30 December 2019

टाइम मशीन !!

Edit Posted by with No comments

रोज सकाळी आंघोळ,बाप्पा करून झालं की सर्वात आधी आम्हला भिजवलेले बदाम लागतात.सर्वांना सम समान वाटप होत.

दोन दिवसांपूर्वी रात्री बदाम भिजवायचे विसरून गेलं.दुसऱ्या दिवशी सकाळी मग आदेश निघाला...

"आऊ... बदाम दे ग..."

सुजाता ने सांगून दिल बच्चा आज बदाम नाहीये मी रात्री भिजवायला विसरून गेले.आता उद्या देते किंवा कोरडे बदाम खाते का?

"नको...कोरडे नको...मला भिजवलेले हवेत..."

मग थोडा वेळ शांतता होती...थोडा विचार चालू होता...मग पुढचा आदेश आला...

"आऊ...तू आता इंग्लंड ला जाते का?"

सुजाताला दोन मिनीट हे अस काय बोलते आहे हे काही समजलंच नाही म्हणून मग विचारल..." का...मी कशाला जाऊ इंग्लंड ला...काय आहे तिकडे..."

"अग आऊ...तिकडे आता रात्र आहे...तू तिथे जा रात्रीचे बदाम भिजव अन मग घेऊन परत ये..."🤣🤣🤣😂😂😂

कारण बदाम हे रात्रीच भिजवायचेच असतात...हे असलं तुफानी लॉजिक आहे....🙈😂😂😂


27 December 2019

निरोप!!

Edit Posted by with No comments
तीनेक महिन्यांपूर्वी मला ऑफिसच्या कामानिमित्त ट्रॅव्हल करावं लागणार होत.मला दोनेक आठवडे आहेत अन तेवढ्या वेळात पर्णवी ला समजावू असा माझा समज होता तोच एक दिवस अचानक मेल आला की दोन दिवसातच ट्रॅव्हल करावं लागणार होतं.आता मात्र माझी पंचाईत झाली होती की पर्णवी ला कस समजावून सांगायचं.त्या दरम्यान ताई अन अद्वय दोघे पण होते त्यामुळे जास्त काही काळजी वाटली नाही.थोडा वेळयात समजावून होईल अस वाटलं.शनिवारी रात्री निघायचं होत त्यामुळे शनिवारी सकाळी समजावू अस ठरवलं होत.

अखेरीस शनिवार आला,पर्णवी सोबत दुपारी निवांत बोलु अस ठरवलं होत.सकाळी सकाळी मी लिस्ट बनवत बसलो होतो तेव्हा बाजूलाच पर्णवी अन अद्वय बसले होते.तोच पर्णवी म्हणे...

"अद्वय...हे बघ...बाबू आता विमानात बसून जाणार आहे अन तो फाईव्ह डेज झाले की मग येणार आहे म्हणून आजच आपण लॅपटॉप वर गोष्ट बघून घ्यायची....ठीक आहे"

हे ऐकल्यावर मला धक्काच बसला...मी जे सांगायची तयारी करत होतो ते तर हिला अगोदरच माहीत आहे.म्हणून मी आपलं सहजच तिला म्हणालं...

"बच्चू....मी जाणार आहे तुला रे कस माहीत? मी तर सांगितलं नाही...आऊ ने सांगितलं का?"

तर कमरेवर दोन्ही हात ठेवत...मानेला हलकासा झटका देत म्हणे...
"मला सगळं माहीत असत...तू नाही सांगितल ना पण मला माहीत आहे तू मला सोडून जाणार आहेस ते.."

अन हे सांगताना आवाज भरून आला होता.मग अजून वातावरण गंभीर होण्याआधी मी आपलं गंमत सुरू केली.पण दुपार नंतर जस जसं पॅकिंग अन आवराआवर सुरू झाली मग मात्र पर्णवी गप्प गप्प झाली.संध्याकाळी मी सर्व चेक करत होतो तेव्हा बेडरूम मध्ये आली तर मी तिला म्हणालो..

