06 October 2019

साधं सोपं !!

Edit Posted by with No comments

रात्री झोपण्यापूर्वी आमच्या गप्पा सुरू होत्या.असंच आपलं नेहमी प्रमाणे मस्ती चालली होती.मी सहजच पर्णवी ला म्हणालो...

"अरे माझं पिल्लू....किती वेळ झालं मी नी ला भेटलंच नाही...किती रे तुझी आठवण येते..."

बाबा वेडा आहेस का तू type चेहरा करत..."अरे बाबू अस काय करतोय...सकाळीच तर आपण स्कुल ला गेलो नाही का...आपण गाणं म्हणत गेलो...काय रे तू" [किमान शब्दात कमाल फटके...पुण्याचं पाणी ...🤣🤣🤣😂😂]

"अरे बच्चा....तस नाही रे ...त्यानंतर मग कुठे आपण भेटलो...दुपारी तू स्कुल मध्ये आल्या पासून आपण भेटलो का तरी....मी तर ऑफिसमध्ये होतो..."बाजू सावरायचा आपला केविलवाणा प्रयत्न 😛

"मग त्यासाठी कधी तरी हाफ डे घ्यायचा असतो..." [हे अस बोलायला कस सुचतं हे देवाक ठाऊक...🤔🤔]

"म्हणजे रे काय??"

"अरे बाबू...म्हणजे तू ऑफिस ला जायचं अन माझी स्कुल संपते तोपर्यंत काम करायचं अन मग घरी यायचं...म्हणजे हाफ डे"

"अरे बच्चू....पण मला असा हाफ डे नाही घेता येत...काम असतं...कसा घेणार मग हाफ डे...सांग बरं..."

"कसा म्हणजे....तुझ्या सरांकडे जायचं....त्यांना सांगायच माझ्या मुलगी ची मला आठवण येते आहे...म्हणून मग मी आता घरी जातो...अन घरी यायचं....अन मग आपण मस्ती करायची....झालं..."

I wish....आयुष्य हे असच इतकं अगदी साधं सरळ सोपं असतं तर....पण अस नाहीये...आता या इवल्याशा जिवाला काय समजावू अन कस समजावू तुला वाटत इतकं सोपं नसत 🤗🤗👼

पहिला गुरू !!

Edit Posted by with No comments

पर्णवी ची शाळेत Show N Tell अशी activity आहे त्यामुळे दोन दिवस काय करायचं....सोपं काय जाईल अस सगळं विचार करून ठरलं...काल पासून त्याची तयारी सुरू झाली.आज सकाळी शाळेत जाताना पण बऱ्यापैकी गोष्टी मधून तिला समजावलं होत.अन दुपारी शाळेतून आलीस की आऊ तुझ्या कडून प्रॅक्टिस करून घेईल अस आमचं ठरलं पण होतं.लेकरू किती गुणी आहे अगदी किती सहज ऐकल.चला आता सुजाता सोबत प्रॅक्टीस होईल म्हणून मी आपला निवांत होतो.

पण हा आनंद फार काळ टिकला नाही.कारण दुपारी फोन आला अन आदेश सुटला...

"बाबू...संध्याकाळी तू लवकर ये मी आता काही प्रॅक्टिस करणार नाही...समजलं..."

"अरे बच्चा...तू तर मला म्हणाला....."अस म्हणे पर्यंत पलीकडून फोन वरून कल्टी मारण्यात आली होती.बघ आता संध्याकाळी ये लवकर..उशीर नको करूस...असा पुढचा आदेश निघाला.

अरे हे तर शुद्ध साजूक तुपातलं अगदी घोळून घोळून गंडवण आहे रे...बाबा बिचारा गरीब...लेकीच्या भोळ्या चेहऱ्यावर गेला अन फसला की.

संध्याकाळी लवकर घरी पोहचलो तर मला जरा खेळू दे, जिजा बघू दे, शंभू बाळ बघू दे,जेवण करू दे हे असले प्रकार सुरू झाले.सकाळची ठेच रात्रीस शहाणा...त्यामुळे जास्त नाटकं न चालवून देत जेवण झाल्यावर पर्णवी ला घेतलं अन बेड मध्ये आलो.आता प्रॅक्टीस सुरू करायची म्हणणार तर लगेच म्हणे..

"बाबू...मी आऊ सोबत म्हणणार आहे...तू नाही"

"पर्णवी ....अजिबात नाही...तू दुपारी मला म्हणाली होती माझ्या सोबत प्रॅक्टीस करणार म्हणून मग आता आऊ कशाला?"

