09 August 2021

शाळा !!

Edit Posted by with No comments
ऑनलाइन शाळा म्हणजे सध्या एक परीक्षा च झाली आहे... शाळेचा अभ्यास म्हणजे आपलीच शाळा झाली आहे.त्यात आताची शिक्षण पद्धती किंवा एखादी गोष्ट पूर्वी जशी सांगितली गेली अन आता त्यामध्ये झालेला बदल ही एक प्रकारे पालकांची परीक्षा आहे.

पर्णवी ची शाळा अन अभ्यास हे सुजाता च डिपार्टमेंट पण कधी कधी मग माझ्याकडे ही जबाबदारी येते अन तेव्हा मात्र धम्माल असते.कारण माझ्या सोबतचा अभ्यास किंवा शाळा गंमत जंमत करत सुरू असतो.सुरू झालं की मग बाबी तुझी शाळेची गंमत सांग, मला जरा energy दे म्हणजे...2 काजू,2बदाम अन 2 पिस्ता ही आमची energy... मग पाणी दे...जरा आराम करु का...इत्यादी इत्यादी सुरू असत अन मग या साऱ्यात शाळा नावाचं प्रकरण सुरू असत.

एक दोन आठवड्या पूर्वी आमची शाळा सुरू होती.इंग्रजी च noun प्रकार सुरू होता.त्यात एक उदाहरण म्हणून बाबा झोपल्यावर घोरत आहे असं उदाहरण होतं पण म्हणलं कशाला उगाचच बाबा ला बदनाम करायचं म्हणून समजवायला म्हणून मी पर्णवी ला म्हणालं..."आई रात्री झोपल्यावर घोरते..." तर पुढे काही पूर्ण करायच्या आधी लगेचच टोमणा बसला...."बाबा...अस चुकीचं नाही हं सांगायचं पुस्तकात सांगितलं आहे ना बाबा तर बाबाचं.... आई नाही बर घोरत..."😂😂🤣🤣😂

आता दुसरा प्रसंग त्यामध्ये दिवस अन रात्र याबद्दल होतं... त्यामध्ये वाक्य होतं रात्री अंधारात अवकाशात तारे असतात.म्हणून मी आपलं त्याबद्दल जुजबी जरा सांगायचं विचार करत होतो तेच पर्णवी माता जरा ध्यानात गेल्या त्यामुळे आता काय प्रश्न येतोय हा माझा विचार सुरू होता तेच लगेच म्हणे..."बाबी...असं नाहीये...दिवसा पण तारे असतात पण फक्त आपल्याला दिसत नाही म्हणजे किनई सूर्य बाप्पा चा खूप प्रकाश असतो ना त्यामुळे ते असतात पण आपण बघू शकत नाही...समजलं ना तुला..."

त्यानंतर मात्र मला दिवसा तारे दिसले 😂😂🤣


17 July 2021

गप्पाष्टक 04

Edit Posted by with No comments
आपण रोजच्या आजबाजूला दिसणाऱ्या नेहमीच्या गोष्टी किंवा व्यक्ती याबाबत इतकं गृहीत धरून असतो की आपल्याला पडद्याआड असणारी बाजू वा दुसऱ्या दृष्टीकोनातून असणारी बाजू आपल्याला दिसत नाही मात्र लहानग्या च असं नसतं त्यांच्या निरागस मनाला अशाही बऱ्याच गोष्टी दिसतात किंवा त्यातून येणारे प्रश्न नकळत अंतर्मुख करतात.

आज सकाळी मी अन पर्णवी दूध आणण्यासाठी गेलो होतो, तेव्हा पालिकेची गाडी कचरा घेण्यासाठी आली होती.तस पाहिलं तर माझ्यासाठी हे रोजचं आहे कारण माझी ऑफिसची वेळ अन पालिकेच्या गाडीची वेळ एकच असते.रोजच या गाडीला बायपास करून जातो म्हणजे माझ्यासाठी तो रुटीनचा भाग आहे.आज सकाळी ती गाडी पाहिली अन पर्णवी ने मला लगेच प्रश्न केला...

"बाबी, हे काका काकू जे कचरा गाडी मध्ये ठेवत आहेत त्यांना त्या गाडीवर इतक्या माशा आहेत त्याचा त्रास होत नाही का रे?"

"होत असणार की....ते पण आपल्या सारखेच आहेत ना...."

"त्यांना त्रास होतोय ना मग ते हे काम करतात..."