"हे बघ...पर्णवी...मी आता नाहीये....तर कोणाला अजिबात त्रास द्यायचा नाही...आजोबांची अन आजीची काळजी घ्यायची...आऊ ला मदत करायची...शहाण्यासारखं वागायचं...अन रडायचं तर बिलकुल नाही....समजलं." 

यावर काही न बोलता फक्त हूं एवढं च केलं अन तेवढ्यात सुजाता पण आली.मग आमच बोलणं सुरू झालं.तोवर पर्णवी म्हणाली..."बाबू मी बाहेर जाऊ का रे?"

बाहेर हॉल मध्ये बाबा होते त्यामुळे मी म्हणलं ठीक आहे जा बच्चा बाहेर जाऊन खेळ.अन मी माझ आवरायला लागलो तर अचानक आम्हाला हुंदका देण्याचा आवाज आला.अचानक हुंदके कोण देतंय म्हणून मग आम्ही बाहेर हॉल मध्ये गेलो तर तिथं  फक्त बाबा होते अन ते पुस्तक वाचत होते.मग लक्षात आलं आवाज तर किचन मधून येतोय....म्हणून मी तिकडे गेलो तर किचनच्या कोपऱ्यात भिंतीकडे तोंड करून येणार रडू दाबून पर्णवी हुंदके देत होती.खर तर तिला खूप रडायला येत होत पण फक्त मी सांगितलं म्हणून रडत नव्हती.मग मात्र मलाच माझं चुकल्याच लक्षात आलं.मग तिला उचलून घेतलं अन विचारलं...

"तुला रडु येतंय का?"

तर म्हणे ..."हो..."

मग तसच तिला घेऊन बेडरूममध्ये आलो अन म्हणलं रडावं वाटतंय ना मग रड. अस म्हणल्यावर मला घट्ट मिठी मारत खांद्यावर डोकं ठेवत मोठयाने रडणं सुरू झालं.इतक्या वेळ बाबा म्हणाला म्हणून दाबून ठेवलेलं सार रडू बाहेर आलं.दोन चार मिनीट झाले ..मग मीच तिची घट्ट मिठी सोडवत डोळे पुसले अन म्हणाल," पण तुला रडायला काय येतंय मी तर लगेचच येणार आहे.."

तर म्हणे...."बाबू...मला काळजी वाटते रे तुझी..."❤️😍
अस म्हणत जी काही घट्ट मिठी मारली की बस्स.यानंतर मात्र मग माझा बांध फुटला पण फक्त पर्णवी ला समजू दिलं नाही.त्यानंतर मात्र बराच वेळ एक निःशब्द पण खूप काही व्यक्त होणारी घट्ट अशी मिठी होती.अवघ्या साडे चार वर्षाच्या जिवाला कसली बर काळजी वाटत असावी?किती हे प्रेम.😘

थोडा वेळ आम्ही तसंच बसून राहिलो मग माझं जाणं का गरजेचं आहे.मला माझं काम आवडत अन ते मी मनापासून करतो.अस बरचसं समजावलं तेव्हा कुठे सार नॉर्मल झालं.

आदल्या दिवशी येताना मी शिवरायांची गारद प्रिंट करून घेऊन आलो होतो.मग ती प्रिंट पर्णवीच्या मदतीने बेडरूम मध्ये चिटकवली अन तिला अगदी सहज म्हणालो तुझं हे पाठ झालं की बाबा लगेच येणार.(नंतर मात्र हे बुमरँग झालं...मला वाटत होत हे एवढं पाठ करायला किमान आठ दिवस लागतील तर लेकीने फक्त दोनच दिवसात संपूर्ण गारद पाठ करून दाखवली होती.🤗🤗)

माझा पिक अप रात्री 12 वाजता होता तर नेहमी लवकर झोपणारी पर्णवी मात्र त्यादिवशी मी निघेपर्यंत जागी होती.जाताना मात्र आम्ही फक्त डोळ्यांनीच बोललो.एक शब्द ही न बोलता आम्ही खूप काही बोललो.😊😊😊

आयुष्य खूप सुंदर आहे फक्त पोटी एक लेक हवी.