"नो म्हणजे नो....मला आऊ च पाहिजे"

"आऊ येणार नाही...माझं ऐकायचं...मीच प्रॅक्टिस घेणार...तुला कशासाठी आऊ पाहिजे ते बोल आधी..."

"बाबू तुला माहीत नाही का...काय सांगितलं होत...आई पहिला गुरू असतो अन बाबा दुसरा गुरू.....बरोबर ना"

"हो ...पण आता त्याच काय?"

"मला माझ्या पहिल्या गुरू कडून च प्रॅक्टीस करायची आहे.....दुसऱ्या कडून नकोय काही...अन सांगितलं ना पहिल्या गुरुच चं ऐकायचं असतं"

घ्या #आपलेच_सुविचार_आपल्याच_चरणी_सप्रेम

आरं अस कुठं असतंय व्हय...उगं आपलं बिचाऱ्या साध्य सरळ बाबा ला गंडवायच

20 September 2019

लग्न!!

Edit Posted by with No comments

कधी कधी साध्या गप्पा अन गंमत करता करता जेव्हा तुमच्या लक्षात येत की दोस्ती मध्ये कुस्ती झाली अशा वेळी फक्त माघार घेणं किंवा लेकराला मूळ मुद्द्यापासून दूर करणं हाच एकमेव पर्याय असतो.

दोनेक आठवड्यापूर्वी मी,पर्णवी अन आई आम्ही भाजी घेण्यासाठी मंडई ला गेलो होतो. आई ला भाजी घ्यायला सोडलं अन मग आम्ही दोघे गप्पा मारायला मोकळे झालो.रायगड ट्रेक ची अर्धी राहिलेली गोष्ट पूर्ण करायची होती म्हणून मग त्यावरून आमच्या गप्पा सुरू झाल्या.आता खूप सारे काका लोक आहेत मग कधी कधी मग तिचा गोंधळ होतो.

बाबू.....अरे हेमंत काका ,सचिन काका अन तू सोबत राहायचा ना मग धनु काका का नव्हता? इथून मग जे सुरू झालं त्यात रायगड मागे पडला अन वेगळ्याच गडावर आमची लढाई सुरू झाली.

मग माझ्या लहानपणी चा विषय निघाला.नुकतीच ती गावाकडं गेली होती तेव्हा जवळ असलेल्या डोंगरावर फिरायला गेले होते.तर त्यावरून पण ऐकवलं लगेच...मी तर बघ ज्यु.केजी लाच आहे तर उंच डोंगरावर एकटी चढले तू तरी चढला होता का?

आता बाबा पण काय कमी आहे होय...माघार कशाला घेणार...सांगून दिलं...हो मग....मी,आत्तु ,आजी अन आजोबा आम्ही जायचो तेव्हा मी पण एकटा डोंगरावर जायचो.एवढं काय बोललो तेच लगेच प्रतिक्रिया आली.

"बाबू....तुला पण माझ्या सारखं लहानपणीच आठवत की" 🙈

यातून सावरतोय तोच पुढचा बॉम्ब पडला.
"बाबू....तुझ्या लहानपणी तेव्हा मी कुठे होते रे ...मला नव्हतं ना नेलं तेव्हा....असच करायचा ना तू."

"अरे बच्चा तू नव्हता तेव्हा..." माझा आपला सावरायचा वेडा वाकडा प्रयत्न सुरू झाला तोच पुढील प्रश्न..

"आऊ कुठे होती तेव्हा...तिला पण नाही नेलं ना.."

आता हिला नीट समजावं म्हणून मी आपला सुरू झालो...

"चिकू....अरे तेव्हा आम्ही लहान होतो ना त्यामुळे आम्ही तेव्हा भेटलो नाही....मग मोठे झालो ना त्यानंतर मी आणि आऊ भेटलो...मग आमचं लग्न झालं अन मग तू आलीस....अगदी असंच आजी आजोबा लहान होते तेव्हा मी नव्हतो...मग ते मोठे झाले...त्यांच लग्न झालं अन मी आलो..."

हुश्श...मला वाटलं सुटलो एकदाचा...पण कसलं काय..

"मग बाबू माझं लग्न कधी होणार रे...."😂😂😂

"अरे बच्चा...तू अजून लहान आहे...मोठा झाला ना तू की मग बघू"

"असंच करणार ना तू...नको करुस माझं लग्न...तू ,आऊ ,आजी,आजोबा सगळ्यांनी लग्न केलं...माझंच कोणी लग्न करत नाही....मी छोटू आहे ना अस करणार ना तू...मी नाही बोलणार तुझ्याशी....कट्टी आता...असंच करतो तू..." 😂😂🤣🤣🤣

अस म्हणून रागावून नाक फुगवून बसलेलं निरागस पिल्लू बघताना माझी हसून पुरेवाट झाली होती पण परिस्थिती बिघडू नये उगाचंच हसू दाबून ठेवलं होत....मग हळूच खाण्यावर विषय नेला अन All matter settled. एकदा खाऊगिरी सुरु झाल्यावर मग बाकी सगळं विसरून पाव भाजी,डोसा,आईस्क्रीम काय काय बाकी आहे याचा हिशोब झाला बाकी काही नाही.😂😂😂😂

ए चा एकार !!