माझ्यासाठी हा प्रश्न खूप अनपेक्षित होता...काय उत्तर द्यावं... हे क्षणभर मला काही सुचेनासे झालं...

"ती त्यांची गरज आहे म्हणून हे काम करत असतील....त्यांना दुसरं काम मिळालं नसेल त्यामुळे मग ते हे काम मिळालं म्हणून करतात....अन मग या कामातून त्यांना पैसे मिळतात त्यामुळे जेवण,शाळा असं सारं काही करू शकतात..."

माझा आपला उत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न करून झाला...ते कितपत पटेल हे माहीत नाही तोवर पुढची प्रतिक्रिया आली...

"अच्छा म्हणजे बाबी, त्यांना त्रास होतोय पण त्यांना हे काम करायला लागत आहे....म्हणजे  त्यांना त्या त्रासाची सवय होऊन गेली आहे ....बरोबर ना ?....."

"सवय होऊन गेली आहे...."यावर मी एकदम आश्चर्यचकित झालो..आपण जसे मोठे होतो तस परिस्थिती अन गरज यापोटी कितीतरी त्रासांची सवय करून घेतो....हो की नाही?

04 July 2021

देव बाप्पा !!

Edit Posted by with No comments
काल संध्याकाळी सुंदर असा संधीप्रकाश पडला होता सोबतच मस्त थंड हवा होती.अचानक मूड बदलला अन म्हणलं चला चक्कर मारावी.चिल्लर मंडळी पण घरात बसून कंटाळून गेली होती,त्यांना पण घेऊन जाऊ या अस ठरवलं. त्यामुळे पर्णवी अन अद्वय दोघांना म्हणलं पटकन हात पाय धुवून घ्या, बाप्पा करा मग आपण बाहेर फिरायला जाऊ या. बाहेर जायचं म्हणल्यावर दोघे पण एकदम फॉर्म मध्ये आले.पर्णवी ने चटकन आवरून शुभंकरोती,गायत्री मंत्र वगैरे म्हणून मास्क लावून तयार पण झाली मात्र अद्वय ची गाडी गणपती स्तोत्र की शुभंकरोती यावर अडकली होती शेवटी गणपती स्तोत्र वर मॅटर सेटल झालं🤣😀

सोसायटीच्या बाहेर पडतो न पडतो तेच दोन्ही तोफा धडाधडायला सुरुवात झाली, अखंड प्रश्न सुरू.....मामा, तू पर्णवी च ऐकतो माझं ऐकतच नाही माझं पण ऐक.... बाबा, आता तूला माझं ऐकावं लागेल.अस दोन्ही बाजूने आक्रमण सुरू होतं. शेवटी थोडं लक्ष दुसरीकडे न्यायला म्हणून पश्चिम समेवर लुकलुकत असणारा शुक्र दाखवला अन मग सूर्यमाला वर आमचा विषय आला.कोण कोणते ग्रह, ग्रहण कस होत वगैरे सुरू असताना, आम्हाला शनी दाखवतोस का रे? कुठे ब्र असेल आपण शोधू या का बरं.... थोडक्यात काय तर मी आगीतून फुफाट्यात आलो होतो ...🤣🤣😂😂😂

त्यावर थोडं बोलून झाल्यावर मग अचानक पर्णवी म्हणे,बाबा...अरे तुला एक सांगायचं राहूनच गेलं....आज पहाटे काय झालं माहीत आहे का तुला? मी पहाटे उठले ना तेव्हा आपल्या बेडरूमच्या खिडकी मध्ये कोण आलं होतं ....ओळख बरं?
"आपला तो येलो बंपी वाला पक्षी की कोकिळा"

"छे....नाही...हरलास ना....सांगू तुला....अरे सकाळी कृष्ण बाप्पा अन राधा दोघे आले होते....आणी ते आपल्या खिडकी मध्ये बसून माझ्याकडे बघत होते..."

"हो काय...." 

मी पुढे बोलणार तोच लगेच अद्वय म्हणे..."पर्णवी, काही सांगू नकोस, देव बाप्पा आपल्याला कधी दिसुच शकत नाही...म्हणजे तो असतो पण दिसत नाही..."

"अरे आदू, बाप्पा दिसतो आपल्याला....हो की नाही रे बाबा..."

"लहान मुलांना दिसू शकतो...."इति मी

"बर मग कृष्ण बाप्पा काही बोलला का तुझ्या सोबत...काय म्हणाला बाप्पा..."

"अरे बाप्पा सकाळी कधी बोलतो का?...बाप्पा अन राधा फक्त माझ्याकडे बघून हसत होते..."

