करू या का... तुझी गडबड आहे तर मला दूध,कॉफी अन साखर मिक्स करून दे मी कॉफी बनवते.."😃

अखेरीस ताई ने जेव्हा मावशींना कॉफी दिली त्यानंतरच पर्णवी खेळायला गेली.🤗

तस पाहिलं तर अगदी लहानशी गोष्ट पण  दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर नकळत अंतर्मुख करायला लावणारी ☺️

24 November 2022

शिवराय शक्तीदाता😊

Edit Posted by with No comments
महाराजांच्या गोष्टी, महाराजांचे नुकतेच आलेले जवळपास सगळेच चित्रपट पाहिल्या मुळे खूप दिवसांपासून पर्णवी ला शिवनेरी वर घेऊन जायचं बकेट लिस्ट मध्ये होत पण त्याचा काही योग काही जुळून यरत नव्हता .पण अखेरीस यावेळी दिवाळीच्या सुट्टी मध्ये पर्णवी गावी गेली तेव्हा सुजाता सोबत शिवनेरी ला जाण्याचा योग आला.

शिवनेरी वर महाराजांचं जन्मस्थळ पाहून तर पर्णवी खूप खुश झाली होती लगेच तिथूनच मला व्हिडिओ कॉल आला अन लगेच रिपोर्टिंग सुरू 🤣🤣🤣🤣

महाराजांचे जन्मस्थान, त्यांचा पाळणा अन महाराज लहानपणी इथे खेळले असणार यानेच ती एकदम भारावून गेली होती.अन त्यातच तिने अस काही अनपेक्षित काम केलं की मला ऐकल्यावर एकदम धक्काच बसला. 

तिने महाराजांच्या जन्मस्थळा जवळील माती घेतली अन रुमालात बांधून ठेवली.अन पुण्यात येईपर्यंत अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवली.इकडे सुट्टी वरून परत आली तेव्हा ती माती सर्वात आधी देवघरात एका भांड्यात अगदी व्यवस्थित ठेवली आहे अन सोबतच आजोबांना एक बौद्धिक पण देऊन झालं.😆😆

आता रोज सकाळी आंघोळ वगैरे झाली की सर्वात आधी पूजा होते ती या मातीची.मागच्या आठवड्यात मला बरं वाटत नव्हतं तर माती समोर जी उदबत्ती लावली त्याचा अंगारा घेऊन माझ्या डोक्याला लावला अन म्हणे..."बाबा...आता बघ तुला लगेच आराम वाटेल..." 😀

मी इतक्या वेळा शिवनेरी वर गेलो, राजगड, रायगड वर नियमितपणे जाऊन आलोय तिथे नतमस्तक झालो पण माती घेऊन यावं हे काही कधी सुचलं नाही 😃