Edit Posted by with No comments

मी, भाचा अद्वय अन पर्णवी असा तिघे मिळून विकांताला सकाळी खादाडी सुरू होती. मी आपलं काही तरी गंमत करत त्यांना भरवत होतो.

तेवढ्यात अचानक आदु ला काही तरी exciting आठवलं अन मला थांबवत बोलू लागला...त्याला सांगायची excitement एवढी होती की त्या नादात मला म्हणू लागला..

" ए....ए...अरे...ऐक ना...मी एक सांगू...."

"ए...ऐकतो ना...ऐक ना ...ए..."

यानंतर आता पर्यंत शांत असलेल्या पर्णवी मातेने रुद्रावतार धारण केला अन म्हणू लागली...ते पण अगदी डोळे मोठे करून एक हात कंबरेवर अन दुसऱ्या हाताच बोट उगारून...

"अद्वय....गप्प बस...माझं ऐक...."

"काय बोललास आता तू....अद्वय ...सांग काय बोललास"...

"हे ए...ए...ए...करून का बोलतो आहेस? तुझा मामा आहे ना तो....आहे की नाही?....मग मामा म्हणून हाका का नाही मारली...बोल मामा...अन मामा म्हणून हाका मार....अन परत ए म्हणायच नाही....समजलं.."

माझ्यासाठी तर हा surprise item होता.मला काही समजलं च नाही हिला अचानक एवढं राग यायला काय झालं.म्हणून मी आपलं फक्त तिच्याकडे बघत म्हणलं...पर्णवी....काय हे..अचानक हे काय आता??

तर म्हणे....."तू मामा आहेस ना त्याचा...मग मामा म्हणायला हवं ना...माझ्या बाबाला कोणीही ए म्हणून बोलावलेलं मला चालणार नाही."😀😀😀😍😍

अन परत आदु कडे बघत म्हणे..."काय रे अद्वय ...समजलं ना.." 😀😀

किती ते बाबावर प्रेम 😉❤️

16 June 2019

बाबापण !!

Edit Posted by with No comments

बाप झाल्या पासून मला आई पणा बद्दल आतून एक सुप्त अशी असूया वाटू लागली आहे.लेकरांसोबत त्यांची आतून एक जन्मजात घट्ट अशी वीण असते.कदाचित ते 9 महिने अन त्या अशक्यप्राय अशा वेदना याचा बोनस असावा.पर्णवी सोबत सुजाता ला जेवढा वेळ घालवता येतो तितकासा मात्र मला शक्य होत नाही ही सल किंवा आपण खूप काही मिस करतोय ही टोचणी अदृश्य रूपाने नेहमीच पाठलाग करत असते.

सुरूवातीच्या काळात सकाळी पर्णवी ला सोडून ऑफिस ला जायचं म्हणजे माझ्यासाठी एक वेदनादायी प्रकार असायचा.जस हळू हळू तिला समज यायला लागली तस मग सकाळी ऑफिस ला निघूनच द्यायची नाही मग गुपचूप फसवून तिला मी ऑफिसला निघून जायचो.आपण कसले वाईट आहोत अस पण वाटून जायचं.मग जराशी मोठी झाल्यावर मात्र मग रोज मी तिला सकाळी माझ्या सोबत पार्किंग ला घेऊन जायचो अन जवळच गाडीवर चक्कर मारून मग मी माझा ऑफिसला जायचो.

पर्णवीची शाळा सुरू होण्याआधी ची ही गोष्ट आहे.नेहमीप्रमाणे मी ऑफिसला जाण्यासाठी तयार होतो पण आज पर्णवी चा मूड काही वेगळाच होता.तू आज नको ना जाऊ ....माझ्या सोबतच थांब...असा हट्ट करून बसली होती.हरेक प्रकारे समजावून झालं पण सगळे प्रयत्न निष्फळ होते.आज मला तूच हवा आहे अस म्हणून घट्ट मिठी मारून बसली होती.त्यादिवशी माझं ऑफिसला काम असल्याने सुट्टी पण घेणं शक्य नव्हतं.घड्याळाचा काटा जसा सरकू लागला तस माझी घालमेल वाढत होती.

