23 January 2022
05 January 2022
स्वामी आजोबा !!
Edit Posted by Yogesh with 2 comments09 November 2021
आज्जी....
Edit Posted by Yogesh with No commentsआजी अन आजोबा यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही पर्णवी वर दिली आहे . लक्ष म्हणजे काय दिवसभरात आराम केला किंवा नाही की फक्त काम करत राहिलेत , वेळेवर जेवण अन औषध घेतलं का अन इतर बाकी काय उद्योग केले का हे सार काही पर्णवी च काम आहे. अन मग संध्याकाळी ऑफिसवरून आलो की मग दिवसभराचा सगळा डिटेल रिपोर्ट मग मला दिला जातो.
आजोबांच्या बाबतीत जास्त काही तक्रार नसते त्यांचं सार काही वेळेवर अन तब्येतीला जपून असतं याउलट आजीची मात्र मोठी तक्रार असते. बाबी, आजी आज झोपली नाही , मास्क न लावताच खाली जाणार होती, हात धुवायला विसरली, औषध पण नाही घेतलं वगैरे वगैरे.... अन तुला माहीत आहे का ती माझं ऐकतच नाही आता तूच काही तरी कर बरं .
मग मीच पर्णवी ला विचारतो , चिकू मला तर काही सुचत नाही तूच काही तरी आयडिया सांग बरं .... असं म्हणाल की मग अशा काही एकाहून एक भन्नाट आयडिया डोक्यातून येतात की बस्स.... जस की ..
- बाबी आपण किचन ला ग्रील बसवू अन लॉक लावू या का?
- बाबी आपण असा अलार्म लावू या का रे की आजी आली की मग तो वाजायला हवा
- बाबी, नाही तर असं करू आपण आजी ला किनई छुम छुम वालं पैंजण आणू या का? म्हणजे मग काय होईल आजी कुठेही जाणार असेल की त्याचा आवाज झाला की लगेच आपल्याला समजेल
असं बरच काही काही चालू असत... असो तर असं एकंदरीत आजी अन नात प्रकरण आहे . दोनेक आठवड्यापूर्वी मी अन चिकू गप्पा मारत बसलो होतो. अन नेहमी प्रमाणे गाडी आजीवर येऊन थांबली. मग पुन्हा एकदा आजीने आराम करायला हवा यासाठी काय करावं बरं .... ती सारखं काही ना काही काम करत राहते मग आपण काय बरं करू शकतो... आता विषय आपला नेहमीचाच होता म्हणालं आता जरा चिकूची फिरकी घेऊ या बरं .
म्हणून तिला म्हणाल ..." चिकू.... आता मला काही सांगू नको बघ ...मी थकलो आहे ... आजी साठी माझ्याकडे तरी काही उपयोग नाही आता तुलाच काही तरी करावं लागणार माझं तर डोकं बंद झालं आहे..."
असं म्हणाल्यावर लगेच एकदम गंभीर चेहरा करून म्हणे ..... " बाबी ... तूझ्या सारखंच माझं पण झालं आहे माझ्याकडे पण काही उपाय नाही रे... "
"अन तुला सांगू का .... ही आजी म्हणजे ना ..."खालून पापड अन वरतून काठी असा प्रकार आहे बघ ...."".. 😅😅
हे ऐकल्या बरोबर मी अशक्य हसलोय. आता हे कुठे ऐकलं अन कुठून आल हे देवाक ठाऊक. सहा वर्षांचा असताना आम्हाला शेंबूड पुसता येत नव्हता अन आता हे बघा किती मोठ्या मोठ्या गप्पा 😂😂
02 October 2021
डॉक्टर!!
Edit Posted by Yogesh with No comments01 October 2021
पोस्टमन !!
Edit Posted by Yogesh with No commentsकरोना मुळे यावर्षी सुद्धा आई ला रक्षाबंधन साठी मामा कडे गावी जाणं शक्य होणार नव्हतं त्यामुळे आपण राख्या पोस्टाने पाठवून देऊ असं ठरलं. सध्याच्या डिजिटल गोष्टींमुळे पोस्ट,पत्र ,तार इ.इ. जी जुनी संपर्क संसाधने आहेत ही या नव्या पिढीला काही माहित नाहीत. पर्णवी ला पोस्ट ऑफिस , पत्र , पोस्टमन याबद्दल सांगितलं होत.