"पण बाप्पा असा कसा काय तुला दिसला...." इति आदू

मग मध्येच मी दोघांना थांबवत म्हणालो...जे चांगली लोक असतात चांगली वागतात त्यांना दिसतो....

अस म्हणाल्या बरोबर लगेच पर्णवी सुरू झाली...." होय आदू, जे चांगलं वागतात, चांगलं बोलतात, कोणाला त्रास देत नाही त्यांना बाप्पा नेहमी दिसतो. अन तुला माहिती आहे का स्वामी आजोबा नेहमीच आपल्या सोबत असतात फक्त आपल्याला ते तेव्हा दिसत नाही...अन आता सुद्धा ते आपलं बोलणं ऐकत आहेत....त्यामुळे आपण ना नेहमी चांगलंच वागयचं,त्रास द्यायचा नाही म्हणजे मग आपल्याला सोबत असणारा बाप्पा दिसतो......हो की नाही रे बाबा...."

आता इतक्या सोप्या भाषेत जगण्याचा मंत्र सांगितल्यावर मी फक्त हो शिवाय काय बोलणार 🤗

22 June 2021

गप्पाष्टक 03

Edit Posted by with No comments

 

करोना मुळे मागील वर्षी पर्णवीची शाळा म्हणजे एकदम धम्माल झाली.ऑनलाइन शाळा म्हणजे फक्त रेकॉर्ड केलेले व्हिडिओ यायचे अन ते आपण आपल्या सोयीनुसार बघायचे व त्यानंतर होमवर्क करायचा. होमवर्क झाला की तो व्हाट्सएपच्या  ग्रुपवर टीचर ना पाठवून द्यायचा.अस सारं होत.एकंदरीत सगळे मूड स्विंग बघता शाळा पर्णवी ची पण परीक्षा मात्र सुजाताची असायची.आता उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली तेव्हा लिहण्याचा विसर पडू नये म्हणून टीचर रोज एक लहानशी स्टोरी पाठवून द्यायच्या अन आपण सराव म्हणून ती लिहायची असं होतं. सुट्टी मध्ये पण अभ्यास करायचा का, मग जरा वेळाने लिहिते, मला भूक लागली, मला energy घेऊ दे जरा, मला एक बदाम अन एक पिस्ता खाल्ला की मगच energy येते, लिहताना चा आम्ही एकदम कोणत्या तरी तिसऱ्या जगात जायचो मग वेगळंच काही आठवणार वगैरे वगैरे अस सगळं करत चार ओळी लिहणे म्हणजे हा किमान 2 ते 3 तासांचा कार्यक्रम व्हायचा.

एक दिवस मग सुजाता ने कंटाळून जाहीर केलं, तू आज लिहिण्याचा सराव केला नाही त्यामुळे आता मी टीचर सोबत बोलले आहे अन त्यांना सांगून दिल आहे की ,"आमच्या पर्णवी ला लिहण्याचा कंटाळा येतोय त्यामुळे ती काही सराव करणार नाही, अन आज पण तिने काही लिहिलेलं नाहीये." अन यावर टीचर ने सांगितलं आहे की...."ठीक आहे, पर्णवी लिहीत नाही ना मग आम्ही तिला आता ग्रुप मधून काढून टाकतो.पहिली ची शाळा सुरू झाली की मग बघू."

हे ऐकल्यावर मग सुरुवातीला पर्णवी ला गंमत वाटली, तिला वाटलं आई मजा करते आहे.पण नंतर मग आई च्या म्हणण्याला बाबा पण हो म्हणतो आहे म्हणजे नक्की असंच झालं असणार.मग मात्र स्वारी काहीशी खट्टू झाली पण तस काही दाखवलं नाही.

संध्याकाळी मग आत्या कडे गेल्यावर मात्र सार पुराण सुरू झालं...आत्या ला म्हणे....

"आत्तु, तुला माहीत आहे का आज काय झालं...."

"नाही....का ग ...काय झालं..."

"अग, आऊ ने आज माझ्या टीचर ला फोन केला होता अन मी गोष्ट लिहली नाही ते सांगून दिलं..."

"अस होय.....बरं मग काय झालं..."

"अन मग त्यांनी म्हणाल की पर्णवी ने नाही ना लिहलं मग आम्ही तिला ग्रुप अन ऍप मधून काढुन टाकतो....अन मला आता काढून पण टाकलं आहे."