तुला ऑफिसला काय जायचं असत...जाऊच नको...मला तू हवाय...अस म्हणल्यावर आज जरा वेगळंच वातावरण आहे हे लक्षात आलं.मग आता समजूत काढण्याची गरज आहे म्हणून तिला जवळ घेतलं अन समजावू लागलो.

"अरे बच्चा.....तुला खेळणी आवडतात की नाही...आपण दुकानात जाऊन घेतो की नाही.."

"हो...मला आवडतात...पण तू मला झायलो फोन नाही आणलास"

"बर...आणू या की...तुला बुक्स आवडतात....आपण हॉटेल ला जातो...डोसा खातो...पावभाजी खातो....हो की नाही..."

"हो..."

"तुला वा वा ड्रेस घेतो...तू केवढा हट्ट करते...बाबा...सगळं आणतो की नाही तुझ्यासाठी..."

"हो..."

" हे सर्व करायला बाबा कडे पैसे कसे येतात...कारण बाबा ऑफिसला जातो मग ऑफिसवाले बाबा ला पैसे देतात...आता तूच सांग जर बाबा ऑफिसला गेला नाही तर तुला गेम,बुक्स,कपडे वगैरे कस आणणार ??"

आता मात्र हे बरोबर लागू पडलं...हे ऐकल्यावर पर्णवी जरा विचारात पडली....आता काय करावं....मला वाटलं आता मला लगेच परवानगी मिळेल.

जरासा विचार केल्यासारख करून मग पर्णवी  म्हणे....
"बाबा...तू थोडासाच जा ऑफिसला...अन लगेच ये....मग थोडे पैसे मिळतील....मला एकच खेळणं घे...आपण बाहेर फक्त डोसाच खाऊ अन कपडे नको मला....पण तू लवकर यायचं....ठीक आहे"

ऐकल्यावर जरास गलबलून आलं पण काही व्यक्त करू शकलो नाही...फक्त एक मिठी मारली अन ठीक आहे म्हणालो...त्या दिवशी ऑफिसला जाताना मात्र रस्ता खूप धूसर होता अन मनात असंख्य विचार...

प्रत्येक बापाला ही कसरत करावीच लागते...भावना अन व्यवहार याचा समतोल साधावाच लागतो...बाप कधीच व्यक्त होत नाही...पण बापाचं आयुष्यभर असच द्वंद्व सुरू असते....एक बाहेर जगण्याच्या लढाईसाठी तर एक आतूनच स्वतः सोबतच...कधीही न संपणार........

15 June 2019

मेकअप !!

Edit Posted by with No comments

शनिवारी दुपारची निवांत वेळ....दुपारचं जेवण करून विकांताच्या पेंडिंग कामाची लिस्ट पाहत....चला आता कोणत काम उरकायचं असा साधा सरळ विचार करत तुम्ही पुढचं सगळं नियोजन ठरवून टाकता....पण त्याच वेळी नियतीच्या मनात काही तरी वेगळंच सुरू असत....भविष्यात काय लिहलं आहे याची तुम्हाला जाणीव ही नसते...अन अशा वेळी तुम्ही सहजच बेडरूम मध्ये डोकावता....त्याच क्षणी तुमचा घात होतो...

"बाबू.....आलास....इकडं ये ना....आता मी तुझा मेकअप करणार आहे....."

अशी आकाशवाणी होते अन अवघा हलकल्लोळ होतो...नियतीने हे काय लिहून ठेवलं आहे...आता मोठ्या बाक्या प्रसंगाला सामोरं जावं लागणार आहे याची तुम्हाला जाणीव होते...क्षीण का होईना पण प्रतिकार करावा म्हणून तुमच्या तोंडातून बोल पडतात...

"बच्चू....अरे मला काम आहे....बाहेर जायचं आहे...लगेच आलो....मी बाहेरून आलो की मग कर...."

"नो....नो....नो...सीट डाऊन...आधी मेक अप मगच तू जायचं...."

आधी लग्न कोंढाणाचे मग रायबाचे...तुम्हाला अगदी असच वाटून जात...

थोडा धाक दाखवून...सुटण्याचा प्रयत्न करून मग सुटावं म्हणून तुम्ही म्हणता....

"अरे बोकू....बॉईज कधी मेक अप करतात का? मेक अप तर फक्त गर्ल्स करतात...बाबूला मेक अप नाही करायचा"

तुम्हाला कामगिरी फत्ते झाली आता सुटतोय अस वाटत असतानाच तुमच्या वर ब्रम्हास्त्र सोडलं जात...