चार दिवस अगोदर राखी पाठवून पण मामा ला रक्षाबंधन ला राखी काही मिळाली नाही. आई मग त्यावरून दोन तीन वेळा म्हणाली , राखी कशी काय मिळाली नसेल, काय झालं असावं बरं ? पत्ता वगैरे तर बरोबर टाकला होता ना कि हरवल्या असाव्यात असं बरच काही बोलणं सुरु होत. आमचं हे बोलणं सुरु असताना पर्णवी जवळच खेळत बसली होती. खेळता खेळता अचानक म्हणे,
" अगं आजी ... रक्षाबंधन होत ना मग पोस्ट ऑफिसला पण सुट्टी असेल ना ?"
" ते पोस्टमन काकांना पण राखी बांधायला त्यांच्या ताई कडे जायचं असेल ना ?"
" अन आता तुला कस वाईट वाटत आहे तसच जर पोस्टमन काका गेले नाही तर त्यांच्या बहिणीला पण वाईट वाटेल ना ?"
" आता ते राखी बांधून आले ना कि मग मामा आजोबांना राख्या मिळतील"
इतक लहान लहान गोष्टीं मध्ये सुद्धा असा विचार करणाऱ्या पर्णवी ला बघून मला मस्त वाटलं 😊
10 August 2021
असं का बरं ?
Edit Posted by Yogesh with No commentsजेव्हा आपल्या मनाची पाटी कोरी असते तेव्हा आपला एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा असतो. लहान मुलांचं अगदी असंच असतं .त्यांच्या मनाची पाटी कोरी असते त्यामुळे जे त्यांना दिसतं ते आपल्या मोठयांना दिसत नाही. मग कधी तरी त्यांच्या कडून त्याबद्दल बोललं गेलं की ती गोष्ट आपल्याला आश्चर्यचकित करते तर कधी अंतर्मुख करते. असंच काहीसं मागच्या आठवड्यात झालं.
माझ्या मित्राच्या मुलाचा वाढदिवस होता तेव्हा मी, सुजाता , भाचा अद्वय अन पर्णवी असं चौघे जण गेलो होतो. चिल्लर गॅंग बरेच दिवस घराबाहेर कुठे गेले नव्हते त्यामुळे बाहेर जायचं म्हणून दोघे पण खूप खुश होते. करोना मुळे तर वाढदिवस, हॉटेल किंवा बाहेर कुठे बागेत जाणे वगैरे अशे सारे प्रकार अगदी बंदच झाले आहेत त्यामुळे करोना काळात कंटाळलेल सर्वात जास्त कोण असेल तर ते चिल्लर कंपनी . बऱ्याच दिवसांनी बाहेर पडल्यामुळे मग बाहेरची गंमत बघण्यात अन मस्ती करण्यात दोघे जण व्यग्र होते. अन सोबत प्रश्न याची जंत्री सुरूच होती.
मित्राकडे पोहचलो तेव्हा लहानग्याचे खेळ सुरु होते. सगळी धम्माल सुरु होती. अद्वय ची लगेच मस्ती सुरु झाली पण पर्णवी ला मात्र जरा वेळ लागला. तिचं आपलं निरीक्षण सुरु होतं . जरा वेळाने मात्र खेळणं सुरु झालं. असाच थोडा वेळ गेला असेल पर्णवी सुजाता कडे आली अन म्हणे...
" आई , मला एक सांग इथे सगळी लहान मुलं , ताई अन दादा आहेत सर्व जण खेळत आहेत मात्र ती तिकडे एक ताई आहे पण ती मात्र खेळत नाहीये . ती तर तिच्या आई सोबतच थांबली आहे. ती तर इकडे आली पण खेळली नाही. असं का बरं ?"
ती मुलगी म्हणजे मित्राच्या घरात ज्या मावशी येतात त्यांची मुलगी होती, तशी ती त्यांच्या घरातील माणूस असल्यासारखीच आहे पण इतकी सगळी मुलं अन लोक पाहून ती बावरली होती अन तिच्या आई जवळ जाऊन थांबली होती. इतक्या सगळ्या गोंधळात हे मात्र कोणाच्याही लक्षात आलं नव्हतं तेच नेमकं मात्र पर्णवी च्या लक्षात आलं. 😊😊