"अरे बापरे...खरंच की काय..."

"अग खरंच.....मला काढून टाकल आहे....आता आत्तु...मला सांग....असं कधी कोणी करतं का? एक दिवस लिहलं नाही म्हणून काही लगेच ग्रुप अन ऍप मधून काढालं...."

"हो ना..."

"अस करतात का कधी...पण माझ्या टीचर ने केलं आहे...बघ ना..."😂😂😂🤣🤣🤣🤣🤣

हे असं आहे...इतकं शहाणपण फक्त स्वतःचा मुद्दा पटवायचा असतो तेव्हाच बरोबर येतो....नंतर मात्र मी आता छान लिहीन ,रोज लिहीन वगैरे वगैरे प्रॉमिस करून आम्हाला गुंडाळल अन त्यानंतर ये रे माझ्या मागल्या 🤣🤣😂😂

 

27 April 2021

आंबा परेड 😂😂😂

Edit Posted by with No comments
वंश परंपरेने आंबा प्रेम पर्णवी कडे पण आहे.आंबा हवा बस्स बाकी काही नको.पापड-आमरस,भात-आमरस,चपाती-आमरस,आमरस करताना राहिलेली कोय अन आंब्याचं साल, किंवा फोडी करून आंबा खाताना कोय अन साल एकदम चकाचक करणे हे असं आंबा प्रेम आहे.

मागच्या आठवड्यात दुपारी जेवण झाल्यावर आंबे खाण्याचा कार्यक्रम सुरू झाला.आजोबा अन पर्णवी यांच्या मध्ये फोडी कोणी खायच्या अन कोय कोणी खायची याचा करार झालेला आहे.खर तर दोघांचे अशे बऱ्याच गोष्टीत करार झालेले असतात.सकाळी लिंबू सरबत कोण बनवणार,गोष्ट कोण सांगणार वगैरे अन महत्त्वाचे म्हणजे नियम...तो बिलकुल ही तोडणे नाही. तर त्यादिवशी फोडी पर्णवी खात होती अन कोय आजोबा अस सुरू होतं. त्यादरम्यान दोघांचं झालेलं गप्पाष्टक.

पर्णवी : आजोबा, कोय आंबट आहे का

आजोबा : होय...आंबट गोड आहे.

पर्णवी : आजोब्या, आंबट असेल तर खाऊ नको बरं

आजोबा : नाही ,इतकी पण काही आंबट नाही

पर्णवी : बघ बर.... आंबट कोय खाल्लीस तर खोकला येईल तुला....अन जर काय खोकला झाला तर मला अजिबात सांगायला येऊ नकोस.

आजोबा : बरं

पर्णवी : बरं काय....अन ऐक आत्ताच सांगते तुला...जर खोकला झाला तर मग त्या नंतर तुझी कोय कॅन्सल... तुला अजिबात आंबा मिळणार नाही...अन मग मला लाडीगोडी लावायची नाही की... पणू... आंबा दे...कोय दे...समजलं..मी देणार नाही 😂😂😂🤣🤣🤣🤣😂😂

24 April 2021

घात विश्वासघात 😂😄🤣

Edit Posted by with No comments
चिकू ची आजोबांच्या सोबत भन्नाट connection आहे.सकाळी उठल्या बरोबर जे आजोबांसोबत मस्ती सुरू होते ते थेट रात्री उशिरापर्यंत.आजोबां सोबत गोष्टी, क्रिकेटच्या मॅच अन ऐतिहासिक मालिका अस सगळं फुल ऑन दोघांचं मेतकूट जमलेलं असतं.संध्याकाळी स्वामींची मालिका, घेतला वसा ,बाळू मामा वगैरे मूड असेल बघणं सुरु असतं.यादरम्यान त्यांच्या गप्पा म्हणजे एक वेगळाच प्रकार आहे.त्यात मूड असेल तसं आजोबांना वेग वेगळी नावाने हाका मारली जाते,आजोबा,आजोब्या,आजूबी अशी एक ना अनेक.

मागच्या आठवड्यात रामनवमीच्या दिवशी रात्री दोघांचा झालेला संवाद...साधारण आठ वाजले असतील,स्वामींची मालिका सुरु होत होती तेव्हा अचानक पर्णवी ला काय आठवलं देव जाणो...बाबांना म्हणे,

पर्णवी : आजोबी ,किती वाजले रे.

आजोबा : आठ वाजले, स्वामींची मालिका सुरू होते आहे.