21 December 2019

गप्पा 😉

Edit Posted by with No comments
जेवताना ,चहा पिताना वा ज्यूस वगैरे पिताना हमखास कपड्याना थोडा थोडा नैवैद्य देणं हा अस्मादिकांचा जन्मसिद्ध हक्क.त्यामुळे वारसाहक्काने हे लेकीकडे पण आलं आहे.

मागच्या आठवड्यात लेकीला शाळेत इडली चटणी मिळाली होती अन सवयीने नॅपकिन वर चटणी सांडलेली होती.शाळेतून आल्यावर डबा काढताना सुजातच्या हे लक्षात आलं.त्यामुळे सुजाता पर्णवी ला विचारलं....

"काय ग...चटणी कशी काय सांडली...जरा नीट खायचं ना"

तर म्हणे...

"अग आऊ....ही वॉटर बॉटल आहे ना...हिच्यामुळे झालं हे....हीच लक्षचं नसत मुळी....मी तिला सांगितलं होत की जरा टिफिन वर लक्ष दे....तो काही सांडवेन तर बघ जरा...त्याला सांग की काही सांडवू नकोस... पण ती आहे ना त्या नॅपकिन सोबत फक्त गप्पा मारत बसते....माझं काही ऐकतच नाही....अन बघ बर आता सांडली ना चटणी ..."🤣🤣🤣

घ्या....काय बोलणार यांच्यापुढे? काही सांगायची सोय नाही....काही सांगायला जावं तर हे अशी हजरजबाबी उत्तर मिळतात.🙈🙊

29 November 2019

लग्न 😛

Edit Posted by with No comments
दिवाळी दरम्यान लग्न मुहूर्त अन असच बोलणं चालू होत त्या वेळी बोलताना तुळशीच लग्न झालं की मग लग्न होणार अस पर्णवी च्या कानावर पडलं. मग परत सुप्त असलेला हा विषय पुन्हा उफाळून आला,अन मग आम्हाला पुन्हा आपला नेहमीचा प्रश्न पडला...."माझं लग्न कधी होणार?" 😂😂😂

अखेरीस सुजाता ने कंटाळून तिला सांगितल की..."आपल्या कडे तुळशीचं लग्न झालं की मग त्यानंतर मग लगेच तुझ लग्न..." 🤣🤣🤣

त्यामुळे मग माय आमचं वादळ भलतंच खुश झालं.त्या दरम्यान जिजाऊ मालिकेत सुद्धा जिजाऊ माँ साहेबांच्या लग्नाची बोलणी वगैरे सुरू होत ते पाहून मग काय मी घरी गेलो तेव्हा लगेच आदेश आला...

"बाबू....ए....बाबी....मला किनई लग्नात जिजाऊ माँ साहेबांसारख्या 100 साड्या हव्यात....शंभर...समजलं का"

दर एक दोन दिवसांनंतर मग आठवण करून दिली जायची तुळशीचं लग्न झालं की माझं लग्न आहे.

यथावकाश मग आम्ही तुळशीचं लग्न तेव्हा कार्यकर्ते अगदी जोरात होते...गडबडीत पूजेच्या ताटाला धक्का लागला अन सर्व सांडलं ....कोणी बोललं नाही तर आपल चुकलं आहे हे लक्षात आलं होत त्यामुळे एकदम तोंड बारीक झालं होत पण गाडी आली लगेच ट्रॅक वर कारण लग्ना वेळी अंतरपाट धरण्याचा मान मिळाला.

तुळशीचं लग्न झालं त्यानंतर लगेच प्रश्न आला...."आता माझं लग्न केव्हा करणार....ये अरे बाबू...सांग की..."

सारख विचारणं नको म्हणून मग पर्णवी ला समजून सांगितलं तर त्यावर आपलं नेहमीचं उत्तर आलं....