"नाही करू देत  मेक अप बॉईज....पण मला तुझा मेकअप करायचाच आहे...मी तुझा येंगे आहे (येंगे हे मी दिलेल्या नावांपैकी एक आहे 😂😂😂😂)...तू माझं नाही ऐकणार ना...अस करणार ना....मी तर तुझं सर्व ऐकते की नाही....मग मेकअप करायचा म्हणजे करायचा....."

एकंदरीतच वातावरणाचा अंदाज घेऊन तुम्ही शरणागती पत्कराता अन यानंतर मग तुमचा ताबा घेतला जातो....हुकूम सुटले जातात...गरीब बिचाऱ्या याचका प्रमाणे तुम्ही हुकूम ऐकत राहता...

"हं....चल झोप...."

"पाय सरळ कर...हात पोटावर घे....."

"फेस किती खराब झाला आहे...वॉश करता की नाही...."

मग पुढील दहा पंधरा मिनीट मेकअप किट मधील जे काही आहे ते तोंडावर लावलं जात.

"हं....झालं आता....उठून बस"

तुम्हाला वाटत चला झालं सुटलो बुवा....म्हणून तुम्ही म्हणता...

"झालं ना...मेकअप संपला....आता जाऊ मी...."

"नाही रे बाबू अजून....मेकअप काय असा पटकन होतो...थांब अजून बेल्ट अन क्लिप लावायची आहे...."

"अरे पण बच्चा...मला तर केस च नाहीयेत...टकलू आहे...कसा क्लिप लावणार...राहू दे "

छ्या....पण तुमचं म्हणणं मान्य कस होईल...काही ना काही कुरघोडी करणार च...

"अरे आपण दाढी ची पोनी बांधू अन त्याला क्लिप लावू..."

"हं...हे बघ झालं.....आता लिपस्टिक लावायची बर का..."

"नो बच्चा...अग लिपस्टिक काय...नको ना...आता हे बस्स झाल...."

"नो...लावायची....तोंड बंद कर...कर बंद चल...."

"अरे ओठ हे अशे कर...हे अस करतात...लिपस्टिक लावलं की..." (हे अगदी अभिनय करून दाखवलं गेलं होत )

"अन आता....लास्ट....लिपस्टिक लावायची टकलू ला....."अस एकदम मोठं हसून सांगितलं जात

बाबा बिचारा काय करणार....एवढं सगळं सजवून मग लेक एवढी खुश झाली की बस्स....त्या अवतारात पण लेकी ची प्रतिक्रिया होती.... "बाबू तू खूप छान दिसतो आहेस..." सोबत एक गालावर पापी सुद्धा...😍😍😍

[ शास्त्रात सांगितल्या प्रमाणे मग पाऊट करून सेल्फी सुद्धा होतात...]

संपूर्ण मेकअप ती एवढया तल्लीनतेने करत होती की जस काय तिला हे खूप महत्त्वाच task दिलंय.अन सार झाल्यानंतर चेहऱ्यावर असणारा आनंद अन हास्य हे निव्वळ priceless होता.

#लेकीसाठी_करायला_लागतं 😉

14 June 2019

भूक

Edit Posted by with No comments

"बाबू....मला भूक लागली आहे...काही तरी खायला दे...."

"बरं....काय देऊ??...पोळी भाजी देऊ का "

"नको....."

"मग...डाळू भातु खाणार का...."

"नको..."

"भेळ खाणार का..."

"नको...."

"केळी...."

"नको..."

"खजूर...."

"नको..."

"भेळ....चिवडा....बिस्कीट....कलिंगड.... " अस एक ना अनेक बरेच option देऊन झाले पण प्रत्येकाला नकारघंटा...

शेवटी वैतागून विचारलं...."बच्चा....तुला नक्की भूक लागली आहे ना?"

"हो रे बाबू...भूक लागली आहे..पण मला वेगळं हवंय खायला"

"वेगळं?? मग मलाच खाते का आता....😂😂😂"

"तू नको...मला वेगळं खायचं आहे....😂😂😂"

अरे बच्चा मग सांग काय हवंय....देतो मी...

यावर मग एका हाताची घडी ,एक हात गालावर अब तोंडाचा चंबू करत...विचाराधीन...पर्णवी माता म्हणे...."बाबू....मला किनई आता वॉटर मेलन ज्यूस ची भूक लागली आहे..." 🤦🤦🤦

तर हल्ली अस सुरू झालंय..... आम्हाला आता वेगवेगळ्या प्रकारची भूक लागते म्हणजे.... पावभाजी ची भूक...डोसा ची भूक....आईस्क्रीम ची भूक....वगैरे वगैरे....