पर्णवी :(नेहमीच्या एकदम मोठ्या माणसाच्या टोन मध्ये,सोबत हातवारे सुद्धा) आजोब्या, अरे घात झाला....

आजोबा: काय...कसला घात...

पर्णवी : अरे तू माझा विश्वासघात केला आहेस....प्रॉब्लेम झालाय सगळा...

आजोबा : अग पण नक्की केलंय काय मी...कसला विश्वासघात..

पर्णवी : अहो आजोबा, मी तुम्हाला सांगितले होते ना 7 वाजता रामायण लावा म्हणून....तुम्ही का लावलं नाही....आता मला कस बघायला मिळणार....तुम्ही न्यूज बघत बसले असणार ना...विश्वासघात केलाय तुम्ही 😂😂😂🤣🤣🤣🤣

यावर आता आजोबा काय बोलणार....असा प्रॉब्लेम आहे होय म्हणून गुपचूप ऐकून घेतलं ....परत लागेल तेव्हा बघू असं पटवून परत मालिका सुरू 🙈😀

23 April 2021

जिंदगी गुलजार है

Edit Posted by with No comments
बरेच दिवस झाले डायरी मध्ये आठवणीचा खजाना भरून ओसंडतो आहे पण लिहायला काही मुहूर्त लागत नाहीये.मागे एका पोस्ट मध्ये लिहलं आहे त्याप्रमाणे करोना मध्ये माझ्यासाठी सर्वात चांगली झालेली गोष्ट म्हणजे पर्णवी सोबत मिळालेला वेळ... जरी ऑफिसची भरपूर काम असली तरी ती सततची लुडबुड किंवा एखाद्या मिटिंग वेळी मध्येच येऊन डिस्टर्ब करणं किंवा हळूच चिमटा काढणं आ काही ना काही सुरूच असतं. डायरी ची पान सर सर पुढे जात आहेत,पिल्लू मोठं व्हायला लागलं आहे. जीवन नजरेसमोर भरभर पुढे जातंय मात्र आयुष्य जगायला कमी पडतोय अस कधी तरी वाटून जातं.खूप साऱ्या आठवणी लिहायच्या आहेत त्यासाठी वेळेचं गणित जमवाव लागेल.बघू या कस जमतंय.

बरीच जुनी गोष्ट आहे म्हणजे करोना सुरू होण्यापूर्वी ची...ऑफिस वरून घरी आल्यावर पाहिले 10-15मिनिटं चिकू सोबत मस्ती व्हायलाच हवी असा काहीसा अलिखित नियमच झाला होता.मग किती पण उशीर होवो डोळे ताणून पिल्लू वाट बघायचं.कधी कधी तर जास्त उशीर झाला तर वाट बघून झोपून पण जायची.

त्यादिवशी अचानकच ऑफिस मध्ये असताना कणकण जाणवायला लागली अन विशेषतः पाय प्रचंड दुखायला लागले.त्यामुळे ऑफिस मधून लवकरच म्हणजे वेळेवर निघालो 😀😀. घरी आलो तर चिकू समोरच, त्यामुळे थोडं वरवर गंमत करून तिच्या नकळत मी बेडरूममध्ये जाऊन बसलो.तोवर पाणी गरम व्हायला लावलं होत,म्हणलं जरा शेक घ्यावं म्हणजे मग बर वाटेल.गरम पाणी टब मध्ये घेऊन मी डोळे बंद करून शेक घेत होतो.अन हे करताना चिकू केव्हा बेडरूममध्ये आली हे मला समजलं पण नाही.जरा शेक घेऊन पाय मी टब बाहेर ठेवले होते तोच त्यावर कोणी तरी हलकी फुंकर घातली.कोण आहे बघायला डोळे उघडले तर लगेच ओरडा ऐकू आला....

" तू पण ना बाबा....तुला काहीच समजत नाही....भाजला ना पाय...कशाला गरम पाण्यात बुडवला.... आता असाच बस्स....मी फुंकर घालते म्हणजे मग तुला जर बर वाटेल....काय समजलं ना...."

अस म्हणून इटूकल्या ओठाचा चंबु करून फुंकर घालायला सुरुवात झाली.एक दोन मिनिटं झाले असतील मी आपला निःशब्द होऊन तो क्षण शक्य तेवढा जगून घेत होतो. लेकिचं ते निरागस बोलणं,ते हक्काने रागावणे, तो मोठेपणाचा हवा सारं काही हवं हवंस.

जिंदगी गुलजार है... बस पोटी एक लेक हवी...🤗