"नकाच करू माझं लग्न....आऊच अन तुझं लग्न झालं...आजी आजोबांचं लग्न झालं...आत्तु मामांच लग्न झालं...सगळे सगळे लग्न करतात... माझं च लग्न कोणी करत नाही...."😂😂🤣🤣🤣

"बाबू अस करणार ना तू....कट्टी तुझ्या शी आता...मी नाही बोलणार "🙊🤣🤣😂😂😂

काय करावं बर बाबाने 😉


28 November 2019

रायगड 😊

Edit Posted by with No comments
रायगड अन हिरकणी ची गोष्ट ऐकल्यापासून पर्णवी ला रायगडावर जायच आहे.अधून मधून आठवलं की लगेच विचारलं जात...

"बाबू...अरे आपल्याला रायगडावर जायचं राहिलं की...."

त्यात मागच्या आठवड्यात हिरकणी पाहून आल्यापासून रायगड अगदी रडारवर आहे.आज सकाळी शाळेत जाताना आमचं बोलणं चालू होत, तर तिला म्हणाल ..

"बच्चा...तुला आस्ते कदम लक्षात आहे ना...आपण रायगड ला गेलो की तुला तिथं म्हणायचं आहे बर का"
(महाराजांची गारद पर्णवी ची तोंडपाठ आहे...ती पाठ कशी झाली हे लिहीन लवकरच)

"हो...आहे की लक्षात माझ्या...मला सगळं आठवत"☺️

"पण तिथं महाराज असणार ना रे...मी कुठं आस्ते कदम म्हणायचं"

अशी मग प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली...मग अस्मादिक आपल्या बौद्धिक आवाक्या प्रमाणे उत्तर देऊ लागले.

बोलता बोलता अचानक मग जरा पॉज घेतला...अन म्हणे..

"अरे पण बाबू...आपण जाणार पण गडाचे दरवाजे बंद झाले तर मग काय रे?"😂😂😂🤣🤣🤣

शिवकालात संध्याकाळी जसे दरवाजे बंद केले जायचे तसंच आता पण होतंय असा तिचा समज होता पण नंतर मग तिला समजावून सांगितलं की आता अस नाहीये.😊😊

हे सांगेपर्यंत तर आमची हिरकणी सारखी कडा उतरायची पण तयारी झाली होती 😂😂😂🤣🤣

 

25 November 2019

हिरकणी 😀

Edit Posted by with No comments
गोष्ट पुराणातील पुढील अध्याय....

रात्री किंवा दुपारी झोपताना आम्हाला गोष्ट ही लागतेच.आजोबा असतील तर मग त्यांच्या अच्चू बच्चू,लाकूडतोड्या वगैरे टिपिकल जुन्या गोष्टी,मी असेल तर मग ट्रेक च्या गोष्टी,किंवा मग आमची कस्टम मेड बेडुकराव,बंटी बिबट्या अशा गोष्टी असतात.(एकदा काही तरी वेगळी गोष्ट...वेगळी गोष्ट ...अस म्हणतं प्रत्येक गोष्टी ला ना चा पाढा...कंटाळून गेलो...अन मग चक्क माझ्या एका एअरपोर्ट प्रोजेक्टच्या डिजाईनचीच गोष्ट सांगितली होती 🙈🙊).थोडक्यात काय तर माणसानुरूप गोष्ट असते.

एके दिवशी रात्री झोपताना रायगड ची गोष्ट सांगत होतो.मला तर जाम झोप येत होती अन आमचं वादळ मात्र अगदी टळटळीत जागं होतं.मी आपलं झोपेच्या आशेने गोष्ट पूर्ण केली.पण लेकरू काही झोपेना.आता रायगडा ची वेगळी गोष्ट सांग असा आदेश आला.म्हणून मग तिला झोपेतच हिरकणी ची गोष्ट सांगायला घेतली,अन इथेच बाबा चा घात झाला.झोपेत मी तिला चुकीची गोष्ट सांगितली,म्हणजे हिरकणी कडा उतरून जाण्याऐवजी कडा चढून वर गेली.दूध विकायला गडावर येण्याऐवजी गडाखाली गेली....सगळं कस उलट. झोपेच्या आशेने गोष्ट संपवली अन सुटलो.पण मग एक दोन दिवसांत परत गोष्ट सांगत होतो तेव्हा सुजाता ने चूक लक्षात आणून दिली.मग ट्यूब पेटली की आपण चुकीची गोष्ट सांगत होतो.मग परत व्यवस्थित गोष्ट सांगितली अन सॉरी बच्चा ते चुकून आधी वेगळं सांगितले अस म्हणून बापुडा तोकडा असा बचावाचा प्रयत्न केला.

पण प्रकरण तिथे संपलं नव्हतं त्यानंतर बाबु तू मला एकदा उलटी गोष्ट सांगितली होती ना...हो की नाही..अस वेळोवेळी डिवचल गेलं.पण काय करणार...घेतलं गप गुमान ऐकून.

आता हिरकणी पिक्चर आला तेव्हा केव्हाच ठरलं होत आपल्याला हा पिक्चर पाहायचा आहे.पण मला अचानक काम आलं त्यामुळे पर्णवी ला ताई सोबत पिक्चरला पाठवलं.पिक्चर पाहून आल्यावर एक दोन दिवस गडबडीत गेले त्यामुळे आमचं त्यावर जास्त काहीच बोलणं झालं नाही.

पर्णवीच नाईट आउट होत त्यादिवशी मग तिला संध्याकाळी ग्राउंड वरून लवकर आणावं लागणार होत म्हणून मी घ्यायला गेलो होतो.येताना गाडीवर आमच्या खास अशा गप्पा सुरू नव्हत्या.तिला शाळेत सोडायच म्हणून मी गडबडीत होतो.तर अचानक आदेश आला....

"बाबू....ऐक ना...गाडी बाजूला घे पटकन...."

"का ग ...काय झालं..."

"घे ना रे बाबू पटकन..."

मला वाटलं हिला काही तरी त्रास होतोय म्हणून पटकन ट्रॅफिक असूनही गाडी बाजूला उभी केली.

अन म्हणलं..." हं...बोल...काय झालं...का थांबायला लावलंस"

तर म्हणे..."काही नाही...तुला हिरकणी ची गोष्ट सांगायची आहे"

"अग...पर्णवी...आपल्याला उशीर होतो...आता रात्री किंवा उद्या निवांत सांग...आता नको..."

"नाही...आत्ताच...ऐक ना रे बाबू...अस करणार ना तू मला"

झालं घेतली विकेट...मी अजून काही बोलेपर्यंत गोष्ट सुरू पण झाली.नशीब माझं की अगदी पटकन संपवली...पण...लगेचच डायलॉग आला..

" बाबू ...तुला माहितये का...हिरकणी कडा चढून नाही रे उतरून तिच्या बाळाला भेटायला आली होती...समजलं का"

भर रहदारीच्या रस्त्यावर बाजूला उभे राहून गोष्ट ऐकणारे बाप लेक ...अस कधी असतंय व्हय...अन ते पण का तर बाबाचं चुकलं होत याची आठवण करून द्यायला 😂😂🤣🤣🤣

पण..मी काय म्हणतो...चुकतो माणूस...झाली जरा गडबड..तर अस करायचं का बाबाला 😛😉🤣🤣


23 November 2019

नाथ 😛😛

Edit Posted by with No comments
पर्णवी ला सुरुवाती पासूनच गोष्टी ऐकायला फार आवडतात.आम्ही गाडीवर जात असतो तेव्हा सुद्धा लहर येईल त्याप्रमाणे गोष्ट सुरू होते.

थोडं समजायला लागलं तस आता गोष्ट ऐकून झाली की मग त्या गोष्टीच लगेच नाट्य रुपांतर होतं.मग गोष्टी मधील मुख्य भूमिका अर्थातच तिच्या कडे असते मग त्याखाली 2 दोन। नंबर ची भूमिका आऊ कडे अन उरलं सुरलं सडेफटींग कामाला नेहमी प्रमाणे बाबा असतोच.

म्हणजे...जेव्हा कॅप्टन अभिनंदन यांना पाकिस्तान ने पकडलं होतं अन त्यानंतर काही तास ते जे काही नाट्य झालं ते गोष्टी रुपात पर्णवी ला सांगितलं तेव्हा त्यांनतर कित्येक दिवस आमच्या घरात रोजच बालाकोट व्हायचा.त्यात अर्थातच कॅप्टन अभिनंदन म्हणजे पर्णवी,सुजाता इंडियन आर्मी अन मी म्हणजे पाकिस्तान. मग आमच्या विमानांचा  हल्ला व्हायचा मग मी पर्णवीला पकडून न्यायचं...अन मग सुजाता ने  तिला सोडवायच...हे अस असायचं...किंवा मग शाहिस्तेखान ची गोष्ट असेल तर मग माझी कित्येक वेळा बोट छाटली जायची....तान्हाजी मालुसरेंची गोष्ट असेल तर मी उदयभानू अन ती तान्हाजी.....अन हे सर्व तिला हवं तस डायलॉग मध्ये बोलायचं....जरा चुकलं की लगेच अरे काय बाबूं...जाऊ दे तू असंच करतो...मला करायची गोष्ट अस म्हणून स्वतःच रुसायचं एकंदरीत गोष्ट प्रकरण किती कठीण आहे हे लक्षात आलंच असेल.

काही दिवसांपूर्वी सुजाता ने दुपारी तिला सीता हरण ची गोष्ट सांगितली....मग काय संध्याकाळी घरी आल्यावर लगेच फर्मान आलं...बाबू आज आपल्याला सीता हरण करायचं आहे...मला काही झेपलं नाही....हे बहुतेक पर्णवी ला समजलं असावं...त्यामुळे मी पुढचा प्रश्न विचारण्या अगोदरच कमेरवर हात ठेवून दुसऱ्या ने हात वारे करत सांगू लागली....अरे सीता माईंना नाही का रावण पळवून नेतो ती वाली गोष्ट....समजलं का....आता ऐक...तू मारीच राक्षस अन रावण...मी सीता अन अन आऊ श्रीराम बाप्पा....ठीक आहे...

मी आपलं मान डोलवली...हो ठीक आहे...पाचेक मिनिटात आमचं नाटक सुरू झालं...जस रावणाने सीतेला पकडलं तस सीता मातेचा प्रभू श्रीराम यांचा धावा सुरू झाला....अन लगेच काही तरी तिला आठवलं म्हणून ऐका ना ...थांबा ...थांबा....अस म्हणत आम्हाला थांबण्याचा आदेश आला..

मी म्हणलं..."का ग....काय झालं?"

तर तोंडाचा चंबू करत सुजाताला म्हणे..."आऊ..तू बबुडी ला योगेश का ग म्हणते..."

अचानक आलेल्या गुगली ने काय बोलणार? पटकन मग सुजाता म्हणाली ..."ते त्याचं नाव आहे म्हणून....जस तुला नावाने हाक मारते...तसंच..."

तर लगेच म्हणे...."आज पासून तू बबुडी ला...योगेश नाही म्हणायचे...तू त्याला...नाथ...म्हणायचं...नाथ...समजलं?"

हे मला काही झेपलं नाही...म्हणून मी आपलं म्हणालो ...."काय?...हे काय नवीन..."

तुला कस कळत नाही रे...असा चेहरा करत...."अरे बाबू ...सीता माईं सारख रे...ते नाही का प्रभू श्रीरामांना नाथ वाचवा...वाचवा...अस म्हणतात...तस आऊ ने आता तुला नाथ म्हणायचं..."😂😂😂🤣🤣

तसं आमची ट्यूब पेटली हे गोष्ट सांगताना आम्हीच सांगितलं आहे 🙈🙊😂😂😂